समीक्षक व साहित्यसंमेलनाध्यक्षपद

       समीक्षकांना सर्वसाधारण वाचक फारच कमी ओळखतात.मराठी विषय घेऊन बी. ए. एम.ए करणाऱ्यांनीच काय ते  थोडे बहुत समीक्षा वाङ्मय वाचलेले असते,त्यामुळे माझ्यासारख्या वाचकास प्रश्न पडतो की समीक्षक हे सर्व साधारण वाचकांना परिचित नसून ज्या साहित्य संमेलनास सर्वसाधारण वाचक वर्गच गर्दी करतो त्या संमेलनाचे अध्यक्षपद बऱ्याच वेळा या समीक्षकांनीच भूषवलेले ( की अडवलेले?) असते असे दिसते हे कसे काय ?अलीकडे श्री. रा.ग. जाधव, श्री .द. भि. कुलकर्णी,अशा समीक्षकांना साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद मिळाले व निवडणुकीतील राजकारणामुळे त्यांच्याविरुद्ध  अभिजात साहित्य निर्माण करणारे साहित्यिक पराभूत झाले आहेत.खरे पहाता काव्य,कथा,कादंबरी या प्रकारचे साहित्य निर्माण होते म्हणून समीक्षा या प्रकाराची निर्मिती होते म्हणजे एका दृष्टीने ते परावलंबी असते त्यामुळे स्वतंत्र साहित्य म्हणून त्याला अस्तित्वच नाही. त्यामुळे समीक्षकापैकी एकाद्याला साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद मिळणे ही गोष्ट अन्यायकारक आहे असे माझ्यासारख्या वाचकास वाटते.समीक्षकांसाठी वेगळेच साहित्य संमेलन ठेवून त्यांच्यापैकी एकाद्यास अध्यक्षपद द्यावे पण अखिल भारतीय साहित्य संमेलनास मात्र सृजनात्मक साहित्य निर्मिती करणाऱ्या व्यक्तीसच अध्यक्षपद मिळावे असा आग्रह धरणे योग्य ठरेल का?