संगणकव्यवहाराचे मराठीकरण

--सुशांत शंकर देवळेकर

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेबरोबरच उत्पादनांच्या स्थानिकीकरणाची
संकल्पनाही महत्त्वाची ठरते. किंबहुना ह्या दोन्ही प्रक्रिया एकमेकींशी
नाते राखणार्‍या आहेत. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत जगातील एका टोकाला
असलेली वस्तू जगाच्या दुसर्‍या टोकाला सहज उपलब्ध होऊ लागली आहे. पण
त्याबरोबरच जगाच्या त्या टोकाला ती वस्तू पुरवताना तिथल्या स्थानिक
आवश्यकता काय आहेत हेही ध्यानात घेण्याची आवश्यकता आहे ह्याचे भान आता येऊ
लागले आहे. संगणकक्षेत्रातही ह्या स्थानिकीकरणाला विशेष महत्त्व लाभले आहे.

मराठीकरणाची उद्दिष्टे

ज्या विशिष्ट सामाजिक-राजकीय परिस्थितीत आपण वावरत आहोत तिचे भान न
ठेवता जर आपण संगणकव्यवहाराचे मराठीकरण करू गेलो तर ते निव्वळ उपचार म्हणून
केलेले काम ठरेल. आपले मराठीकरण हे असे असू नये. ह्यासाठी मराठीकरणाच्या
उद्दिष्टांतले विविध घटक लक्षात घेणे आवश्यक आणि हितकारक आहे. आपल्याला
केवळ शब्दान्तर करायचे नाही. उपचारापुरते शब्दाला शब्द उभे करायचे नाहीत.
संगणकाविषयी मराठीतून नेमकेपणे बोलता येईल ह्यासाठी पूर्वसिद्धता करायची
आहे. मराठीकरणामागचे हेतू कोणते हे पाहू गेल्यास पुढील उद्दिष्टे ध्यानात
येतात.

(अ) अस्मितेचा आविष्कार : मराठी ही माझी स्वभाषा आहे आणि मला माझा
ज्ञानाविष्कार मराठीतूनच करायचा आहे अशी भूमिका घेणारे काही लोक असतात.
भाषा हा त्यांच्या अस्मितेचा भाग असतो. मला माझ्या भाषेतून हे करता येते हे
त्यांना जगाला दाखवून द्यायचे असते. (अशा तर्‍हेची) भाषिक अस्मिता हा फार
महत्त्वाचा मुद्दा ठरतो. जपान, चीन, स्पेन, फ्रान्स अशा देशांत आपल्या
स्वभाषेतच आपला ज्ञानव्यवहार आणि इतर सर्व व्यवहार करू इच्छिणारा फार मोठा
वर्ग अस्तित्वात आहे. खरे तर जगात विविध ठिकाणी असलेल्या अशा वर्गाच्या
अस्तित्वामुळेही जागतिक संगणकव्यवहाराच्या स्थानिकीकरणात भाषा ह्या घटकाला
महत्त्व लाभते आहे.

(आ) भाषासमृद्धी : जीवनव्यवहाराच्या विविध क्षेत्रांत वापरी जाणारी भाषा
त्या त्या व्यवहारासोबत आपोआप समृद्ध होत असते. आपली भाषा ही ह्या संगणकीय
व्यवहारक्षेत्राची (आणि अशाच इतर अनेक व्यवहारक्षेत्रांची) स्वाभाविक भाषा
असती तर आपल्याला हा सगळा स्थानिकीकरणाचा खटाटोप करावाच लागला नसता. पण
दुर्दैवाने तशी परिस्थिती नाही. अशा वेळी आपल्याला एक तर हा व्यवहार आपल्या
भाषेत करताच येणार नाही असे म्हणून गप्प बसावे किंवा आपल्या भाषेची क्षमता
ओळखून ती भाषा अशा व्यवहाराला तयार होईल असे प्रयत्न करावेत. असे प्रयत्न
नेटाने झाल्यास भारतीय भाषांना लाभलेली वाङ्मयाची परंपरा अधिक समृद्ध होऊ
लागेल. आपल्या भाषेचा लवचीकपणा, शब्दसिद्धीची प्रक्रिया ह्या सर्वांची जाण
ह्या उद्दिष्टात महत्त्वाची ठरते.

(इ) आकलनसुलभता : अजूनही आपल्याकडचा फार मोठा समाज आपला ज्ञानव्यवहार
आणि सामाजिक व्यवहार मराठीत करत असतो. (हे संख्याबळ किती काळ टिकेल हा
प्रश्न आता सहज दुर्लक्षिता येणार नाही.) अशा समाजाला संगणकीय व्यवहार सहज
कळावा हे आपले एक उद्दिष्ट असणार आहे. अनेकांना आकलनसुलभता हा मुद्दा ह्या
उद्दिष्टांच्या क्रमात शेवटी घातलेला पाहून आश्चर्य वाटले असेल. पण आपण
ज्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत जगत आहोत तिच्यात हा मुद्दा पहिला मुद्दा
होऊ शकत नाही. इंग्रजीत चाललेला ज्ञानव्यवहार कळत नाही ह्यावर आपण
इंग्रजीतूनच शिकणे आणि आपण इंग्रजीतच ज्ञानव्यवहार करत राहणे हा एक मार्ग
आहे. बहुसंख्य अभिजनांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच हा मार्ग अवलंबलेला
आहे आणि आपल्याकडचा बहुजनसमाजही आता त्या मार्गाकडे वेगाने वाटचाल करतो
आहे. शासनाचा आणि लोकप्रतिनिधींचा ह्या मार्गालाच पाठिंबा आहे. तेव्हा
निव्वळ आकलनाचा मुद्दा हा मर्यादित ठरतो. केवळ ह्या मुद्याला महत्त्व
द्यायचे असेल तर मराठीत हा व्यवहार आणण्याच्या खटाटोपापेक्षा मराठीला सोडून
देऊन इंग्रजीशरण होण्याचा मार्ग हा कमी कष्टाचा आहे असेही अनेकांना वाटतं.

पण मराठीकरणाच्या दृष्टीने आपण हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. त्यामुळे
केवळ उपचार म्हणून भाषान्तर करण्याच्या प्रवृत्तीला काही आळा बसण्याची
शक्यता निर्माण होते. आपण केलेले मराठीकरण हे लोकांना हा विषय कळावा
ह्यासाठी आहे ह्याची जाण असणे आवश्यक आहे.

संगणकव्यवहार आणि मानवी भाषा

संगणकव्यवहारात एखाद्या मानवी भाषेचा वापर आपण दोन प्रकारे करतो. एक
म्हणजे वापरकर्‍यांच्या सोयीसाठी संगणकीय यंत्रणेचा भाग म्हणून संवादपटलावर
आपण मानवी भाषा वापरतो. ह्यात व्यक्ती जेव्हा संगणक वापरते तेव्हा
संगणकाच्या पडद्यावर तिला विविध सूचना दिसतात. त्यातून कोणत्या क्रियेनंतर
त्या वापरकरी व्यक्तीने काय करणे अभिप्रेत आहे ह्याचे मार्गदर्शन मिळते.
दुसर्‍या प्रकारात वापरकरी व्यक्ती आपल्या भाषेतील माहिती संगणकावर
नोंदवते, साठवते, हवी तेव्हा त्यातील माहिती हुडकून वापरू इच्छिते, तिची
देवाणघेवाण करू इच्छिते. आपण ह्यांपैकी पहिल्या प्रकारच्या भाषिक
व्यवहाराचा विचार करत आहोत.

घडवलेल्या संज्ञा आणि स्वीकारलेल्या संज्ञा

जो ज्ञानव्यवहार आपल्याकडचा नाही, जो आपण कुणा इतरांकडून शिकलो आहोत,
त्या व्यवहारासाठी संज्ञाही त्याच भाषेतून घ्यायला काय हरकत आहे असे एक मत
आहे. नाहीतरी विविध भाषा बोलणारे लोक एकमेकांच्या संपर्कात आले म्हणजे
त्यांच्या भाषांमध्ये परस्परांत देवघेव होतच असते. संगणकविज्ञान आणि
संगणकतंत्रज्ञान आपण युरोप-अमेरिकेकडून घेतले तेव्हा त्यांनी वापरलेल्या
संज्ञाच आपण का स्वीकारू नयेत? उगाच मराठी संज्ञा शोधत बसण्याची कटकट कशाला
हवी! ही भूमिका काही नवी नाही. पण भाषाभाषांतील देवघेव ही जितकी स्वाभाविक
आहे असे भासते वा भासवण्यात येते तशी ती खरोखर असतेच असे नाही हेही आपण
ध्यानात घ्यायला हवे. त्यातली स्वाभाविकता आणि अगतिकता ह्या दोन्ही गोष्टी
चिकित्सक बुद्धीने तपासायला हव्यात. ज्या दोन भाषांच्या संबंधांबाबत आपण
बोलतो आहोत त्या भाषांचे राजकीय-सामाजिक बलाबल काय ह्याचे भान ठेवले नाही
तर ह्या तथाकथित स्वाभाविक देवघेवीची परिणती ही एका भाषेने स्वाभाविकपणे
दुसरा भाषा मटकावण्यात होते. हा विचार केल्यास सध्याच्या परिस्थितीत
इंग्रजीतले शब्द मराठीत सरसकट घेणे टाळावे. अगदी निरुपाय असेल तरच घ्यावे.
शक्यतो मराठी धाटणीचे नवे शब्द घडवावे असे प्रस्तुत लेखकाला वाटते. फाइल,
फोल्डर, ड्राइव्ह ह्यांना धारिका, संचिका, खण हे किंवा अधिक चांगले इतर
मराठी पर्याय वापरणे चांगले.

पारिभाषिक संज्ञा

संज्ञांना भाषाव्यवहारात एक उद्दिष्ट असते ते म्हणजे वस्तुबोधाचे.
संज्ञा आपण वापरतो त्या एखाद्या गोष्टीचा निर्देश व्हावा म्हणून. पारिभाषिक
संज्ञा हा संज्ञांचा विभाग होतो तो विशिष्ट संदर्भाच्या सापेक्षतेने. इथे
संज्ञांचा अर्थ हा मूलत: एका मर्यादित क्षेत्रातल्या व्यवहारानुसार ठरतो.
पारिभाषिक संज्ञांचा वापर हा मुख्यत्वे त्या क्षेत्रातील जाणकार करत असतात.
डॉ० अशोक केळकर ह्यांनी दिलेले उदाहरण वापरायचे तर पाणी ही संज्ञा
व्यवहारात आपण वापरतो ती पिण्याजोगा, धुण्यासाठी वापरायचा द्रवरूप पदार्थ
अशा अर्थाने. पण रसायनविज्ञानात त्याच्या ह्या संदर्भापेक्षा त्याची घडण
महत्त्वाची ठरते. पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्यांच्या अणूंचे संयुग
आहे ह्याला तिथे प्राधान्य असते. मराठीकरणाचा विचार करताना
संज्ञाव्यवहाराचे हे वैविध्य ध्यानात घ्यायला हवे.

मराठीकरणाच्या प्रक्रियेविषयी

सर्वसाधारणपणे संगणकप्रणाल्यांच्या देशीकरणात जी पद्धत वापरतात ती
म्हणजे इंग्रजीतली संज्ञांची यादी देऊन त्यांना देशी भाषांत कोणते पर्याय
आहेत ते लोकांना नोंदवायला सांगणे. पण ह्या पद्धतीत काही तोटे आहेत. ह्या
पद्धतीत संज्ञाव्यवहार तुकड्यातुकड्यांत विखुरलेला असतो. त्याचे भान राहतेच
असे नाही. संज्ञांचे एकमेकांशी असलेले संबंध, वापराचे संकेत ह्या सगळयांचे
एकत्रित भान येतेच असे नाही.
संज्ञांचे पर्याय निवडण्यासाठी देताना स्रोतभाषेतील संज्ञा आणि तिच्यापुढे
पारिभाषिक अर्थ अशी सामग्री आपल्यापुढे आपण ठेवली तर संदर्भांचा घोटाळा
होणार नाही आणि मराठीकरणही चपखल होईल. त्यामुळे स्रोतभाषेतील संज्ञांचे
व्यवहारातले अर्थ आपोआपच गळतील.

दुसरे म्हणजे सुट्या संज्ञा देण्यापेक्षा वाक्येच जर समोर असली तर
अर्थाचे संदर्भ स्पष्ट होतात. ह्या दृष्टीने 'साहाय्य' ह्या विभागातील
नोंदींचे मराठीकरण प्रथम करण्याचा प्रयत्न झाल्यास अधिक रेखीव संज्ञा
उपलब्ध होऊ शकतील. आणि वापरकर्‍यांच्या दृष्टीने पाहता त्यांना फार निकडीची
असणारी सोय ह्यातून आपोआप लाभले.

नेमके अर्थसंदर्भ

सर्वसामान्यपणे भाषेतील शब्दाशी विविध संदर्भ निगडित असू शकतात. अशा
वेळी शब्दाचा नेमका संदर्भ नीट कळणे आणि तो नीट व्यक्त होणे हे आवश्यक आहे.
अनेकदा शब्दाच्या पारिभाषिक अर्थापेक्षा व्यवहारातल्या सामान्य अर्थाच्याच
आधारे संज्ञांचा विचार होतो. त्यातून उगीचच बोजडपणा येऊ शकतो. उदा०
'ऑथेंटिफिकेशन'ला 'अधिप्रमाणन' म्हणण्याची आवश्यकता नाही. ह्या संज्ञेच्या
वापराचा संदर्भ पाहिला तर 'खातरजमा' हा शब्द अधिक योग्य वाटतो.

एखाद्या गोष्टीशी अनेक संदर्भ निगडित असताना संज्ञा ही त्यातील एखाद्याच
संदर्भाला महत्त्व देऊन रचलेली असू शकते. उदा० मराठीत सध्या अनेक लोक
ज्यासाठी न्याहाळक अशी संज्ञा वापरतात त्याला इंग्रजीत ब्राव्जर अशी संज्ञा
आहे (त्याला अनुसरून काही लोक चाळकही म्हणतात.) ह्या दोन्ही संज्ञा ह्या
ह्या गोष्टीच्या एका एका धर्माचा निर्देश करतात. मुळात संगणकावर
महाजालावरील संकेतस्थळ पाहण्याची सोय करणारी संगणकप्रणाली हा अर्थ इथे
मुख्य आहे आणि तो इंग्रजी आणि मराठी दोन्ही संज्ञांच्या सामान्य
व्यवहारातील अर्थांत तंतोतंत गवसत नाही. त्यांचा पारिभाषिक वापर लक्षात
घेतला तरच ह्या संज्ञा योग्य वाटतात.

ह्या व्यवहाराचा पारिभाषिकपणा लक्षात घेणे ही एक पायरी झाली. ती लक्षात
घेऊनही नव्याने एखाद्या भाषेत चपखल संज्ञा सुचवणे हे काम सोपे नाही. मराठीत
नव्या संज्ञा आणताना जाणवलेल्या मर्माच्या जागा खाली मांडत आहे.

तंतोतंत जुळणारी संज्ञा

एका भाषेत एखादा शब्द जितक्या विविध संदर्भांशी निगडित असतो तितक्याच
संदर्भांशी निगडित असलेली पर्यायी संज्ञा शोधण्यात अनेकदा भाषान्तरकारांची
शक्ती खर्च होते. निदान शास्त्रीय भाषाव्यवहारात तरी बहुतेक वेळां ह्याची
आवश्यकता नसते. उदा० 'यूजर इण्टरफेस'साठी मराठीत संवादपटल ही संज्ञा सुचवली
तर इण्टरफेसचे इतर संदर्भ उदा० दोन संगणकीय यंत्रणांना जोडणारी मध्यस्थ
यंत्रणा ही संवादपटल ह्या संज्ञेत समाविष्ट होत नाही. पण अशा विविध
अर्थांसाठी वेगवेगळ्या संज्ञा वापरात येतात (संवादपटल आणि मध्यस्था) हे
ध्यानात घेतले तर सगळे संदर्भ तंतोतंत जुळतील अशाच संज्ञा हव्यात हा हट्ट
उरणार नाही.

आपला सांस्कृतिक शब्दकोश

अनेकदा असे वाटते की मराठीचा आपला सामूहिक शब्दकोश हरवत चालला आहे.
आपल्याला नवा शब्द घडवायचा झाला तर आपण संस्कृतातल्या शब्दसिद्धीची
प्रक्रिया अधिक वापरू जातो. (तीही बर्‍याचदा अज्ञानमूलक असते, ते असो.)
संगणकाची आज्ञावली रचताना त्यात एक विशिष्ट रचनाबंध वापरतात. त्यात एखादी
क्रिया विशिष्ट टप्प्यानंतर परत परत करण्यात येते. पुढची आज्ञा मिळेपर्यंत
हे परत परत करणे चालूच असते. इंग्रजीत ह्या रचनाबंधाला 'लूप' असे म्हणतात.
मराठीत काय म्हणाल असे विचारले तर बहुतेक लोक पुनरावर्तन वगैरे म्हणू
लागतात. निष्कारण संस्कृतात शिरतात. त्याला फेरा म्हणता येईल हे आपल्याला
पटकन सुचत नाही. फेरा हा शब्द एकदा सुचला की जन्ममरणाचा फेरा, फेर्‍यातून
सुटणे इ० शब्दप्रयोग आठवून ही संज्ञा अधिक चपखल आहे हे सहज लक्षात येते. पण
हे जरा सुचायला हवे. मराठीकरण करताना ह्या गोष्टीचे भान असल्यास मराठीकरण
अधिक स्वाभाविक होईल असे वाटते.

संस्कृतचा अनावश्यक वापर

संस्कृतचा वापर अनेकदा नको तितका झाल्यानेही असा पारिभाषिक भाषाव्यवहार
क्लिष्ट होतो. संस्कृततज्ज्ञांच्या दृष्टीने एखादा संस्कृत शब्द चपखल असला
तरी मराठीत सोपा शब्द देणे शक्य असताना तो संस्कृत शब्द वापरणे टाळावे.
'नेव्हिगेटर'ला मार्गनिर्देशक म्हणण्यापेक्षा वाटाड्या म्हणणे केव्हाही
चांगलेच.

सामासिक पदांची घटकपदे

अनेकदा स्रोतभाषेतली संज्ञा ही सामासिक स्वरूपाची असते. अशा संज्ञांना
पर्यायी संज्ञा सुचवताना काळजी घ्यायला हवी. उदा० इंग्रजी संज्ञा जर
सामासिक असेल तर तिच्या घटकपदांचे कोशातले अर्थ सुटे सुटे लक्षात घेऊन
पर्यायी संज्ञा घडवली तर ती बर्‍याचदा अभिप्रेत संदर्भात चपखल वाटत नाही.
उदा० 'बुकमार्क'चा पर्याय म्हणून पुस्तकखूण ही संज्ञा वापरली तर अर्थ
कळेलच. पण स्मरणखूण अधिक बरी वाटते. मूळ अर्थ काय अभिप्रेत आहे? तर आपण
नेहमी वापरतो ते संकेतस्थळांचे पत्ते पुन्हा पुन्हा लिहावे लागू नयेत
म्हणून संगणकाने ते नोंदवून घेणे. हे झाले म्हणजे एकदा टिकटिकवल्याने
(क्लिक केल्याने) काम भागते. ह्याला मराठीत स्मरणखूण असे म्हणणे अधिक बरे.
पुस्तकखूण म्हणजे पुस्तकात ठेवायची खूण तिचा अर्थ आपण कुठवर वाचले त्याची
आठवण करून देणे, त्यावरून संकेतस्थळाचा पत्ता लक्षात ठेवण्याची संगणकातली
सोय एवढा लांबलचक प्रवास करण्याची आवश्यकता नाही.

व्याकरणिक रचनाविशेष

भाषांचे व्याकरणिक रचनाविशेष अनेकदा काही बंधने आणत असतात ती ध्यानात
घ्यायला हवीत. उदाहरणच घ्यायचे तर शब्दसिद्धीच्या दृष्टीने पाहता मराठी
भाषेत धातूंना आख्याताचे (म्हणजे काळ आणि आज्ञार्थ इ० अर्थ ह्यांचे वाचक
असे) प्रत्यय लागताना त्यांना उपसर्ग लागत नाहीत. संस्कृत वा इंग्रजीत ते
लागतात. उदा० हृ ह्या धातूपासून हरति असे क्रियापद बनते तसेच संहरति,
विहरति, आहरति, प्रहरति इ० रूपे होतात. इंग्रजीत संस्कृताइतके नसतील पण री,
अन् असे काही उपसर्ग लागून काही रूपे होतात. उदा० री-डू, अन्-कव्हर,
ऑटो-चेक इ० मराठीत धातूला थेट उपसर्ग लागून होणारी अशी रूपे घडताना दिसत
नाहीत. मराठीत पुनर् इ० शब्द नामांच्याच अगोदर येतात. उदा० पुनर्मिलन,
पुनर्विचार, फेरनिवड इ० एखादा मनुष्य फेरनिवडला असं मराठीत म्हणत नाहीत
त्याला पुन्हा निवडले किंवा त्याची फेरनिवड झाली असे म्हणतात. इंग्रजीतून
मराठीत अशा रूपांचे भाषांतर करताना क्रियाविशेषण आणि धातू अशा रचना वापरणे
भाग आहे.

अशा प्रकल्पांत संगणकतज्ज्ञ आणि भाषेचे जाणकार अशा दोहोंचा सहभाग असायला
हवा आणि त्यांची चर्चा होईल असे एखादे व्यासपीठ उपलब्ध व्हावे. असे
झाल्यास ह्या प्रयत्नांचा पाया अधिक भक्कम होईल, अशी आशा वाटते. ह्या
विवेचनात संज्ञांचा प्रत्यक्ष विचार केलेला नाही, पण काही गोष्टी ध्यानात
घेतल्या तर मराठीकरण अधिक नेटके, अधिक स्वाभाविक होऊ शकेल असे वाटले म्हणून
काही निरीक्षणे नोंदवली आहेत.

भ्रमणभाष : 097698 35310
ई-पत्ता : दुवा क्र. १

[ 'भाषा आणि जीवन'च्या  पावसाळा २०१० अंकात पूर्वप्रकाशित. मनोगतावर पुनर्प्रकाशित करण्यासाठी भाषा  आणि जीवनची परवानगी घेतली आहे.  काही निवडक प्रतिसादांना भाषा आणि जीवनच्या आगामी अंकात प्रसिद्ध करण्यात येईल. ]

लेखकाचा परिचय
सध्या राज्य मराठी विकास संस्था (मुंबई) येथे कनिष्ठ संशोधन-साहाय्यक ह्या
पदावर कार्यरत. २००२-२००८ ह्या काळात भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी)
(मुंबई) येथील भारतीय भाषा केंद्रात भाषातज्ज्ञ म्हणून सेवेत. मराठी
शाब्दबंध हा शब्दार्थसंबंध दाखवणारा कोश, मराठी शब्दरूपांचे विश्लेषण
करणारी रूपविश्लेषक ही संगणक प्रणाली विकसित करण्यात सहभाग. संगणकावर
युनिकोड वापरून मराठीत काम कसे करता येईल हे समजावून देणाऱ्या कार्यशाळांत
मार्गदर्शन.