अ "फेरी" टेल !!

लहानपणापासून आपण 'फेरी टेलस' ऐकत आलो आहोत!

एक दुष्ट चेटकीण किंवा राक्षस राजकुमारीला तिच्या राजवाड्याच्या बागेतून पळवून नेतो - राजा अर्धे राज्य- आणि राजकुमारीशी विवाह लावून देण्याची दवंडी पिटतो - एखादा गरीब घरातला पण शूर  मुलगा प्रयत्न करायचे ठरवतो - त्याच्या प्रवासात भेटणारे प्राणी-पक्षी-साधू त्याच्या चांगल्या वागणुकीबद्दल त्याला वेगवेगळ्या जादूच्या गोष्टी देतात - त्या गोष्टींच्या साहाय्याने येणारे प्रत्येक संकट मोडीत काढून तो राजकन्येला सोडवून आणतो - मग थाटामाटात विवाह होतो आणि ते गुण्या गोविंदाने राज्य करू लागतात.

हेच सर्वसाधारण कथानक ऐकत लहानाचे मोठे झालो, (आणि मग मोठे होताना हळू हळू समजायला लागले - अर्धे राज्य मिळवणे वगैरे सोपी गोष्ट नाही.... )

पण आज सुचलेली फेरी टेल वेगळीच आहे, -- ही आहे सगळ्या फेरीवाल्यांबाबत...

आपल्या दारावर, सोसायटीत येणारे वेगवेगळे विक्रेते, फेरीवाले ह्यांच्या बाबत ऑब्सर्वेटिव असं बरंच काही असतं, कुणाचे कपडे... कुणाच्या वस्तू, कुणाकुणाच्या हातगाड्या/सॅक/बॅग्स.... पण, सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे त्यांचा 'आवाज'!

काहींचे आवाज अतिशय मंजुळ असतात... की आपण वैतागून म्हणतो ह्या असल्या आवाजाचा माणूस 'सेलस्मन' कसा झाला? तर काहीजण एकदम तारसप्तकांतच सुरू करतात...  पण एकजात झाडून सगळे फेरीवाले जणू आपल्याला चॅलेंज करत असतात कि फक्त आमच्या आवाजावरून काय विकायला आलोय ते ओळखणे शक्य असेल तर बोला... निदान काय विकायला आलंय ते पाहायला तरी बाहेर यावंच लागतं... आणि महिलावर्ग एकदा बाहेर आला... की १० पैकी ४ ठिकाणी तरी विक्री पक्की!!

बरं ओरडणं तर काय असतं एकेकाचं! - रद्दीवाला आठवतोय का? सायकलला कॅरिअर वर तराजू आणि हँडल ला भगदे पिशवी लावून फिरणारा?   तो तर कधीही 'रद्दी पेपर' असे नीट ओरडताना मी पाहिला नाहीये. आमच्या सोसायटीत साधारण ३-४ लोक येतात असे पण प्रत्येकाचे उच्चार वेगळे.... कधी ते दिपॉर दिपॉर असे ओरडतात, कधी पेपर आणि रद्दी एकत्र करून पेपॉSSर्दी असे ओरडतात. तर ह्याउलट गत बोहारणींची -> त्या फक्त भांडीयाँ..... भांडीईईई...... भांडीवालेंयाँ.... अश्या एकाच शब्दाचा फक्त शेवटचा स्वर काळी १ ते काळी ५ मध्ये फिरवत ठेवतात.

भाजीवाले तर अक्षरशः अक्खी मंडई वाहून आणल्यासारखे सगळ्या भाज्यांची नावे घेत ओरडत सुटतात... मग त्यात कोथिंबीर, चाकवत, पालक, मटकी, शेवगा, बीट, पडवळ, कांदापात, माठ, अळू, शेपू...... अरे रे... किती ह्या भाज्या! आणि भाजीवाले खूपच 'इनोव्हेटीव्ह' असतात बरं का...

टीव्ही वर नाही का एक मालिका संपून दुसरी सुरू होण्याआधीच्या काळाला "फीलर्स" म्हणतात.. त्यात जाहिराती किंवा नवीन मालिकांचे निवेदन किंवा गाण्याचे एखादे कडवे वगैरे दाखवतात... तसंच सोसायटी संपेस्तोवर त्यांच्या भाज्यांची नाव संपली तर पुन्हा पहिल्या भाजीपासून सुरू करायचे.. आणि समजा ते देखिल कमी पडले तर फीलर्स म्हणून ते अनेक भन्नाट वाक्य वापरतात....

"ताजी भाजी ताजी SSSSये... एकदा खानार तर परत बोलावणार....या मावशी स्वस्तात मस्त....डायरेक्ट मार्केटयार्ड मधून ........ किंवा सगळ्यात भारी म्हणजे - "शेतातून घरात... शेतातून घरात... "

 आजकाल, म्हणजे गेल्या ७-८ वर्षांत फर्निश्ड  फ्लॅट संस्कृतीमुळे रेडीमेड नक्षीदार कुंड्या, त्यामध्ये एक दोन फुले आलेली रोपे,  (ही फुले फक्त आपण विकत घेईपर्यंत टिकतात, त्यानंतर ची फुले येण्यासाठी मान्सूनचीच  वाट पाहावी लागते!   ) शोभेची फुले विकणाऱ्यांच्या संख्येत पण वाढ झाली आहे, ते लोक पण  फूलवाले, कुंडीवाले, झाडवाले... असं काहीतरी अस्पष्ट ओरडत असतात... आणि एखादी बाई "काय ओरडतं आहेत काही कळतं पण नाही... " म्हणत बाहेर आली की तिला ह्या फुलांची भुरळ पडलीच म्हणून समजा... त्याचाच भाग दुसरा म्हणून काय तर साड्यांचा गठ्ठा एका कापडात बांधून गल्लोगल्ली फिरणारे लोक  जयपुरी, राजस्थानी, काश्मिरी, चेन्नई, अश्या  जमतील तेवढ्या राज्यांची नावे घेतात - आता आपण कुठे प्रत्येक राज्यात फिरून बघतो की तिथला पॅटर्न कसा असतो ते!! त्याउपर  सिल्क, कॉटन, रॉयल पॅटर्न, जरी बॉर्डर, इ. इ. 'व्हरायटी' पण फीलर्स म्हणून जोडतात..

पाय्पोस्वाले(पायपुसणी वाले), जाडूवाले (झाडूवाले), ह्यांच्या स्वरबद्ध हाळी मध्ये फक्त 'रिदम' समजतो... पण पाय्पोस्वाला म्हणजे पायपुसणी विकणारा हे समजण्यासाठी घराबाहेर यावेच लागते.!

ह्या सगळ्या निरीक्षणानंतर फेरीवाले हा काही एका लेखात मावणारा विषय नाही हे माझ्या ध्यानात आले, परंतु हे रोज अनुभवणाऱ्या, जगणाऱ्या आणि पाहणाऱ्यांसाठी एक वेगळा पर्स्पेक्टीव्ह देण्याचा प्रयत्न   --- तुम्ही सुद्धा नीट निरीक्षण करा, आपल्या बालपणीच्या फेरीटेल्स पेक्षा ह्या फ़ेरी'वाल्यांच्या टेल् कितीतरी जास्त मजेदार  वाटू शकतात .

टीप: कोणत्याही फेरीवाल्याने वाईट वाटून घेऊ नये, इथे उपहास नसून फक्त मजेदार वर्णन करण्यात आले आहे   आनंद घ्या आणि आनंद द्या...

-

आशुतोष दीक्षित.