प्रश्नावली, संकल्पना- सुवर्णमयी
थोडक्यात ओळख-
ललितलेखन-अक्षर, सत्यकथा, ललित, दीपलक्ष्मी, मिळून साऱ्याजणी, शब्द, अमृत, स्त्री, अनुभव...
सदरलेखन- महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, मेनका, साधना, अंतर्नाद...
कथा- आवाज, अक्षर, लोकसत्ता, अनुभव (इत्यादी दिवाळी अंक) किर्लोस्कर
ललित लेख संग्रह- चौकस आणि तिरकस
उपसंपादक - दै मुंबई सकाळ, दै मराठा
निर्माता- मुंबई दूरदर्शन वृत्तविभाग, माहितीपट आणि वृत्तविषयक कार्यक्रम निर्माता
२००७ महाराष्ट्र राज्य वाड्मय पुरस्कार -बिननावाचा माणूस- कथा संग्रह -
जयवंत दळवी पुरस्कार- अवाक्षर (विनोदी साहित्य)
वि मा दि पटवर्धन विनोदी साहित्यलेखन पुरस्कार- अवाक्षर
बिननावाचा माणूस या तुमच्या कथा संग्रहाला महाराष्ट्र राज्य वाड्मय पुरस्कार मिळाला. त्या कथासंग्रहाविषयी सांगाल का?
बिननावाचा माणूस ’ मध्ये त्याच नावाची एक कथा आहे. मी स्वत: अनुभवलेल्या प्रसंगातून त्या कथेचा जन्म झाला. निरूद्देश भटकायची मला आवड आहे. एक दिवस असंच शहरात भटकत असता मी अचानक शून्यावस्थेला गेलो. माझी संपूर्ण स्मृतीच गेली. मी कोण, माझं नाव काय, मी कुठं आहे, कुठं चाललोय.. मला काहीच लक्षात येईना, आठवेना. नाव माहीत नसल्यानं मी किती शिकलोय कुठे काम करतोय वगैरे आठवायचा प्रश्नच नव्हता. मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. सुदैवानं ही अवस्था पाच सहा मिनिटं टिकली. या अनुभवाचं आणि त्यातून निर्माण झालेल्या गुंत्यांचं मी नंतर कथेत रूपांतर केलं. वेगवेगळ्या अंकात प्रसिद्ध झालेल्या माझ्या कथांचं पुस्तकरूपात संकलन करण्याचा उपक्रम तेव्हा चालू होता. आवाज दिवाळी अंकासाठी मी ती कथा पाठवून दिली. आणि संग्रहातही समाविष्ट करण्यासाठी प्रकाशकालाही पाठवून दिली. गेली दहा-बारा वर्षे मी आवाज आणि इतर काही अंकात लिहितो आहे. पण माझ्या एकाही कथेला अशा प्रकारची सत्यघटनेची पार्श्वभूमी नव्हती. संग्रहाला आकर्षक नाव देण्यासाठी पण मला ही कथा उपयोगी पडली. या कथासंग्रहाचा फायदा म्हणजे त्यातल्या दोनतीन कथांचं एकांकिकेत रूपांतर करण्याची परवानगी विचारणारे दोन-तीन फोन आले. आणखी एका दोघांनी दोन जणांनी काही कथासूत्रांचा आधार घेऊन सिनेमा काढण्याची इच्छा दर्शवली. पण त्यांनी सुचवलेले बदल मला कथेच्या आशयाला धक्का पोचवणारे वाटल्यानं आमची बोलणी फिसकटली.
आज संकेतस्थळे, अनुदिनी, सोशल मिडिया या सर्वांचा वापर करून जगभरातून मराठी माणसे व्यक्त होत आहेत. अशा संकेतस्थळांवर तुमचा सहभाग असतो का? तुम्ही तेथे वाचन करता का? तुमच्या लेखनावर तिथे प्रतिसाद कसा असतो?त्यावर तुमची काय प्रतिक्रिया असते? या सर्व ठिकाणी मुद्रितमाध्यमापेक्षा काय वेगळेपणा तुम्हाला जाणवला आहे?
संकेतस्थळावर लिहायला मी फारसा उत्सुक नसतो. पण माझे सारे मित्र तो उद्योग करत असल्यानं त्यांच्या आग्रहाखातर मी लिहीत आलो आहे. पण त्या माध्यमाविषयी अनास्था आणि निरक्षरता इतकी की मी ती स्थळं उघडून पाहण्याचे प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे त्याचा वेगळेपणा जाणवतो का या तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला देता येणार नाही. पण संकेतस्थळावरल्या वाचकात तरुणांचा समावेश अधिक असतो. या आजच्या पिढीपर्यंत आपलं लिखाण पोचावं असं मला निश्चित वाटतं. तेव्हा एकीकडे या माध्यमाबद्दल आकर्षणही आहे. चांगल्या गुणवत्तेचं लिखाण तिथं होते; ते ललित असते, वैचारिक असते आणि साहित्यिकद्दष्टया उंचीचं असतं याची मला जाणीव आहे. आणि असं चांगलं वाईट दर्जाचं लेखन सर्व प्रकारच्या माध्यमात होतं. गेले दोन चार महिने मी फेसबुकवर बराच रमलोय. खूप गुंगवणारं माध्यम आहे ते. फेसबुकचं व्यसन का आणि कसं लागतं याचा मला आता अंदाज येऊ लागला आहे. तरीपण या माध्यमात जी क्षमता आहे त्याचा प्रभावी वापर आपण लोक, खास करून तरुण वर्ग करत नाही अशी माझी तक्रार आहे. संकेतस्थळांच्या वापराबद्दलही अशीच काहीशी तक्रार आहे.
संकेतस्थळांकरता लेखन करण्याचा तुमचा विचार आहे का?
संकेतस्थळावरचा वावर वाढवायची माझी इच्छा आहेच. पण त्यावरलं लिखाण कोण वाचतं याबद्दल मी साशंक आहे. हा सर्व्हे एकदा घेतला पाहिजे. तुम्हा मंडळींनी तो घेतलाही असेल. पण नवनवी माध्यमं वापरली पाहिजेत. निदान प्रयोगादाखल तरी वापरली पाहिजेत . प्रॉब्लेम असा की माझं बरचसं लिखाण मुख्य प्रवाहाच्या विरोधात आहे आणि ते वाचकांना काहीसं प्रक्षोभक वाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी स्वत:हून त्यासाठी कोणाला ऍप्रोच करत नाही.
भाषा प्रवाही असते, ती बदलते. पण जास्तीत जास्त मराठी शब्द लेखनात /व्यवहारात वापरणे याचा फायदा होईल असे आपल्याला वाटते का?
भाषा प्रवाही असते हे खरं आहे. पण हा प्रवाह संथ असतो. काळाच्या ओघात दुसऱ्या भाषेतले शब्द भाषेत येऊन दाखल होतात. त्या भाषेशी ते एकजीव होतात. इंग्रजीनं भारतीय भाषांतले शब्द घेतलेत, इटालियन, प्रेंच्च शब्दही घेतलेत. आपण हे उदाहरण नेहमी देत असतो. पण इंग्रजी भाषेत एकूण शब्दभांडार किती; त्यांच्या शब्दकोशात परक्या शब्दाचं प्रमाण किती या तपशिलात आपण शिरत नाही. ते दहा टक्केही नसेल. मराठी भाषिकांत इंग्रजी, हिंदी शब्द अकारण वापरायचा जो प्रकार चालू आहे तो मात्र वेडपटपणाचा आहे. तरुण पिढी इंग्रजी माध्यमात वाढली आहे (म्हणजे आपणच वाढवली आहे ) त्यामुळे हे घडतं. त्यांनी धेडगुजरी भाषा बोलण्याऐवजी इंग्रजीत बोललेलं मला अधिक आवडेल.
अर्थात इंग्रजी शब्दानं काही सोयीदेखील केल्या आहेत. उदाहरणार्थ: मुतारी, संडास याला टॉयलेट हा इंग्रजी शब्द सर्रास वापरला जातो.तो शब्द सर्वांनाच संडास या शब्दापेक्षा सॉफिस्टकेटेड वाटतो. स्त्रियादेखील अनोळखी पुरुषाला इथं टॉयलेट कुठं आहे म्हणून विनासंकोच विचारू शकतात. आभारी आहे बोलण्यासाठी प्रयास पडतात. थॅक्स सहज बोलून मोकळं होता येतं. सकारण आणि अकारण वापरल्या जाणाऱ्या परकी शब्दांची यादी आपण तयार केली पाहिजे. आणि याबद्दल काय करायचं विचार केला पाहिजे. पण जिथं मराठी शब्द चांगल्यापैकी रूढ आहेत तिथं परके शब्द वापरू नयेत हे सांगायची गरज का भासावी मला समजत नाही.
ही संकेतस्थळे, ऑनलाईन प्रकाशने मुद्रितमाध्यमाच्या बरोबरीने काम करतील असे संकेतस्थळांवर लेखन करणाऱ्या वाटते. समांतर व्यक्त होत राहण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे असे तुम्हाला वाटते का?
मुद्रित माध्यमाच्या बरोबरीनं हे माध्यम काम करील असं तुम्हाला वाटतं हे चांगलं आहे, पण यात मला तुमची अल्पसंतुष्टता दिसते. कारण आधीच मुद्रित माध्यमाचा वाचकवर्ग रोडावत चालला आहे. मी चांगल्या अर्थपूर्ण साहित्याबद्दल म्हणतोय. मजेत कस्ये जगावे. कोट्यधीश कसे बनाल या सारख्या वाङ्मयाबद्दल नाही. गंभीर लेखन म्हणजे वैचारिक आणि समीक्षात्मक असं मी मानत नाही. मला विनोदी लेखनही गंभीर वाटतं. तेव्हा मुद्रित माध्यमाशी बरोबरी करणं हे काही मी चांगलं लक्षण मानत नाही. तुमची झेप पलीकडली हवी. तेव्हा नवं माध्यम मुद्रित वाङ्मयाला समांतर वगैरे हवं दळभद्री आकांक्षा बाळगू नका. या माध्यमाची समाज शिरकाव शक्ती प्रचंड आहे असं मी ऐकून आहे. त्यामुळे तुमची स्वप्नं थोडी मोठी असायला हरकत नाही.
नवे प्रयोग करताना विचाराऐवजी अविचार करणं अधिक फायद्याचं असतं असं मी म्हणेन. शिलालेख जाऊन धूळपाट्या आल्या, नंतर पाटी-पेन्सिल आली कागद पेन आलं, टाईपरायटर आला आणि आता संगणक आणि नेट आला. हे सर्व चालूच राहणार. एक सत्य नजरेआड करून चालणार नाही. ही सर्व साधनं आहेत. त्यांचा वापर करणाऱ्यापाशी मुळात सांगण्यासारखं काही तरी हवं आणि ते सांगण्याची ऊर्मी हवी. आपल्या समाजात असे किती आहेत?
व्यक्त होण्याची गरज वाढली आहे. व्यक्त होताना कविता हा फॉर्म जास्त हाताळला जातो. मुद्रित माध्यमात आणि संकेतस्थळावरची आजची ही कविता किती सशक्त आहे?
व्यक्त होण्याची गरज वाढली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर गेल्या पंधरा वर्षात लोकसंख्याही वाढली आहे. म्हणजे व्यक्त होण्यास उत्सुक असलेले पंधरा वर्षापूर्वी शंभर असतील तर आता हजार झाले असतील म्हणून खूश होण्यात काही मतलब नाही. व्यक्त व्हायला उत्सुक नसलेले पूर्वी पाचशे होते ते आता वीस हजार झाले आहेत त्याचं काय? तरीपण व्यक्त होऊ पाहणाऱ्यांना एकत्रित आणायचे प्रयत्न तुम्ही किंवा इतर कोणी करत असतील तर त्याला माझा पाठिंबा आणि सक्रिय सहकार्य राहील. समाजात एखाद्या विषयावर मत व्यक्त करू पाहणारे किती आहेत याचा अंदाज घ्यायचा असेल तर लग्न वा वाढदिवस समारंभासाठी जमलेल्या लोकांशी बोलून पहा. माझा याबाबतचा अनुभव निराशाजनक आहे.
कविता हा फॉर्म मला देखील आवडतो. पण संकेतस्थळावरल्या कवितेचा दर्जा खूपच बाळबोध वाटतो. शाळा कॉलेजानंतर या कविलोकांनी हातात कवितेचं पुस्तक घेतलेलं नाही असं त्यांच्या कविता वाचून वाटतं. विशिष्ट वयात सगळेच कविता करतात. वय वाढल्यानंतर जे कविता करणं चालू ठेवतात ते कवी. मग त्यांच्या कवितांचा दर्जा कसा का असेना. संकेतमाध्यमावरची आजची कविता अशक्त असण्याचं कारण कविता लिहिणाऱ्या सगळ्यांनाच आपण कवी म्हणतो. ते जे लिहितात त्याला आपण कविता म्हणतो. कविता करणं ही इतकी सोपी गोष्ट आहे का? संकेतस्थळावर मी वाचलेल्या कवितांपैकी बऱ्याच प्रेमकविता
आहेत. प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी कवितालेखन करू नये असं मला म्हणायचं नाही. पण कवितेतून त्या पलीकडील बरंच काही व्यक्त करता येते. कविता हा एक अवघड वाङ्मय प्रकार आहे आणि त्याकडे अधिक गांभीर्यानं पाहिलं पाहिजे असं मला वाटतं.
मनोगतावर छंदबद्ध कविता करणारे आहेत. ही मनोगताची परंपरा आहे असे म्हटले तरी चालेल. आज छंदबद्ध कविता कालबाह्य होते आहे असे तुम्हाला वाटते का? आशय आणि लय असणारी कविता किती प्रमाणात लिहिली जाते?
कवितेत काळानुसार बदल होत गेले. आणि प्रत्येक बदलानं हे माध्यम अधिकाधिक विकसित होत गेलं. छंदोबद्ध कवितेकडून छंदमुक्त कविता हा उत्क्रांतीचा प्रवास आहे. काव्याच्या प्रकटीकरणात छंदाचा अडथळा वाटू लागला त्यातून मुक्तछंद अस्तित्वात आला हे जाणून घेतलं पाहिजे. मुक्तछंदानं कवीच्या प्रतिभेला मुबलक स्वातंत्र्य उपलब्ध करून दिलं. मीटरसाठी शब्दयोजना करायचे, ओढून ताणून यमक जुळवायचे प्रकार त्यामुळे थांबले. छंदबद्ध कविता गौण दर्जाची आणि मुक्तछंदात लिहिलेली कविता श्रेष्ठ असा अर्थ यातून काढू नये. चांगली-वाईट कविता दोन्ही प्रकारात आढळते. छंदमुक्त कवितेच्या पुरस्कर्त्यांनी छंदबद्ध कवितेकडे तुच्छतेनं बघणं बरोबर नाही. आणि छंदबद्ध कवितेच्या पुरस्कर्त्यांनी छंदमुक्त कवितेकडे तुच्छतेनं बघणं योग्य नाही. मला छंदमुक्त कविता अधिक जवळची वाटत असली तरी छंदबद्ध कविता वाचत मी लहानाचा मोठा झालो आहे हे लक्षात घ्या. त्या कवितेचे संस्कार मी विसरू शकत नाही. तेव्हा छंदोबद्ध कविता तुमच्या संकेतस्थळाची परंपरा असेल तर त्यात गैर काहीच नाही. शेक्सपिअरचं नाटक आजही मोलाचं आहे. पण एखादी नाटक कंपनी शेक्सपिअरचीच नाटकं जन्मभर करत राहिली तर ते काही बरोबर नाही. यात त्यांचं नुकसान आहे.
तेव्हा तुमची परंपरा चालू ठेवा. पण त्या परंपरेबाहेर असलेल्या कवितांना वेशीबाहेर ठेवू नका. छंदमुक्त कवितेत फसवी आणि दर्जाहीन कविता लिहिली जाते असं तुमचं निरीक्षण असेल तर ते पटण्यासारखं आहे. छंदाचं बंधन नसल्यानं छंदमुक्त कवितेच्या नावाखाली काहीबाही रचना केल्या जातात याची मला कल्पना आहे. पण त्या श्रेष्ठ म्हणून उचलून धरल्या जात नाहीत. उत्तम कविता छापण्याचं धोरण अवलंबलं तर दोन्ही गटातील कविता संकेतस्थळावर टाकता येतील. छंदात लिहिलेल्या कवितेची काही बलस्थानं निश्चित आहेत, नव्या पिढीला तिचा परिचय घडवून देण्यासाठी तुम्ही तशा कविता अवश्य प्रसिद्ध करा. पण केवळ छंदबद्ध कविता छापायचा हट्ट धरू नका एवढंच मला सांगायचं आहे. आजकाल संस्मरणीय अशी काव्यरचना क्वचित आढळते. चांगले संगीत कमी कानावर येते, चांगले सिनेमे, नाटकंही कमी असतात. मला विचाराल तर चांगल्या कलाकृती कमीच असाव्यात असं मला वाटतं. अनेकदा दर्जाहीन कलाकृतांठ्ठमुळेच दर्जेदार कलाकृतींचं आणि कलाकारांचं मोल आपल्याला कळतं. सगळेच कालिदास जन्मले तर कठीणच होऊन बसेल. साहित्यिकक्षेत्रात जातीयता टाळून आपण सर्वसमावेशक राहूया असं मी तुमच्याबरोबर मला स्वत:लाही सांगतोय.
अधिकाधिक मराठी व्यक्तींनी एकमेकांशी मराठीत संवाद साधावा याकरता कोणते उपाय करता येतील?
मराठी व्यक्तींनी एकमेकांशी मराठीतून संवाद साधावा यासाठी काही करता येईल असे मला खरंच वाटत नाही. माणसांनी एकमेकांशी आपणहून संवाद साधावा याची देखील सक्ती तर करता येत नाही. मग तो मराठीतून साधावा अशी सक्ती कशी
करता येईल. मला हे कठीण वाटतं. संवादासाठी कोणत्या भाषेचं पर्यावरण निवडावं हे ज्याचं त्यानं ठरवावं. आपण एकमेकांसाठी मराठी भाषेतून व्यवहार करतो तो आपल्या आनंदाचा भाग असतो. मराठी भाषेचं संवर्धन व्हावं म्हणून काही आपण हे करत नाही. आता तुम्ही लोक जे संकेतस्थळ चालवण्याचं काम करता त्यातही तुमचा आनंद दडलेला आहे. अप्रत्यक्षरीत्या त्यातून भाषेचं भलं होतं ही गोष्ट निराळी. मराठी भाषेवर मनापासून प्रेम करणारे लोक आज विखुरलेले आहेत.
त्यांचं संघटन करणं गरजेचं आहे. काम तुमच्यासारखी माणसं हे काम करत आहेत. ज्यांना या भाषेविषयी आस्था आहे त्यांची आस्था टिकवून धरणं एवढं आणि एवढंच काम आपण करू शकतो. आणि हे काम सोपं नाही. मला हाच चांगला उपाय वाटतो.
मराठी जनांव्यतिरिक्त कितीतरी अमराठी लोक आहेत ज्यांना मराठी भाषा शिकायची इच्छा आहे. त्यांच्या शिक्षणाची सोय करणं हे दुसरं काम. अशा संस्था सुरू करता येतील का हे पाहिलं पाहिजे. मुंबईत जपानी भाषेचे वर्ग आहेत, बंगाली, कन्नड, प्रेंच्च भाषेचे आहेत. मी स्वत: बंगाली क्लासला जाऊन थोडंफार बंगाली शिकलो आहे. मराठी भाषा शिक्षणाची काही सोय करता येईल का हे पाहिलं पाहिजे. मातृभाषेइतकंच लोकांना इतर भाषेविषयी प्रेम असतं. आपण लक्षात घ्यायला तयार नाही. संवाद साधायचा नुसता आग्रह उपयोगाचा नाही. ज्यांची मनापासून असा संवाद साधायची इच्छा आहे त्याच्यापर्यंत पोचायसाठी काय करता येईल याचा विचार करूया.
मराठीच्या वापराबरोबर लेखकाकडून, वाचकांकडून , प्रतिसाद देणाऱ्याकडून शुद्धलेखनाची अपेक्षा करणे आज किती प्रमाणात शक्य आहे असा आपला अनुभव आहे?
शुद्धलेखनाची दहशत निर्माण करण्याला माझा विरोध आहे. शुद्धलेखनाला घाबरून मराठी लिहिण्यापासून कोणी परावृत्त होत असेल तर शुद्धलेखनाचा आग्रह धरणं मला क्रिमिनल वाटते. भाषा आपले विचार व्यक्त करण्यासाठी आहे. व्याकरणामुळे अभिव्यक्तीवर दडपण येत असेल तर व्याकरण सोपे करायचे प्रयत्न झाले पाहिजेत. शुद्धलेखनाचे नियम पाळण्याची अपेक्षा धरावी. पण ते कुणी पाळले नाहीत तर त्याला तुच्छ लेखू नये. त्याची अडचण समजून घ्यावी. क्रीडांगण मधला क्री अनेकजण ऱ्हस्व काढतात. गल्लोगल्लीतल्या क्रीडा मंडळांच्या बोर्डावर क्री ऱ्हस्वच लिहिलेला असतो. पण म्हणून त्या मंडळाच्या कार्याकडे, कामगिरीकडे दुर्लक्ष करता येत नाही. मराठी भाषा बहुजनांपर्यंत न्यायची असेल तर व्याकरणाच्या बाबतीत कठोर धोरण स्वीकारून चालणार नाही. भाषा टिकवायची आहे की व्याकरण हे एकदा ठरवावं.
एक लेखक घडवण्यामध्ये मासिकाच्या/ प्रकाशनाच्या संपादकांचा सहभाग असतो हे आपल्याला मान्य आहे का? आपण अनेक नियतकालिके, अनियतकालिके आणि मासिके यात लेखन केले आहे.कोणत्या संपादकांबरोबर काम करायला आपल्याला आवडेल? किंवा जास्त आवडले?
लेखक घडवण्यामागे प्रकाशनांच्या संपादकांचा, प्रकाशकांचा सहभाग असतो हे नाकारता येणार नाही. पण केवळ त्यांचाच सहभाग नसतो इतरही अनेक घटक आहेत जे लेखकाच्या जडणघडणीला हातभार लावतात. लेखकाचं बौद्धिक पर्यावरण, त्याचा मित्रपरिवार, शाळा महाविद्यालयात त्याला लाभलेले शिक्षक, त्याचा स्वत:चा वाचन व्यासंग, लेखनाची ऊर्मी आणि लेखनमेहनत असे इतरही घटक आहेत हे या संदर्भात लक्षात घेतलं पाहिजे. लेखकाला संपादकांपर्यंत पोचवायचं काम हे घटक करतात.
उमाकांत ठोमरे, चंद्रकांत खोत, निखिल वागळे, विनायक पडवळ, मधुकर पाटकर, सुहास कुलकर्णी-आनंद अवधानी, भानू काळे, दिनकर गांगल, विद्या बाळ अशा मंडळीबरोबर मी काम केलं आहे. सर्वांनीच आपआपल्या परीनं माझं लेखन घडवण्यात मोलाचा हातभार लावला आहे. अनुभवचे सुहास कुलकर्णी, महाराष्ट्र टाइम्सच्या रविवार पुरवणीचे दिनकर गांगल आणि अंतर्नाद मासिकाचे संपादक भानू काळे यांच्याबरोबर काम करताना मला विशेष आनंद मिळाला हे मला मुद्दाम नमूद करायला आवडेल. माझ्या लेखन-विचारांमध्ये अजिबात हस्तक्षेप न करता त्यांनी मला वेळोवेळी जे मार्गदर्शन केलं ते मी विसरू शकत नाही.
सविस्तर उत्तरे पाठवल्याबद्दल अवधूर परळकर यांचे आभार.
अवधूत परळकर यांची लोकसत्तामधील मुलाखत इथे वाचता येईल दुवा क्र. १