मीच वेडा, पीत नाही
ही जगाची रीत नाही
जी मजा शुद्धीत आहे
ती नशा, धुंदीत नाही
सोडुनी घर भूत गेले
एकही पण शीत नाही
पोट भरण्या कष्ट करतो
पींड मी उचलीत नाही
पाहिजे बस एक धक्का
दूर आता जीत नाही
राहण्या झोतात केंव्हा
ढोल मी बडवीत नाही
एक खाते दाखवा मज
लाल जेथे फीत नाही
टोचती काटे परंतू
फूल मी तुडवीत नाही
लग्न कंत्राटी करू या
गुंतण्याला प्रीत नाही
आपुल्यांचा त्याग केला
मी अता भयभीत नाही
ऊठ चल "निशिकांत" आता
राम या वस्तीत नाही
निशिकांत देशपांडे मों नं. ९८९०७ ९९०२३