मांबा, सिंबा, मांबा ------- ३

   डालचा तिसरा अनुभव हिरव्या माम्बाविषयी आहे. डाल लिहितो,
"एका रविवारी फुलर नावाच्या माझ्या इंग्लिश मित्राने संध्याकाळी मला घरी बोलावले होते.तो दार एस सलामच्या कस्टम्स ऑफिसमध्ये काम करीत असे.एका दुमजली घरात आपली पत्नी व दोन मुले यांच्या समवेत तो रहात असे.हे त्याचे पांढऱ्या रंगाचे लाकडी घर एका हिरवळीच्या मैदानावर उभारलेले होते आणि सभोवताली नारळाच्या झाडांनी ते वेढलेले होते. मी त्या हिरवळीवर चालू लागलो आणि घरापासून जेमतेम वीस पावलांवर होतो तोच एक चांगलाच लांब हिरवा साप त्याच्या व्हरांड्यातून घरात प्रवेश करताना मला दिसला.त्याची चमचम करणारी हिरवीगार त्वचा आणि लांबी बघूनच काळ्या माम्बाइतकाच खतरनाक असा हा हिरवा माम्बा आहे हे ध्यानात आले आणि मी क्षणभर जागच्या जागी गोठूनच गेलो पण लगेचच सावरलो.आणि पळतच घराच्या मागच्या बाजूस गेलो.आणि फुलरला हाका मारल्या.
   फुलरच्या बायकोने वरच्या मजल्यावरील खिडकीतून डोके बाहेर काढीत विचारले,"काय झाले?"
’तुमच्या घरात आत्ताच एक लांबलचक हिरवा माम्बा व्हरांड्यातून आत शिरताना शिरताना मला दिसला"मी ओरडून म्हणालो.भांबावून गेलेल्या बायकोने "फ्रेड फ्रेड "अशा हाका मारल्या आणि फ्रेडचा चेहरा खिडकीतून डोकावला.आणि त्यालाही मी तीच बातमी दिली. पण फुलर मात्र थोडेही विचलित न होता माझ्याकडे पहात म्हणाला,"तू आता तिथेच थांब,मुलांना एक एक करत मी खाली सोडतो आणि तू त्यांना उतरवून घे."त्याने चेहरा अगदी शांत ठेवला होता आणि आवाजही मुळीच चढवला नव्हता
   प्रथम त्याने लहान मुलीच्या एका हाताच्या मनगटास पकडून खाली सोडले त्याबरोबर तिचे पाय पकडून मी तिला खाली घेऊ शकलो.तसाच त्यापाठोपाठ त्याने आपल्या मुलाला सोडले. नंतर फ्रेडने आपल्या बायकोलाही तसेच खालील बाजूस सोडले आणि मी तिच्या कमरेस पकडून तिला खाली घेतले .सगळ्यात शेवटी खिडकीच्या कडेस धरून खाली लोंबकळत त्याने खालच्या हिरवळीवर उडी मारली.आता त्याचे सर्व कुटुंब खाली आले होते.फुलरची बायको आपल्या मुलांना आपल्या बाजूला घेत उभी होती.कॉणाच्याच चेहऱ्यावर भीतीचे चिन्हही नव्हते.
"आता काय करायचे?" मी विचारले
"तुम्ही सगळे जण रस्त्यावर जा" फुलर म्हणाला,"मी सापपकड्या(snake-man)ला घेऊन येतो.
"हा सापपकड्या कोण?"मी कुतूहलाने विचारले.तोही आपल्यासारखा इंग्रजच आहे.वयस्कर आहे,आणि बरीच वर्षे इथेच स्थायिक झाला आहे."मिसेस फुलर म्हणाल्या."त्याला सापाचे वेडच आहे आणि तो कोणालाही ते मारू देत नाही.तो साप पकडतो आणि प्राणिसंग्रहालये आणि प्रयोगशाळा यांना विकतो.इथल्या सगळ्या रहिवाशांना तो माहीत झाला आहे.त्यामुळे कोणालाही कोठेही साप दिसला की कितीही अंतरावरून जाऊन ते त्याची खबर त्याला देतात,आणि तो मग त्याला पकडतो.त्याचा कडक कायदाच आहे की इतर कोणीही पकडलेला साप तो विकत घेत नाही"
"असे का?"मी विचारले.
’त्यानी स्वत: साप पकडण्याचा प्रयत्न करू नये म्हणून" मिसेस फुलर म्हणाल्या.
"पूर्वी तो इतरांनी पकडलेले साप विकत घेतही असे पण बरेच रहिवासी त्या प्रयत्नात साप चावून मेले, त्यामुळे ही गोष्ट थांबवायला हवी असे त्याच्या मनाने घेतले आणि तसा नियमच त्याने केला.आता एकादा रहिवासी साप पकडून तो घेऊन त्याच्याकडे गेला तरी तो त्याला परतवून लावतो."
"हे बरोबरच आहे" मी म्हणालो आणि पुढे विचारले "या माणसाचे नाव काय?"
"डोनाल्ड मॅक्फर्लेन,मला वाटते तो स्कॉटिश आहे"
" आपल्या घरात साप आहे का मम्मी? "छोट्या मुलीने विचारले.
"होय गं, पण घाबरू नकोस आता डोनाल्ड अंकल त्याला पकडणार आहे"आईने उत्तर दिले.
"साप जॅकला चावेल ना पण ?"मुलगी म्हणाली.
"अरे देवा,"मिसेस फुलरने कपाळावर हात मारून घेतला "जॅक (कुत्रा) आत आहे हे मी पारच विसरून गेले"आणि ती हाका मारू लागली,"जॅक,जॅक इकडे ये बर."तिनं जॅकच्या नावाने बऱ्याच हाका मारल्या.पोरांनीही उड्या मारत  कुत्रा जॅकच्या नावाने हाका मारण्याचा सपाटा लावला.
"साप त्याला चावला बहुतेक"छोट्या मुलीनं गळा काढत म्हटले.आणि तिच्या सुरात तिच्या भावानेही सूर मिसळला.तो तर तिच्याहून एक वर्षाने लहानच होता.मिसेस फुलरचाही चेहरा उतरला.
"जॅक बहुधा वर जाऊन लपला असेल,तुम्हाला माहीत आहे तो किती हुशार आहे," त्यांना धीर देत त्या म्हणाल्या पण त्याना व पोरांनाही समजून चुकले की त्यांच्या कुत्र्याला साप चावला असणार.त्यामुळे डोनाल्डला घेऊन फ्रेडची कार तेथे आल्यावर त्या दोघांनीही आपल्या बापाकडे जाऊन,"जॅकला साप चावला"असे रडून सांगायला सुरवात केली.अर्थात त्याच्याकडे फार लक्ष देण्यात काही अर्थ नव्हता.त्यामुळे आम्ही फ्रेड व डोनाल्डकडे लक्ष द्यायचे ठरवले.
    डोनाल्ड बराच वयस्कर लहानखुऱ्या बांध्याचा होता.त्याचे वय सत्तर पेक्षा जास्तच असेल. गाईच्या कातड्यापासून बनवलेले बूट त्याने घातले होते आणि त्याच प्रकारच्या कातड्याचे हातमोजे त्याने हातावर चढवले होते आणि ते अगदी कोपराच्याही वरपर्यंत लांब होते.त्याच्या उजव्या हातात एक वेगळ्याच प्रकारचे हत्यार होते. ती एक आठ फूट लांबीची लाकडाची दंडगोलाकार काठी होती व त्याच्या एका बाजूस चिमटा तयार केलेला होता.त्या चिमट्याची दोन टोके काळ्या रबराची एक इंच जाडीची व अतिशय लवचिक होती त्यामुळे चिमटा जमिनीवर टेकून दाबला असता ती दोन टोके दूर सरकून चिमट्याचा मध्यभाग जमिनीच्या कितीही जवळ जाऊ शकेल असे वाटत होते.       
    डोनाल्ड वयस्कर असला तरी प्रभावी व्यक्तिमत्वाचा दिसत होता.त्याचे डोळे निळसर तर गोल चेहरा रापलेला आणि अक्रोडासारखा सुरकुतलेला होता.निळ्या डोळ्यावरील जाडसर भुवया अगदी स्वच्छ पांढऱ्या होत्या त्याच्या डोक्यावरील केस मात्र बरेच काळे होते.पायात जाड चामड्याचे बूट असूनही त्याच्या हालचाली एकाद्या मांजरासारख्या सावध पण चित्त्यासारख्या चपळ होत्या.तो सरळ माझ्याकडे आला आणि त्याने विचारले,"तुम्ही कोण ?"
" तो शेलमध्ये कामाला आहे.,आणि नुकताच माझ्याकडे आला आहे."फ्रेडने उत्तर दिले.
"तुम्हाला पहायचे आहे का?"डोनाल्डने मला विचारले.
"पहायचे आणि ते कसे शक्य आहे?" दबकत मी विचारले,"म्हणजे मला असं विचारायचं आहे की कुठून पहाणार घरातून नाहीना?"  
"तुम्ही व्हरांड्यात उभे राहून त्या खिडकीतून पाहू शकता "व्हरांड्यातील खिडकीकडे बोट करत तो म्हणाला,
"चल तर मग आपण दोघेही पाहूया"फुलर म्हणाला
"हं उगीच काहीतरी वेडेपणा करू नका "मिसेस फुलर म्हणाली.
मुले बिचारी अगदी दीनवाणी होऊन उभी होती त्यांच्या डोळ्यातील पाणी त्यांच्या गालावरून ओघळत होते.
   डोनाल्ड आणि आम्ही दोघे हिरवळीवरून घराकडे जाऊ लागलो.आणि जसे आम्ही व्हरांड्याच्या जवळ आलो तसे डोनाल्डने अगदी हलक्या आवाजात सांगितले,"लाकडी फळ्यांवरून अगदी हलक्या पावलांनी चाला नाहीतर हादऱ्याने सापाला चाहूल लागेल.मी आत जाईतोवर वाट पहा आणि नंतर हलक्या पावलांनी खिडकीपाशी जाऊन आत नजर टाका.
  डोनाल्ड अगदी खरोखरच मांजराच्या पावलांनी पायऱ्या चढून वर गेला आणि तसाच व्हरांड्यातून पुढे जाऊन आत गेला आणि त्याने याबडतोब दार बंद करून घेतले पण तेही मुळीच आवाज न करता.त्याने दार बंद केल्यावर मला हायसे वाटले पण ते स्वत:पुरतेच कारण डोनाल्डचे आत कसे काय होणार ही भीती मनात होतीच.मला तर वाटत होते तो या प्रकारे आत्मघातच करतो आहे.फुलरबरोबर हलक्या पावलांनी व्हरांडा पार करून आम्ही खिडकीपाशी जाऊन उभे राहिलो.खिडकी उघडीच असली तरी बारीक तारेची जाळी तिच्यावर होती.त्यामुळे मला आणखीनच सुरक्षित वाटले.
   दिवाणखाना अगदी साधा होता.जमिनीवर काथ्याचा गालिचा अंथरलेला होता,एक लाल रंगाचा सोफा,कॉफी टेबल आणि दोन तीन खुर्च्या इतकेच जुजबी फर्निचर दिसत होते.कॉफी टेबलाखाली एक मोठा एअर्डेल जातीचा कुत्रा पाय ताणून मरून पडलेला होता.डोनाल्ड दिवाणखान्याच्या दारापाशी अगदी पुतळ्यासारखा स्तब्ध उभा होता.त्याच्या डाव्या खांद्यावर तपकिरी रंगाचे पोते टाकून लांब काठी त्याने दोन्ही हातात त्याच्यासमोर  जमिनीस समांतर पकडलेली होती.साप मला कुठेच दिसत नव्हता आणि डोनाल्डलाही दिसत असेलसे वाटत नव्हते.
   एक मिनिट --- दोन मिनिटे----तीन---चार---पाच—कोणीच हालत नव्हते.त्या खोलीत मृत्यू जणु दबा धरून बसला होता..खोलीतील हवाही मृत्यूच्या अस्तित्त्वाने जडशीळ झाल्यासारखी वाटत होती.आणि डोनाल्ड लांब दांडा समोर हातात धरून एकाद्या दगडी खांबासारखा स्तब्ध उभा होता.आणि तो अजूनही थांबला होता वाट पहात.आण्खी एक मिनिट—आणखी—आणखी.
   आणि आता तो आपल्या गुढघ्यात वाकू लागल्याचे माझ्या ध्यानात आले.अगदी हळू तो गुडघ्यातून वाकत वाकत तो अगदी उकिडवा झाला.त्या स्थितीत राहून तो सोफा आणि खुर्चीखाली शोध घेत होता आणि तरीही त्याला काही दिसले असे वाटत नव्हते.सावकाश तो पुन्हा सरळ उभा राहिला आणि आपली मान वळवूम तो सर्वत्र  पाहू लागला. उजवीकडे दूरच्या कोपऱ्यात वरच्या मजल्यावर जाणारा जिना दिसत होता.आणि आता त्याच्या डोक्यात काय विचार आहे हे मी समजलो.अचानक एक पाऊल त्याने पुढे टाकले आणि तो थबकला.
पण काहीच घडले नाही !
पुढच्याच क्षणात एकदम सापाचे दर्शन मला झाले.उजव्या भिंतीच्या किनाऱ्यावर तो पूर्ण पसरून पडला होता पण सोफ्याच्या मागे असल्यामुळे डोनाल्डला मात्र तो दिसत नव्हता. हिरव्या रंगाच्या सुंदर काचेच्या लांबसड्क पण भयानक दंडासारखा तो तेथे पसरला होता.अगदी हालचाल न करता ,त्याला झोप लागली असावी.त्याचे त्रिकोणाकार छोटे मस्तक जिन्याच्या खालील पायरीवरील चटईवर विसावलेले होते.
    फुलरला कोपराने ढोसत बोटाने दाखवत मी पुटपुटलो,"तो त्या भिंतीपाशी आहे."त्याबरोबर फुलरने एकदम आपल्या हाताच्या पंजाच्या मागे पुढे हालचाली करून डोनाल्डचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही त्यामुळे त्याने अगदी हलक्या आवाजात "शुक शुक"केले मग मात्र डोनाल्डने चटकन वर पाहिले.फुलरने बोट दाखवले आणि डोनाल्डच्या डोक्यात प्रकाश पडला.आणि त्याने मान हलवून तसे सूचित केले.
     आता त्याने अगदी हळू हळू त्या खोलीच्या मागील भिंतीकडे जाण्याचा प्रयत्न सुरू केला त्यामुळे सोफ्याच्या पलीकडील साप त्याच्या नजरेसमोर येईल असा त्याचा अंदाज होता.आपल्यासारखा अंगठ्यावर तो कधीच चालत नव्हता,त्याचे पाय नेहमी जमिनीला समांतर रहात.गायीच्या चामड्याचे त्याने घातलेले बूट अगदी सपाट तळ असलेले होते..हळू हळू त्याने मागील भिंत गाठली आणि तेथून सापाचे डोके आणि त्याची दोन तीन फुटाची लांबी त्याला दिसू लागली.
   पण सापानेही त्याला पाहिले आणि क्षणार्धात त्याने अगदी वेगात हालचाल केली आणि त्याचे डोके हवेत दोन फूट वर गेले आणि शरीराचा पुढचा भागाचा आकडा करून हल्ला करण्याच्या पवित्र्यात तो समोर आला.आणि त्याचबरोबर आपल्या संपूर्ण शरीराचे वळसे तयार करून पुढे येण्याच्या बेतात होता. डोनाल्ड आपल्या लांब दांड्याने त्याच्यापर्यंत पोचू शकत नव्हता म्हणून तो वाट पाहू लागला.पण त्याची दृष्टीसापावर रोखलेली होती सापही आपल्या दोन दुष्ट काळ्या डोळ्यांनी त्याच्याकडेच पहात होता.आणि मग डोनाल्डने सापाशी संवाद सुरू केला,"ये ये माझ्या सोनुल्या,"अगदी हलक्या आणि लडिवाळ स्वरात चुचकारत तो बोलत होता.,"अरे किती चांगला मुलगा आहेस तू.तुला कोणी अजिबात धक्का लावणार नाही,काहीही इजा करणार नाही,माझ्या लाडक्या ,छकुल्या शहाणा आहेस तू.अगदी शांत रहा,अगदी निश्चिंत रहा"सापाच्या दिशेने चिमटा समोर धरून एक पाऊल त्याने पुढे टाकले.
   सापाची त्यानंतरची हालचाल इतकी वेगवान होती की कॅमेऱ्याचा फ्लॅश त्या वेगात उडतो. एक शतांश सेकंदातच तो एकदम दहा फुटाचे अंतर हवेतच कापून डोनाल्डच्या पायाला डसला.त्या उडीतून कोणीही वाचू शकला असता असे वाटत नाही.सापाचे डोके डोनाल्डच्या गाईच्या कातड्याच्या बुटावर  आपटल्याचा स्पष्ट आवाज मला ऐकू आला आणि लगेच त्याने डोके मागे वळवून घेऊन पुन्हा हल्ला करण्याच्या स्थितीत नेले.
"हा इथे तर चांगला मुलगा आहे,शहाणा मुलगा आहे "डोनाल्डने चुचकारणे सुरूच ठेवले.गाईच्या कातड्याच्या बुटामुळे सापाचा दंश त्याला होत नव्हता."अरे किती चांगाला आहे हा.उगीच खवळू नकोस रे बाळा,शांत रहा"असे म्हणतच चिमट्याचे तोंड तो सापाच्या जवळ आणत होता.ते जवळपास फुटभर अंतरावर त्याने आणले,""अगदी गोडुला आहेस तू,इतका शहाणा मुलगा आम्ही पाहिलाच नाही,किती  सुंदर, शांत रहा माझ्या पिला, डॅडी तुला मुळीच दुखापत करणार नाही."
  डोनाल्डच्या उजव्या पायावर जिथे सापाने दंश केला होता त्या पायाच्या बुटाखालून गडद बारीक विषाची चिळकांडी वहात असलेली मला दिसली.साप  एकाद्या ताणलेल्या स्प्रिंगसारखा पुन्हा दंश करण्याच्या तयारीत होता,"हलू नको बाळा,"डोनाल्ड म्हणत होता आणि "व्हॅम"अशा आवाजात चिमट्याची दोन टोके खाली गेली आणि सापाच्या लांबीच्या जवळपास मध्यभागी तो आकडा हवेत फिरला आणि त्या सापाला डोनाल्डने जमिनीला खिळवून ठेवले.मला दिसत होते साप विजेच्या वेगाने वळवळ करत त्या चिमट्यातून स्वत:ला सोडवून घेण्याचा प्रयत्न करत होता पण डोनाल्डने त्याला असे काही जखडून ठेवले होते की तो सुटूच शकत नव्हता.
 पण आता पुढे काय होणार मला समजेना.कारण त्या विजेच्या वेगाने वळवळणाऱ्या हिरव्या स्नायूंच्या लांबीला आपल्या हातात पकडून पोत्यात घालणे डोनाल्डलाच काय अगदी किंगकॉंगलाही शक्य नव्हते,आणि तसे करण्याचा प्रयत्न त्याने केलाच असता तर त्या सापाने त्याच्या डोक्यालाच दंश केला असता यात शंकाच नव्हती.
  डोनाल्डने थंडपणे चिमट्याचा दाब कायम ठेवत सापाच्या भोवती आपली  हालचाल चालू ठेवली व सापाच्या शेपटीकडील भागाकडे तो गेला आणि नंतर त्याच्या वळवळीकडे दुर्लक्ष करत दाब कायम ठेवून चिमट्याची टोके त्याने त्या सापाच्या डोक्याच्या दिशेने सरकवायला सुरवात केली.दाब कायम ठेवत अगदी शांतपणे अगदी एक एक मिलिमिटर चिमट्याची टोके तो पुढे सरकावत होता. तो पांढऱ्या शूभ्र भिवयांचा आणि डोक्यावरील केस काळे असणारा छोट्या चणीचा माणूस अगदी काळजीपूर्वक आणि शांतपणे आपल्या हातातील दांड्याची अगदी योग्य पद्धतीने हालचाल करत मिलिमिटर मिलिमिटरने अगदी त्वेषाने वळवळ करणाऱ्या सापाच्या तोंडाकडे तो पुढे सरकावीत आहे हे दृश्य जितके आकर्षक तितकेच भयकारी पण होते.खालच्या गालिचावर सापाच्या शरीर आपटण्याचा इतका जोराचा आवाज येत होता की वर असणाऱ्या माणसाला दोन अगदी शक्तिशाली मल्लच कुस्ती खेळत आहेत असे वाटावे. चिमट्याची दोन टोके सापाच्या तोंडापाशी आल्यावर मात्र त्याने आपल्या उजव्या हातमोजे असलेल्या हाताने सापाची मान अगदी घट्ट पकडली आणि त्यानंतर त्याने चिमटा बाजूस टाकला आणि खांद्यावरचे पोते डाव्या हातात घेऊन सापाचे तोंड त्यात ढकलत त्याने त्याला पोत्यात सोडले आणि ताबडतोब पोते बंद करून सुतळीने त्याचे तोंड बांधले.बांधलेल्या पोत्यातही सापाची तडफड इतक्या जोरात चालू होती की त्यात पाचपन्नास दांडगे उंदीर चिडून उड्या मारत आहेत असा भास होत होता.डोनाल्डने मात्र अगदी किलो दोन किलो बटाटे भरलेले पोते असावे इतक्या शांतपणे ते पोते पकडले होते.आपला चिमटा त्याने उचलला आणि आम्ही उभ्या असलेल्या खिडकीकडे तोंड वळवून तो म्हणाला,"बिचारा कुत्रा,मुलांनी त्याला तश्या अवस्थेत पहाण्यापूर्वी त्याला येथून हलवायला हवे"