एका ठिणगीचे अग्नितांडव

मूळकथा :- 
A Spark Neglected Burns the House 
लेखक लिओ  टॉलस्टॉय 
******** 
एक पुराणकथा आहे ---
एकदा पीटर ने जीझसला विचारले, "हे दयावान,  किती वेळा मी माझ्या भावाचे गुन्हे माफ करू?" सात वेळा ?"
"सत्तर गुणिले सात वेळा." उत्तर मिळाले.
******
एकदा एका मनुष्याचे  चांगले दिवस जाऊन वाईट दिवस आले. त्याला त्याची कर्ज फेडता येईनात. देशोधडीला लागला तो. त्याची बायका पोरे आक्रोशत होती. 
मग त्याने त्याच्या मालकाची करूणा भाकली.  
"यावेळी मला माफ कर.  मी आजन्म ऋणी राहीन."
मालकाला  दया आली. त्याने त्याला माफ केले.
तो आनंदला.. त्याचे आयुष्य परत सुरळीत चालू झाले.
एकदा त्याच्या  एका  नोकराने घेतलेले कर्ज फेडले नाही. या माणसाला फार राग आला. तो नोकर बिचारा गयावया करत राहिला. पण याने काही त्याला क्षमा केली नाही. नोकराकडील सारे काही हिरावले.
त्याच वेळी सर्व जगताचा जो स्वामी, तो प्रकटला. 
"मी तुला माफ केले,  तुझ्या वाईट दिवसात तुला मदत केली. पण तू तुझ्या नोकराला मात्र माफ केले नाहीस. याचा अर्थ तू माझ्या दयेचा अधिकारी नाहीस. पूर्वी तुला माफ केलेली सर्व देणी मी आता तुझ्याकडून वसूल करणार... "
ताप्तर्य : दयेचा अधिकारी तोच असतो, जो दुसर्‍याशी सहानुभूतीने वागतो. 
*********
फार पूर्वी एका लहानशा खेड्यात. एक सुखी कुटुंब राहतं होते.  थोडीफार शेतीवाडी,  थोडे पशुधन यावर त्यांची सुखाने गुजराण होत होती. कुटुंब प्रमुखाचे नाव होते इव्हान झेरबकोव्ह. अतिशय कष्टाळू आणि प्रामाणिक शेतकरी होता तो. सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहण्याच्या त्याच्या  स्वभावाने इतर गावकरी त्याला नेहमी सन्मानाने वागवीत. त्याची पत्नी  त्याला शोभेल अशीच होती. दिवसभर काही ना काही करत राही. जरा सुद्धा आळस नाही. आणि प्रत्येक गोष्ट करणार ती अशी नेटकी, की बघणार्‍याच्या तोडून कौतुकाचे शब्द यायलाच पाहिजेत. 
त्याला तीन मुले होती. तिघेही त्याच्याच सारखे सज्जन आणि कष्टाळू. थोरल्याचा नुकताच विवाह पार पडला होता. सून देखिल अशी गुणाची, की जणू त्या कुटुंबातलीच एक. सासू-सुनेचे चांगले जमायचे. भांड्याला भांडे काही लागले नव्हते. मधल्याचे लग्नं ठरले होते. सर्वात धाकटा मोठा आज्ञाधारक. तो झेरबकोव्ह कुटंबाकडील सर्व पशुधनाची देखभाल मोठ्या निगुतीने करी. त्याला त्यांच्याकडे असलेल्या अश्वांचा फार अभिमान होता. दिवसभर तो त्याच कामात गुंतलेला असे. 
काम न करता नुसते बसून खाणारी अशी एकमेव व्यक्ती त्या घरात होती. ते म्हणजे इव्हान चे वृद्ध, दमेकरी वडील. दिवसभर ते आपल्या उबदार अंथरूणावर निजून असत. तिथून उतरून खाली यायचे कष्ट त्यांना झेपत नसत. मग नुसतेच सर्वांची चाहूल घेत ते पडून राहतं. त्यांच्याशी बोलायला, त्यांचे काही ऐकायला कुणालाच वेळ नसे. 
इव्हान च्या शेजारी  लिंपिग गॅब्रिएल आणि त्याचे कुटुंब राहतं असे. त्यांचा कुटुंबप्रमुख गॅब्रिएल, इव्हान चा चांगला मित्र होता. तसे सारेच कुटुंब झेरबकोव्ह कुटुंबाशी मिळून मिसळून राही. अडीअडचणीला एकमेकांना मदत करीत, संकटकाळी धीर देत. सण,समारंभ एकत्रितपणे उत्साहाने आणि आनंदाने साजरा करीत.  इव्हानोव्ह गोरडे, म्हणजे  गॅब्रिएलचे  वडील, इव्हान च्या वडिलांचे मित्र. तेही असेच वर्षानुवर्षे एकोप्याने राहिले होते. त्यांना जाऊन आता बराच काळ लोटला होता. सारे गाव त्यांच्या मैत्रीच्या कथा सांगत असे. 
तर असे सर्वकाही सुखात, आनंदात चालू होते. पण दैवाला जणू काही  हे बघवले नाही.  संघर्षाची ठिणगी पडली. त्या ठिणगीने आपले काम चोख बजावले. बघता बघता सौख्याला ग्रहण लागले.  जीवश्चकंठश्च  मित्र आता हाडवैरी झाले होते.  आधी एकमेकांच्या सुखाने सुखावणारे, दुसर्‍याच्या दु:खात अश्रू ढाळणारे, आता एकमेकाचा मानभंग कसा होईल? काय केले असता दुसर्‍याला यातना होतील? या विचारात गढून गेले. त्यांना आता एकमेकांसमोर येणेही नकोसे झाले होते. दुसर्‍याच्या नुसत्या चाहुलीने देखिल संताप येऊ लागला. एकमेकांची कौतुक करणारी, स्तुती करणारी, चांगले ते आवर्जून सांगणारी जिव्हा, आता शिव्याशाप आणि दूषणे देऊन देखिल शांत होत नव्हती. 
हे झाले तरी कसे? कधी? कुणामुळे?
--- तर कारण  अगदीच साधेसे होते. कुणी म्हणेल की इतक्या लहानशा गोष्टीपायी दोन शेजार्‍यांमधे इतकी भाऊबंदकी पेटली म्हणजे कमाल आहे. पण झाले होते खरे तसेच.
इव्हानच्या नव्यानवेली सुनेने कोंबड्या पाळल्या होत्या. त्यातली एक तिची विशेष आवडती होती. त्या कोंबडीने,  इतर कोंबड्या अंडी द्यायला सुरू करण्याआधीच तिने अंडी द्यायला सुरूवात केली. रोज त्या कोंबडीने दिलेले अंडे,  इव्हान ची सून न चुकता घरी न्यायची. सवयच झाली होती तिला तशी. 
एक दिवस ती लाडकी कोंबडी पंख फडफडवत कुंपण ओलांडून शेजार्‍यांच्या परसात पोहोचली. आणि तिथेच तिने एक अंडे दिले. इव्हानच्या सुनेने कोंबडी पलीकडे गेल्याचे पाहिले होते. अंडे देतानाचा तिचा कलकलाट देखिल ऐकला होता. पण त्यावेळी घरच्या कामात गुंतल्याने तिने तिकडे नंतर जायचे असे ठरवले. 
सारी कामे उरकल्यावर ती शेजारी  विचारायला गेली. 
घरातल्या म्हातारीने विचारले "काय पाहिजे गं तुला? अशी इकडे आलीस ती?" 
सून बोलली, "आज्जीबाई माझ्या कोंबडीने तुमच्या परसात अंडे दिले. मी पाहिलेय... तर ते तुम्ही पाहिले का?" 
म्हातारीला आला राग.
"वा गं ! मोट्ठी महाराणी आलीय चौकशीला. आम्ही काही भिकारी नाही. आमच्या परड्यातदेखील बक्कळ कोंबड्या आहेत. तुझ्या कोंबडीचे अंडे मी का घेईन?"  
आणि बरेच काही बोलली. इव्हानच्या सुनेने ते ऐकून घेतले. पण तिला आला राग. मग सून तावातावाने दोन अधिक-उणे शब्द बोलली. म्हातारीने आणखी चार सुनावले. आवाज ऐकून गॅब्रिएल च्या घरातील सार्‍या बायका गोळा झाल्या. मग प्रत्येकीला शेजार्‍याचे काही ना काही उणे आठवले. त्यावेळी अस्से झाले आणि दुसर्‍यावेळी तस्से. तू असे केले आणि तो असे बोलला. नुसता गदारोळ झाला. त्याचवेळी इव्हान शेतावरून घरी आला होता. आपल्या सुनेला सगळ्या शेजारणी काहीबाही बोलतायत ते पाहून त्याच्या रागाचा पारा चढला. आणि इतक्या वर्षात कधी घडले नाही ते घडले. गॅब्रिएल  आणि इव्हान चे भांडण अगदी मारामारीपर्यंत पोहोचले. गावातले जाणते धावले. आणि त्या वेळेचे भांडण मिटवले. पण आता ठिणगी पडली होती. आग धुमसत होती.
मग काही ना काही प्रसंग घडत गेले. एकदा गॅब्रिएलच्या घोडागाडीच्या चाकाची खीळ निसटून पडली. इतर वेळ असती तर इव्हानने त्याला आपली गाडी तात्पुरती देऊ केली असती. त्याचे निखळलेले चाक दुरुस्त करण्यासाठी मदत केली असती. पण आता दिवसच फिरले होते. गॅब्रिएलच्या घरातली कुणी एक म्हणाली, की  तिने तिच्या डोळ्यांनी इव्हानच्या धाकट्याला पाहिले होते, इकडे घुटमळताना. त्यानेच केली असणार ही खोडी, नक्कीच.  चाक नादुरुस्तं झाल्याने आधीच वैतागलेला गॅब्रिएल संतापला. खऱ्याखोट्याची शहानिशा न करताच तणतणत इव्हानच्या दारात गेला. मोठ्या आवाजात अपशब्द बोलून तो आपला राग शमवायचा प्रयत्न करत होता. तितक्यात इव्हान बाहेर आला आणि दोघांची परत जुंपली.
"बघून घेईन, समजतोस कोण स्वत:ला?" इव्हान ओरडला.
"अरे मी काही कोणाच्या गाडीचे चाक नादुरुस्तं केले नाही काही.. चोरूनमारून. किती नीच पातळीला जाणार तुम्ही लोक?" गॅब्रिएल  बोलला.
"कोणी केले मला काय माहिती? खोटा आळ आणतोस काय माझ्यावर?" इव्हान तणतणला.
"अरे खोटे तर तुम्ही बोलता. तुझी सून काय तर म्हणे, माझ्या म्हातारीने तिच्या कोंबडीचे अंडे घेतले. लाज वाटायला पाहिजे बोलायला."
मग शब्दाने शब्द  वाढू लागला. कुणीच माघार घेईना. अंधार पडला तशी घरच्या स्त्रियांनी दोघांना घरी नेले. दोघेही घरात गेले खरे, पण एकमेकांचे वाटोळे करण्याच्या आणाभाका घेऊनच.
आता दोन्ही शेजारी पक्के वैरी बनले होते. वैर इतके खोलवर पोहोचले की त्या घरातील लहान मुले देखिल आपसात भांडू लागली. घरच्या मोठ्यांच्या तोडून अखंडपणे निघणारी दूषणे आणि शिव्याशाप ऐकून ती मुले देखिल एकमेकांना तसेच अपशब्द बोलू लागली. इतकेच काय त्यांच्या घरात काम करणारे नोकरचाकर, शेतावर काम करणारे मजूर देखिल आपल्यापरीने भांडणात भर घालीत होते. भांडणाच्या बाबतीत बायका आघाडीवर होत्या. जाता येता कुत्सित बोलणे, अपमानास्पद वागणे, गावातील इतर बायकांना शेजार्‍याच्या खऱ्याखोट्या तक्रारी सांगणे, हे नित्याचेच झाले होते. दोघांनी एकमेकांबद्दल गावाच्या पंचायतीत, आणि तालुक्याच्या मोठ्या पंचायतीत  देखिल तक्रारी दिल्या. दोघांचे कज्जे-खटले गावात  चेष्टेचा विषय बनले होते.  दोघांचा बराचसा वेळ, पंचायतीत नाहीतर मोठ्या कोर्टात जाऊ लागला. शेतीवाडीकडे दुर्लक्ष झाल्याने उत्पन्न घटले, मजुरांना धाक राहिला नाही. पण कुणालाच पर्वा नव्हती. 
इव्हानचे वृद्ध वडील फार अस्वस्थ होते. त्यांना सारे काही दिसत होते, कळत होते. पण ते थांबवता येत नव्हते. कारण त्यांचे म्हणणे ऐकायला कुणाला वेळच  नव्हता. 
अशी जवळ जवळ सात वर्षे उलटली.
त्या दिवशी मात्र कहर झाला. इव्हानच्या मधल्याचा विवाह समारंभ होता. आणि सर्व पाहूणे मंडळींच्या समोर इव्हानच्या सुनेने गॅब्रिएल  वर आरोप केला की, त्याने त्यांचा एक घोडा चोरला. हे आता अती झाले होते.  गॅब्रिएल  ची सहनशक्ती संपली  होती. त्याने मोठ्या आवेशाने, दातओठ चावीत इव्हानच्या सुनेच्या कानशिलावर प्रहार केला. आधीच नाजूक तब्येतीची आणि आता गर्भवती असलेली इव्हानची सून खाली पडली. सारेजण धावले. गॅब्रिएल  ची निर्भर्त्सना करू लागले. तो देखिल भानावर आला. आपण किती भयंकर चूक केली आहे हे त्याच्या लक्षात आले.  ---  पण आता फार उशीर झाला होता. आपल्या सुनेवर गॅब्रिएलने  हात टाकलेला पाहून इव्हान चवताळला. त्याने गॅब्रिएलवर  हल्लाच केला.  एका हाताने त्याची दाढी पकडून दुसर्‍या हातातल्या काठीने तो त्याला मारू लागला. झटापटीत गॅब्रिएलला  दुखापत तर झालीच, त्याचे दाढीचे केस देखिल ओरबाडले गेले. तो कसाबसा घरी निघून गेला. 
--- पण इव्हान आता स्वस्थ बसणार नव्हता. त्याच्या हाती आयते कोलीत लागले होते. तो गॅब्रिएलला  वरच्या पंचायती पर्यंत खेचत नेणार होता. त्याला जन्माची अद्दल घडविणार होता.
"माझ्या सुनेला मारतोस काय? भोग आता तुझ्या कर्माची फळे."  इव्हान काहीश्या विचित्र/विकृत आनंदात बोलला. त्याला नक्की सांगता आले नसते की  हा राग आहे की आनंद? त्याला त्याच्या सुनेच्या अपमानाचा राग आला होता? की गॅब्रिएल  आता कायद्याच्या कचाट्यात अडकणार याचा आनंद होत होता?  गॅब्रिएलला  शिक्षा होणार हे नक्कीच होते. त्याने सर्वांसमक्ष एका स्त्रीवर, एका गर्भवती स्त्रीवर प्रहार केला होता. देवदयेने तिला काही इजा झाली नव्हती. पण त्याने केलेला अपराध  शिक्षेला पात्र होता. 
इव्हान तक्रार द्यायला गेला त्यावेळी  गावातील जुन्या -जाणत्या लोकांनी त्याला समजवायचा प्रयत्न केला.  "झाले ते वाईटच झाले. पण आता ते वाढवायला नको. गावातील भांडणे गावाबाहेर जायला नकोत. इतका काळ एकोप्याने राहिलात. तर आता आपसात तोड करा. "
पण  हे सारे डोक्यात  शिरायला  त्याचे  चित्त थाऱ्यावर  हवे  ना? 
इव्हानने रीतसर आधी गावाच्या पंचायतीत, मग तालुक्याच्या पंचासमोर गार्‍हाणे घातले.  पंचासमोर दोघांनी  आपापली बाजू मांडली. आणि परत परत स्वतः च्या निर्दोषीपणाची ग्वाही दिली. 
गॅब्रिएलने देखिल माफी मागण्यास नकार दिला. तो सांगायचा प्रयत्न करत होता, की इव्हानच्या सुनेने त्याच्यावर खोटा चोरीचा आळ घेतला, आणि ते देखिल सर्वासमक्ष. त्याच्यासारख्या प्रामाणिक माणसाला, ज्याने सारे आयुष्य कष्टपूर्वक पण  इमानदारीत व्यतीत केले आहे, ते सहन करणे शक्यच नव्हते. इव्हानच्या सुनेने त्याला हिंसेला प्रवृत्त केले, आणि तिला ते करताना तिच्या घरच्या मंडळींनी अडविले नाही. म्हणून इव्हान आणि त्याचे सारे कुटुंब दोषी आहेत. कारण कलहाला सुरुवात त्यांनी केली. पण त्याचे कुणीच ऐकले नाही. 
जे काही घडले ते अनेकांच्या साक्षीनेच घडलेले असल्याने,  संशयाला काही जागाच नव्हती.  परंतु गावातील काही शहाण्या लोकांचे मत होते की गोष्टी  या थरापर्यंत नेण्याची गरज नाही.  त्यांनी पुन्हा  इव्हानला समजावले,  "झाले ते झाले... पण हे भांडण जास्त वाढू देऊ नकोस. तक्रार मागे घे."  पण इव्हान ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हताच.
बरेच सव्यापसव्य होऊन गॅब्रिएलला  शिक्षा सुनावण्यात आली.  ---- लाकडी काठीचे पंचवीस फटके. 
शिक्षा ऐकताच इव्हानचे काळीज लक्ककन हालले. तो म्हणाला, "नाही नाही, असे नको --- त्याला फक्त त्याचा अपराध कबूल करून माफी मागायला सांगा. मला ते पुरेसे आहे. मग शिक्षेची गरज नाही." इव्हानने पंचांना विनविले. 
पण पंचायतीतला कारकून म्हणाला, की  ते आता शक्य नाही. सुनावणी झाल्यावर शिक्षेत बदल करता नाही येणार.
शिक्षेच्या सुनावणीनंतर  सारेजण पंचांच्या दालनातून बाहेर आले. इव्हानला देखिल आत कुठेतरी कसेतरीच झाले. त्याने पाहिले गॅब्रिएलची अवस्था खूपच वाईट झाली होती. या भांडणात आधीच त्याची प्रकृती ढासळली होती. आता तर तो अगदीच कसानुसा दिसत होता. चेहरा पांढराफटक पडला होता. खाली मान घालून, काहीतरी स्वतः शीच बोलत तो चालला होता. तो काय बोलला ते इव्हान ने स्पष्ट ऐकले होते. गॅब्रिएल म्हणत होता, 
" माझे वय आता पन्नाशीचे झाले आहे. आजवरच्या आयुष्यात, माझी इतकी मानहानी कुणीच केली नसेल. माझ्या पूर्ण आयुष्यात माझ्या अंगाला कुणाचे बोट लावून दिले नाही मी.  तशी वेळच  आली नाही कधी. मी नेहमीच प्रामाणिकपणे राहिलो, वागलो. आणि माझ्यावर चोरीचा खोटा आळ घेतला? समाजाच्या सर्व रीतिरिवाजाचे मी पालन केले. आणि आता माझ्यावर हा  प्रसंग ओढवला आहे. दंडुक्याचे फटके बसल्यावर माझी कातडी सोलवटेल आणि त्या जखमांची आग आग होईल. तशीच आग त्याच्या पण घरात लागेल. त्याला पण अशाच वेदना सहन कराव्या लागतील. सारे काही नष्ट होईल. पश्चात्ताप करायला लागेल त्याला." 
हे ऐकताच  इव्हान परत मागे वळला. आता मात्र फार झाले. मी त्याची शिक्षा कमी करायला बघतो आहे, आणि हा सूडाची भाषा बोलतो आहे. ते काही नाही.  त्याचे भयंकर बोलणे सर्वांना कळायलाच हवे. असे म्हणून तो परत मागे फिरला. त्याने जाऊन  पंचांना सांगितले, की गॅब्रिएल माझे घर जाळण्याची धमकी देतो आहे. 
वास्तविक गॅब्रिएल ने अशी काही धमकी दिली नव्हती. पण  इव्हान आता सूडाने पेटला होता. त्याला खरे-खोटे, योग्य-अयोग्य कशाचेच भान राहिले नव्हते. गॅब्रिएलला जास्तीत जास्त शिक्षा भोगायला लावणे हा एकमेव उद्देश होता त्याचा. 
पण त्याच्या या तक्रारीची मात्र कुणी दखल घेतली नाही.  
इव्हान घरी परतला. गॅब्रिएलला शिक्षा झाल्याचा त्याला काहीच आनंद झालेला नव्हता. काहीशा विमनस्क अवस्थेत तो बसलेला होता. काहीतरी गमावल्याची भावना त्याचे काळीज कुरतडत होती. लाकडी दंडुक्याचे फटके खाणारा गॅब्रिएल त्याच्या डोळ्यासमोर दिसत होता. त्याला वाटले जे झाले ते काही बरे झाले नाही. आत्ताच्या आत्ता परत जावे. अजून शिक्षेच्या अंमलबजावणीस अवकाश आहे. वेळीच ती थांबवायला हवी. तो जागेवरून उठला, पण परत थांबला. त्याला सुचेनासे झाले की आता नक्की काय केले पाहिजे. 
इव्हानचे वडील, कधी नव्हे ते आपला बिछाना सोडून खाली उतरले होते. त्या श्रमाने त्यांना दम लागला होता. श्वास कोंडला जात होता. खोकल्याची उबळ बोलून देत नव्हती. बराच वेळ ते तिथे बसले होते. मग महत्प्रयासाने बोलले,
"इव्हान, काय करून बसलास तू हे? भावाभावाप्रमाणे एकत्र मोठे झालात तुम्ही दोघे. आणि आता एव्हढे शत्रुत्व? थोरला इव्हानोव्ह  आणि मी आयुष्यभर कसे एकोप्याने राहिलो.  एकमेकांच्या अडीअडचणीत मदत केली. त्याच्याकडे काही कमी असेल, तर ते मी दिले आणि माझी नड त्याने भागविली. दुःख, आजारपण, संकटे सारे काही एकत्रितपणे सोसले.  दोन घरांमध्ये कुंपण घातलेले असले, तरी त्यात राहणाऱ्या माणसांच्या मनात, असा कसलाच  अडसर कधी नव्हता. किती सुखात, आनंदात होतो आपण सगळे?  आणि आता दोन घरातले कुणी एकमेकांशी सरळपणे बोलायला तयार नाही? एकमेकांना दूषणे देताना बायका थकत नाहीत. दुसऱ्याला मिळालेल्या फायद्याचा, सन्मानाचा कर्ती लोक दुःस्वास करतात. आणि हे सगळे करून सुखी कुणीच नाही. या वैराने दोन्ही  घरातले समाधान हिरावले आहे." 
इव्हानचे वडील थरथरत्या आवाजात बोलत होते. फारसे कुठे बाहेर न जाता, आपल्या जागेवर राहून देखील त्यांनी बरेच काही पाहिले आणि ऐकले होते. पण त्यांचे कधी कुणी ऐकलेच नाही, ही खंत त्यांना अस्वस्थ करीत होती. 
इव्हान न राहवून बोलला, "बाबा  त्याचा अपराध मोठा होता. माझ्या सुनेला काही इजा झाली असती तर?"
"झाली असती तर..," इव्हानचे वडील मोठ्या आवाजात बोलले.
"अरे पण नाही झाली ना इजा? सुखरूप आहे ना ती? मग तू हा तंटा इतका विकोपाला का नेलास? आणि तुझ्या सुनेची काही चूक नव्हती का? कशी बोलत होती ती सर्वांदेखत?  तिला का नाही अडवलस? आणि तू पण  अंगावर  धावून गेलासच ना त्याच्या? त्यालापण इजा झालीच की. मग अपराध त्याचा एकट्याचाच आहे का? एका हाताने कधी टाळी वाजत नसते पोरा."
म्हातार्‍याला जोरदार उबळ आली बराच वेळ तो खोकत राहिला. इव्हानने  त्याला सांगायचा प्रयत्न केला "बाबा, बोलू नका. तुम्हाला त्रास होईल..."
त्याचा हात झटकत बाबा म्हणाले, "अरे हे शिकवल का मी तुला? शेजार्‍याशी इतकं वैर करायला. त्या सर्वश्रेष्ठ परमेश्वराची शिकवण विसरलास का? समोरच्याने अपशब्द उच्चारला, तर शांत राहायचे.  प्रत्युत्तर म्हणून आपण वाईट बोलायचे नाही. करणं शब्दाने शब्द वाढतो. वाद वाढवायच्या आधी संपवायला पाहिजेत. हिंसेला उत्तर म्हणून हिंसा करायची नसते. कारण कुठल्याही कारणाने केलेली असली, तरी हिंसा करणे पापच आहे. आपल्याच माणसांशी शत्रुत्व करून कधीच कुणाचे भले झाले नाही. तू त्याला अशी शिक्षा कशी होऊ दिलीस?  थांबव ते सारं. नाही तर ही वैराची आग अजून भडकेल. सर्वनाश होईल, सगळ्यांचाच."
इव्हानला देखिल हे पटले होतेच. तो निघणार, तितक्यात त्याच्या घरी काम करणारी नोकराणी आली. ती म्हणाली, "त्या गॅब्रिएल ने इव्हान चे घर जाळायची प्रतिज्ञा केलीय. आणि त्याला आता कुणीतरी हुशार वकील मिळालाय. तो ह्या प्रकरणाची नव्याने सुनावणी घेणार आहे आणि इव्हान आणि त्याच्या कुंटुंबियानाच सजा देणार."  अजूनही बरेच काही ती बोलली. तो सर्व प्रसंग, तिने स्वतः:चा मसाला वापरून  रंगवून सांगितला. वास्तविक  ती सांगत असलेल्या कथेत काहीच तथ्यं नव्हते, परंतु तिने येतायेता किमान दहाजणांना हे असेच सारे सांगितले होते. आणि मग त्या दहांनी आणखी काहींना. सार्‍या गावभर वार्ता पसरली होती. त्यातही मूळच्या कथेच्या अनेक उपकथा तयार  झाल्या होत्या. म्हणजे मुळातच असत्य असलेली घटना अजून चटपटीत, चमचमीत होऊन गावभर फिरत होती. 
इव्हान मग काही न बोलता आपल्या शेतावर निघून गेला. एका शेतकर्‍याला कामाची कधीच कमी नसते. सारे काही नीटनेटके करून तो माघारी आला. येताना त्याने गॅब्रिएलला पाहिले. त्याची अवस्था अगदी जर्जर झालेली दिसत होती. इव्हानला वाईट वाटले. पण तो न बोलता घरात आला. घरात आल्यावर त्याने  लाकडी बाकावर बसलेल्या त्याच्या मांजरीला उगीचच हुसकले. घरातल्या वस्तू जागच्याजागी ठेवल्या नाहीत म्हणून बायकोवर, सुनांवर उगीच आगपाखड केली. त्याचे चित्तच  थार्‍यावर नव्हते. खरतर त्याची जीत झाली होती. पण त्यात त्याला सुख वाटत नव्हते. 
संध्याकाळी इव्हानचा धाकटा मुलगा नेहमीप्रमाणे घोड्यांना कुरणाकडे नेण्यास  तयार होत होता. त्याच्या आईने त्याला जेवण दिले. मग तो जाडसर,उबदार कपडे करून आणि ब्रेडचा एक छोटा तुकडा न्याहरीसाठी म्हणून घेऊन  निघाला. त्याला दारापर्यंत सोडायला नेहमी इव्हांनचा दुसरा  मुलगा जात असे. पण आज इव्हान स्वत:च निघाला. त्याने त्याच्या धाकट्याला घोड्यावर बसायला मदत केली, घोड्याचा लगाम मुलाच्या हाती दिला.  इतर घोड्यांना त्याच्या मागे जाऊ दिले. मुलगा लांबवर जाईपर्यंत तो तिथेच थांबला. मग काही एक विचार करून आत न वळता कुंपणाच्या दिशेने निघाला. लहानसे लाकडी फाटक उघडून तो बाहेर रस्त्यावर आला. त्याने विचार केला, गॅब्रिएल कदाचित आजच  काही करेल. आपण त्याला रंगेहात पकडू. मग त्याला अजून शिक्षा होईल आणि  ही अपराधीपणाची भावना माझ्या  मनाला टोचणी लावणार नाही. तो सावकाश घराभोवती चालत राहिला. अंधारात काही नीट दिसत नव्हते. तिथला परिसर देखिल सुनसान होता. अचानक त्याला एक आकृती दिसली. त्याच्या हातात एक अगदी लहानशी   पेटती चूड दिसली. 
"हा .. थांब तिथेच. काय करतोयस." इव्हान जोरात ओरडला. त्याला खात्रीच होती की तो गॅब्रिएल आहे. पण अंधारात त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता. ती आकृती सावध होत, तिथल्या आडोशाला  धावली.  इव्हान देखील त्याच्या मागे जात होता. त्याने त्या धावत्या माणसाचा कोट पकडला.  तर त्याच्या कापडाचा तुकडाच त्याच्या हातात आला. त्याने धक्का देऊन त्या व्यक्तीला खाली पाडले. 
"गॅब्रिएल काय करतोयस तू ?  घर जाळणार आहेस का?" आणि बरच काही बोलत राहिला. मनात साचलेला सारा राग त्याच्या बोलण्यातून व्यक्त होत होता. त्याने गॅब्रिएलला परत परत दूषणे दिली. त्याने केलेल्या अपराधांचा परत एकदा पाढा वाचला. मग धमकी दिली, की आतातर त्याने त्याला अपराध करताना पकडले आहे. त्याला अजून शिक्षा करवणार. आणि असेच बरेच काही. 
तितक्यात त्या माणसाने इव्हानच्या हातून स्वतःला सोडवत विरूद्ध दिशेला धाव घेतली. बघता बघता तो तिथल्या गवतांच्या भाऱ्यामागे दिसेनासा झाला.  इव्हानला काय करावे ते सुचतं नव्हते. तो त्याच्या मागे जायचा प्रयत्न करत होता. इतक्यात त्याला समोर  आगीची ज्वाळा दिसली. त्याच्या काळजाने आता ठाव सोडला होता.  वाळलेल्या गवताने पेट घेतला.  अंधारात त्या पिवळ्या, केशरी ज्वाळा आणि त्यातून निघणारा काळा धूर भयंकर वाटत होते. इव्हानच्या पायातली शक्तीच गेली. त्याचा आवाज फुटत नव्हता. आग भराभर पसरत होती. आणि इव्हान हताश होत  सारखे एव्हढेच म्हणत होता, 
"काय होऊन बसले हे?  तो  नक्की गॅब्रिएलच होता का? की आणखी कुणी? अंधारात त्याचा चेहरा काही दिसला नाही. आणि मी बोलत राहीलो. पण तो तोच असणार नक्की. तरी मी हे  असे होऊ द्यायला नको होते.  फक्तं त्याच्या हातातली पेटती चूड काढून घेऊन माझ्या वहाणेने विझवायला हवी होती. किती लहानशी होती ती?  लगेच विझली असती. मी असं का होऊ दिलं? का?"
इव्हांनच्या घरातील आगीने गॅब्रिएलचे देखिल घर भस्मसात झाले. बघता बघता निम्म्या गावाची राख झाली. इव्हान दिङ्मूढ होऊन बसला होता. त्याला काहीच समजत नव्हते.  
तितक्यात गावच्या प्रमुखांचा मुलगा तिथे आला. "काका लवकर चला. तुमच्या वडिलांना तुम्हाला शेवटचे भेटायचे आहे." तो म्हणाला.  त्या आगीतून इव्हानच्या  वृद्ध वडिलांना कुणीतरी वाचवले होते. आणि गावप्रमुखांचे घर, जे दुसऱ्या टोकाला होते आणि जिथे आगीची झळ लागली नव्हती, तिथे त्यांना ठेवले होते.  पण ती आग, धूर आणि जीव वाचविण्याकरता करावी लागलेली धडपड त्यांना सोसली नव्हती. ते आपल्या मुलाची वाट बघत,  दाराकडे डोळे लावून बसले होते. त्या झोपडीत प्रमुखाची पत्नी आणि  दोनचार लहान मुले याखेरीज कुणीच नव्हते. सगळेच आग विझविण्यात गुंतलेले होते. 
इव्हान येताच त्याचे वडील बोलले, "आलास? मला वाटले तुझ्याशी बोलता येते आहे की नाही?" 
इव्हान गहिवरला. आपल्या चुकीची शिक्षा आपल्या वडिलांना भोगायला लागते आहे हे पाहून त्याला अतिशय दु:ख होत होते. 
इव्हान चे वडील बोलत होते, "बघ मी तुला सांगितले होते. वेळीच हे सारे थांबव.  आता काही उपयोग नाही. घडायचे ते घडून गेले. पण आता शहाणा हो. हे प्रकरण वाढवू नकोस. तू कुणाची एक चूक माफ केलीस,तर तुझ्या दोन चुका परमेश्वर माफ करेल हे लक्षात ठेव. पण तू सूडबुद्धीने वागलास, तर काय होईल हे तू अनुभवलेले आहेस. तू काय पाहिलेस ते बोलू नकोस. वचन दे." 
इव्हान ने त्याच्या वडिलांचा कृश हात हातात घेतला आणि त्या वृद्धाचे डोळे समाधानाने मिटले. 
सर्वच गावकर्‍यांचे नुकसान झाले होते. पण हे कुणी केले? काहीच समजत नव्हते. चर्चा चालू होती. लोक दबक्या आवाजात कुणाकुणावर संशय घेत होते.  कुणालाच नक्की काहीच  बोलता येत नव्हते.  इव्हान गप्प राहून ऐकत होता. समोर बसलेल्या गॅब्रिएलला आश्चर्य वाटत होते, की इव्हान बोलत का नाही?
सारेजण परत कामाला लागले. प्रत्येकाला नवीनं घर बांधायचे होते. गेलेले पशुधन परत जमा करायचे होते. परिस्थिती अवघड होती, पण काळजी करत बसायला वेळही नव्हता. एकमेकांच्या मदतीने हळूहळू  गावाने नवीन आकार घेण्यास सुरुवात केली. परत एकदा झोपड्या, घरे उभी राहिली. त्याच्या भवताली कुंपणे घातली गेली. तबेले आणि गोठ्यात  घोडे, गायी आणि इतर प्राणी दिसू लागले. परत एकदा कोंबड्यांचा कलकलाट ऐकू येऊ लागला होता.  जळलेली शेते परत नांगरली जात होती.  मोटेतील शुभ्र पाणी  सर्व शिवारांमध्ये  वाहू लागले. या सर्वामागे खूप कष्ट होते.  शून्यातून जणू नवीन विश्व आकाराला येत होते. या नवीनं गावात देखिल इव्हान आणि गॅब्रिएलने  शेजारीच राहण्याचे ठरवले.  घरे बांधली, कुंपणे घातली गेली. पण आता जुने  वैर, वैमनस्य संपले होते. परत तोच एकोपा, तोच जिव्हाळा सर्वजण अनुभवत होते. 
*******