आज हुतात्मा प्रफुल्ल चाकीचा १०५वा हौतात्म्यदिन

आज दिनांक २ मे, आज हुतात्मा प्रफ़ुल्लचंद्र चाकीचा १०५ वा हौतात्म्यदिन.

प्रफुल्ल चाकीचा जन्म पूर्व बंगालच्या बगुडा जिल्ह्यातील रंगपूर गावचा. पितृछत्र बालपणीच हरवलेला प्रफ़ुल्लचंद्र शालेय जीवनात देशकार्याकडे आकर्षित झाला आणि त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. पुढे क्रांतिकारकांशी ओळख होऊन प्रफुल्ल बरिंद्रनाथ व अरविंद घोष यांच्या ’युगांतर’ मध्ये सामील झाला. आपले आयुष्य त्याने देशाला वाहायचे ठरविले होते.

युगांतर मध्ये त्याने भाग घेतलेली पहिली मोठी कामगिरी म्हणजे बॅम्फिल्ड फुलर या जुलुमी अधिकाऱ्याच्या वधाचा कट. धुबडी ते रंगपूर दरम्यान रुळात बॉम्बं ठेवून त्याची गाडी उडवायची आणि त्यांतून तो वाचला वा स्फोट झाला नाही तर सरळ लाल दिवा दाखवून गाडी अडवायची आणि त्याला गाडीत घुसून मारायचे असे ठरले होते. ह्या कामगिरीत त्याच्याबरोबर हेमचंद्र कानुनगो होते. दुर्दैवाने बॅमफिल्डचा कार्यक्रम अचानक बदलला आणि तो रंगपूरला आलाच नाही व बेत रहित करावा लागला.

त्यापाठोपाठ दुसरी कामगिरी होती ती वंगभंगाची कल्पना साकारणारा कर्झनचा सल्लागार ऍण्ड्र्यु फ्रेजर च्या वधाची. त्याने मेदिनीपूर जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रस्तावही आणला होता आणि हा क्रूरकर्मा क्रांतिकारकांच्या डोळ्यात सलत होता. त्याला नारायणागढ स्थानका नजीक रुळात बॉम्बस्फोट घडवून ठार करायचा बेत आखण्यात आला मात्र तो अशा दोन प्रयत्नातून बचावला.

मात्र यातून प्रफुल्लची धाडसी, निडर वृत्ती व कार्यनिष्ठा क्रांतिकारकांच्या नजरेत भरली. त्याची निवड आता जुलुमी किंग्जफ़ोर्ड च्या वधासाठी करण्यात आली आणि त्या कामगिरीत त्याचा नवा साथीदार होता खुदिराम बोस! क्रांतिकारकांचे सर्व कार्य अत्यंत गुप्तपणे चालत असे, अनेकदा अनेकांना एकमेकांची खरी नावे देखिल माहीत नसायची. जर कुणी पकडला गेला तर इतरांना धोका निर्माण होऊ नये यासाठी असे करावे लागत असे. हा बेत आखला जाई पर्यंत खुदिराम आणि प्रफुल्ल यांनी एकमेकाला कधीही पाहिलेले नव्हते. त्यांची एकमेकांशी ओळख झाली ती दुर्गादास सेन {हरेन सरकार असाही उल्लेख आढळला} (खुदिराम) आणि दिनेश रे (प्रफुल्लचंद्र चाकी) अशी.

ठरल्याप्रमाणे मुजफ्फरपूरमध्ये ३० एप्रिल १९०८ च्या सायंकाळी किंग्ज्फोर्डच्या बग्गीवर हल्ला झाला, दुर्दैवाने बग्गी ओळखण्यात गफलत झाली; हल्ला झालेल्या त्या बग्गीत प्रिंगल कुटुंबातील महिला होत्या. मात्र तेव्हा या दोघांनाही त्याची कल्पना नव्हती. आपल्याला पाहिले असल्याने पोलिस जोडगोळीचा शोध घेतील/ पाठलाग करतील या तर्काने खुदिराम व प्रफुल्ल दोघेही वेगवेगळे झाले. खुदिराम दुसऱ्याच दिवशी म्हणजे १ मे रोजी वायनी येथे पोलिसांच्या हाती लागला. प्रफुल्ल लपत छपत समस्तीपूर येथे पोचला. पोटात अन्नाचा कण नाही, पायात वहाणा नाहीत, सतत धावणे आणि पकडले जाण्याचे भय यामुळे गलितगात्र झालेल्या प्रफ़ुल्लला एका सामान्य माणसाने आश्रय दिला. अनेकदा सामान्य माणसेही प्रत्यक्ष स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेता आला नाही तरी आपल्या परीने मदत करू पाहतात. असाच एक होता सरकारी नोकर असलेला त्रिगुणचरण घोष. तहान, भूक व भयंकर उन्हाळ्यामुळे जवळ जवळ बेशुद्ध होऊन गवतात पडलेला प्रफुल्ल त्याच्या दृष्टीस पडला. एव्हाना मुजफ्फरपूरच्या घटनेची वार्ता त्यालाही समजली होती. देशासाठी काही करायचे असले तर ती हीच वेळ आहे असे मानून त्याने त्या मुलाला घरी नेले, खाऊ पिऊ घातले, कपडे व पायताणे दिली व तिकिटाचे पैसे देऊन त्याला रात्रीच्या गाडीतही बसवून दिले.

कलकत्त्यास जाण्यासाठी मोकामाघाटला उतरून जावे लागणार होते. प्रवास सुरू झाला आणि सुखरूप निसटलेल्या प्रफ़ुल्लच्या नशिबाने दगा दिला. त्याच गाडीमध्ये त्याच डब्यात आपली रजा संपवून आपल्या घरून नोकरीवर रुजू होण्यासाठी निघालेला पोलिस उपनिरिक्षक (साध्या वेषात असलेला) नंदलाल बॅनर्जी नेमका शिरला व प्रफुल्ल समोर येऊन बसला. तो मुजफ्फरपूरहुन आपल्या वकील असलेल्या आजोबांच्या घरून निघाला होता. त्याला बॉम्बं हल्ल्याची हकिकत समजलेली होती. समोरचा नवे कपडे व नव्या कोऱ्या वहाणा घातलेला मुलगा पाहून त्याला संशय आला आणि त्याने प्रफ़ुल्लशी संवाद साधायचा प्रयत्न केला. त्या भोळ्या मुलाला हा माणूस पोलिस असेल अशी शंकाही आली नाही. नंदलालचा संशय बळावला. वाटेत शिमुराईघाट स्थानकात गाडी थांबताच तो पाणी पिण्याच्या निमित्ताने उतरला व त्याने स्टेशनमास्तरच्या कचेरीतून थेट मुजफ्फरपूर पोलिस व न्यायाधीश वुडबर्न यांच्याशी संपर्क साधून प्रफुल्लच्या अटकेचा बंदोबस्त केला. गाडी मोकामाघाट स्थानकात येताच, प्रफ़ुल्लाने त्याचे सामान उतरवायला त्याला मदत केली. त्याला तिथेच उभा करून, आलोच जरा असे म्हणत तो स्टेशन मास्तरकडे गेला व त्याने पोलिस कुमक घेतली. नंदलालला पोलिसांबरोबर येताना पाहून प्रप्फ़ुल्ल चमकला. नंदलालने पोलिसांना प्रफ़ुल्लला धरायचा आदेश दिला. प्रफ़ुल्लने विस्मयाने त्याला विचारले की बाबारे एक बंगाली असून तू मलाच या परक्यांना पकडून देणार? त्याने शिताफीने पोलिसाला चकवत त्याला ढकलून पाडले व खिशातून आपले ब्राउनिंग पिस्तूल काढले. ते पिस्तूल त्याने विश्वास घातकी नंदलालवर रोखले मात्र त्याने ती गोळी चुकविली. एव्हाना पोलिसांचा गराडा पडला होता. पोलिसांच्या स्वाधीन होण्याआधी प्रफ़ुल्लने स्वतःवर दोन गोळ्या झाडल्या. एक छातीवर तर दुसरी हनुवटीतून वर आरपार आणि तो तिथेच कोसळला.

पोलिसांनी त्याचे मस्तक धडावेगळे केले व स्पिरिटमध्ये बुडवून कलकत्त्याला पाठवून दिले. ते बहुधा ओळख पटविण्यासाठी पाठविले असावे. प्रफ़ुल्लचे बलिदान २ मे चे, एव्हाना १ मे रोजी दुसरा आरोपी सापडल्याचे वृत्त पोलिसांना समजले होते व त्या सापडलेल्या आरोपी करवी मृताची ओळख पटावी म्हणून पोलिसांनी ते अमानुष कृत्य केले. पुढे ते मस्तक पोलिसांनी ठाण्याच्या आवारात पुरले. अगदी अलीकडे या कवटी संबंधी बराच वाद निघाला होता आणि अनेक विभागांत चौकश्या झाल्या होत्या, अनेकांनी कानावर हात ठेवले होते.

फौजदार नंदलाल बॅनर्जी यांना सरकारने जाहीर केलेला एक हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला. मात्र याहूनं मोठे इनाम अजून मिळायचे होते. ’तुझ्या देशद्रोही नातवाचे दिवस भरले आहेत आणि लवकरच त्याला आम्ही यमसदनास धाडणार आहोत’ असे एक पत्र नंदलालच्या मुजफ्फरपूर येथे सरकारी वकील असलेल्या आजोबांना मिळाले. आणि अवघ्या सहा महिन्यात म्हणजे ९ नोव्हेंबर रोजी नंदलाल कामानिमित्त कलकत्त्यात आला तेव्हा त्याला क्रांतिकारकांनी पाळत ठेवून १००/२ सरपंटाईन स्ट्रीट येथे त्याला गाठले व गोळ्या घालून त्याला यमसदनास धाडले व विसाव्या शतकातील देशासाठी सर्वप्रथम आत्मार्पण करणाऱ्या हुतात्मा प्रफुल्ल चाकी याला श्रद्धांजली दिली.

अनेक क्रांतिकारकाप्रमाणे हुतात्मा प्रफुल्ल चाकी सुद्धा अज्ञात राहिला व काळाच्या पडद्याआड गेला. अगदी अलीकडे कलकत्त्याचे एक पत्रकार मानस बॅनर्जी यांचे पत्रकारितेतील गुरु श्री प्रशांत दत्त यांनी बोलवून घेत त्यांना एका दुकानातून घेतलेल्या वस्तुच्या वेष्टनासाठी वापरलेल्या वर्तमानपत्राचा तुकडा दाखविला. त्यात मुजफ्फरपूर येथील एका उद्यानातील हुतात्मा खुदिराम बोस यांच्या पुतळ्याचे चित्र होते व सोबत एक झाकलेला पुतळा दिसत होता. जर मानस हे कधी तिकडे गेले तर त्या उद्यानाला भेट देऊन तो पुतळा कुणाचा आणि झाकलेला का? याची माहिती काढ असे त्यांनी सांगितले. योगायोगाने मानस बॅनर्जी कामानिमित्त पाटण्याला गेले असता ते मुजफ्फरपूर येथे गेले. तेथे त्यांना अशा उद्यानाचा ठावठिकाणा कुणी सांगू शकले नाही. अखेर एका रिक्षावाल्याने त्यांना बरोबर तेथे नेले. तिथे त्यांना हुतात्मा खुदिराम बोसचा व दुसरा झाकलेला असे दोन्ही पुतळे दिसले. मात्र झाकलेल्या पुतळ्याची कुणालाही माहिती नव्हती. अखेर खुदिराम-प्रफुल्ल स्मारक समितीच्या एका सदस्याची गाठ तिथे पडली ज्याने तो पुतळा हुतात्मा प्रफुल्ल चाकीचा असल्याचे सांगितले व ’अनावरणाच्या वादामुळे’ तो असाच झाकलेल्या अवस्थेत असल्याचे सांगितले व तो निघून गेला. मात्र तिथे एक अतिशय वृद्ध व दृष्टी अधू असलेल्या एका म्हाताऱ्याने त्यांना गाठले व त्याने हुतात्मा खुदिराम-प्रफुल्ल यांनी ज्या आंब्याच्या झाडाआडून बॉम्बं फेकला ते झाड दाखविले व संपूर्ण हकिकत ऐकविली. ’इथे ना फलक ना माहितीपत्र मग लोकांना या मुलांचे दिव्य समजणार कसे? तो म्हातारा कर्तव्यदबद्धिने ती हकिकत तिथे येणाऱ्यांना वर्षानुवर्षे सांगत आहे, कुणी त्याला वेडा वा भिकारी समजतात कधी लोक दोन पैसेही देतात, मात्र तो म्हातारा आपले कर्तव्य करतो आहे. मात्र लवकरच ’कलकत्त्याहून पत्रकार येऊन गेल्याची बातमी पसरली आणि श्री नितिशकुमार यांच्या हस्ते हुतात्मा प्रफुल्ल चाकी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

हुतात्मा खुदिराम, हुतात्मा प्रफुल्ल, बरिंद्रनाथ, अरविंद घोष, सुप्रसिद्ध ’अलिपूर खटला’ उर्फ ’माणिकतल्ला कट’ या सर्वांचा व आपला खूप जवळचा संबंध आहे. हे बॉम्बं बनले कसे? तर त्यामागचे प्रेरणास्थान आहे स्वातंत्र्यवीर सावरकर व तेथे प्रत्यक्ष जाऊन बॉम्बं बनविणारे सेनापती बापट! याच अभियोगात ’बाळकृष्ण हरी काणे’ हे एक अस्सल मराठी नावही आहे’ पुढे ते अपिलात निर्दोष सुटले. होते केवळ त्यांच्या नावाचे चिटोरे घटनास्थळी सापडल्याने त्यांना संशयित म्हणून अटक झाली होती. ते मूळचे यवतमाळचे होते व बहुधा त्यांना अमरावतीचा दादासाहेब खापर्डे यांनी स्फोटकविद्या शिकण्यासाठी तिथे पाठविले असा उल्लेख आहे. हुतात्मा प्रफ़ुल्लने जे पिस्तूल वापरले ते ब्राउनींग बनावटीचे होते. १९०९ मध्ये स्वा. सावरकरांनी २० ब्राउनिंग पिस्तुले हिंदुस्थानात पाठविली होती व त्यातलेच एक हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे याने जॅक्सन वधासाठी वापरले होते. कदाचित प्रफ़ुल्ल्कडचे हे पिस्तुलही स्वा. सावरकरांनीच पाठविलेले असावे.

वयाच्या १९ व्या वर्षी तेजस्वी बलिदान करणाऱा क्रांतिकारक हुतात्मा प्रफुल्ल चाकी याला त्याच्या १०५ व्या हौतात्म्यदिनी सादर वंदन.