ते सहित्य नव्हतेच, निव्वळ छापील कागद

मी बरेच मराठी वाचन केले आहे. पुल, वपु, जयवंत दळवी, जीए, गोनी दांडेकर, दमा मिरासदार, या लेखकांची तर प्रकाशित झालेली सर्वच पुस्तके वाचली आहेत, तसेच  आपटे, अत्रे, अनिल अवचट, नारायण धारप, विआ बुवा, दपा खांबेटे, रमेश मंत्री, . . . किती नांवे घ्यावीत. अनेक लेखकांचे लेखन वाचले. मराठी नाटके रंगभूमीवर तर पाहीलीच, पण अनेक नाटके लिखीत स्वरूपात पण वाचली. असे भरपूर वाचन केले. आता पर्यंत माझा समज होता कि हे सर्व "साहित्य" होते, व मी साहित्य प्रेमी आहे. पण संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या भाषणाचा हवाला देत १२ एप्रिलच्या सप्तरंग (सकाळ या वर्तमानपत्राची  रविवार  पुरवणी) मध्ये प्रकाश अकोलकर यांनी ठासून सांगितले आहे कि "वारकरी संप्रदायातून निर्माण झालेलं साहित्य हेच खरं साहित्य".  इथे वाचा   त्यांनी पुढे अस पण लिहील आहे कि पंडिती परंपरेतील लेखन हे एका विशिष्ट समाजापुरतं आणि तो समाज चित्रित करणारं होतं, आणि ते  "समाजात आधीच पडलेले तुकडे मजबूत करत गेलं".

मी ज्या लेखकांची नांवे घेतली त्या पैकी कोणीही "वारकरी संप्रदायातून" लिहीत नव्हते. म्हणजे ते खरे साहित्यिकच नव्हते. आणि त्यांनी लिहीलेले मी जे काही वाचले ते "वारकरी संप्रदायातून निर्माण झालेलं" नव्हत. म्हणजे ते खर साहित्य नव्हतच.  ते निव्वळ छापील कागद होते. साडेतीन टक्क्यांनी लिहिलेले. माझे डोळे खाडकन उघडल्या बद्दल प्रकाश अकोलकर व सदानंद मोरे यांचे आभार.