विद्यार्थी 'दशा'

आजीची मऊ दुलई घेऊनी
स्वप्न जरा पाहता 
झोप मोडतो माझी गरजूनी
गजर 'सहा' वाजता .... ॥१॥
         
आई लगबग आंत येऊनी,
म्हणे, ऊठ बाळ आता
नको जाऊ पुन्हा झोपूनी
धम्मकलाडू उशिरा उठता..... ॥२॥
          
थोडं लोळूनी,
आळस देऊनी,
वदलो आईस,
कूस बदलूनी ..... ॥३॥
    
स्वप्न पाहूदे क्षणभर मजला,
सांगूनी येतो नव्या गड्याला
उद्या खेळूया खेळ आपूला
ही वेळ जायाची शाळेला ... ॥४॥
      
हळूच मजसी जवळ ओढूनी
आई बोलली कुशीत घेऊनी ...॥५॥
       
कोण बरे हा नवा सोबती,
नाव रे त्याचे काय?
पाढे खडखड म्हणतो आणि
धडे वाचतो काय? ... ॥६॥
         
छे गं!
पाढे नाहीत, धडेही नाहीत
शाळा त्याला नाही माहीत
बागडतो तो सख्यां सोबती
कान्हा म्हणूनी तया जाणती .... ॥७॥
         
स्वप्नी माझ्या तो आला
घेऊनी पेंद्या, राधाला
कधी न गेले ते शाळेला,
दप्तर लाऊनी पाठीला ... ॥८॥
       
मी'चं काम रोज सकाळी,
सहा वाजता उठावे?
दिनचर्या ही निमूट पाळूनी
थकूनी रातीला झोपावे? .... ॥९॥
      
मलाही वाटते पवन होऊनी
दाहिदिशांना व्यापावे
फुलपाखरू बनूनी फुलातील,
मकरंदासी तोषावे .... ॥१०॥
      
इथेची व्हावी गंमत गोळा,
आनंदाला उधाण यावे
बालवीरांसी करवूनी गोळा
आपण देखील खेळावे .... ॥११॥
        
सांग मला, आई जावे कसे?
स्वप्नामधल्या गावाला
जिथे विद्यार्थी 'दशा' नसे
अन, घोर नसे जिवाला .... ॥१२॥
     
    
बालमुखीचे बोल ऐकूनी
थक्क जाहली ती मम जननी
बोले मजसी वचन देऊनी
आज येऊ 'सर्कस' पाहूनी .... ॥१३॥
         
        
वचन 'सर्कस' पाहण्याचे
जणू आले मात्रा बनून
असंतोष हा शाळेवरचा
हवेत गेला विरून .... ॥१४॥