पटाखा - एक दणदणीत सुतळीबॉंब

चित्रपट पाहणे हे माझे व्यसन आहे.
हे मी 'देवाशपथ खरे सांगेन, खोटे सांगणार नाही', ऊर्फ कबुलीजबाब या भावनेने सांगतो आहे.
पण दुर्दैवाने हे व्यसन भागवण्यासाठी फार कष्ट पडतात.
चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे हे वर्षातून एखाद्या वेळेस. टीव्हीवर अवलंबून राहावे लागते.
त्यात डीव्हीडी वा पेन ड्राईव्हवरचे चित्रपट सोडले तर टीव्हीवर मिळेल तो अशा लॉटरी पद्धतीने जावे लागते. तरी मी दिवसाला सरासरी एक चित्रपट पाहतो.
'तंत्रज्ञान टीव्हीपेक्षाही खूप पुढे गेले आहे', 'प्राईम व्हिडिओज, नेटफ्लिक्स आणि तत्सम गोष्टींची आता चलती आहे' या बद्दल माझे प्रबोधन करण्याचे खूप प्रयत्न झाले. ते मी हाणून पाडले.
मी वायफाय वापरत नाही हे कारण उपयोगी आले नाही. मग माझा लॅपटॉप जुना झालेला आहे या नितांतसुंदर कारणावर मी वर्षभर किल्ला लढवला.
आणि अचानक शरणागती पत्करली. प्राईम व्हिडीओचा सभासद झालो. (लॅपटॉप अजून जुनाच आहे)
आणि पहिला चित्रपट निवडला तो 'पटाखा'.
वा!
साध्या उदघाटनाचे एकदम जंगी सोहळ्यातच रूपांतर झाले!!
या चित्रपटाबद्दल मला काहीच माहीत नव्हते. त्यामुळे अपेक्षा होत्याही आणि नव्हत्याही.
नटनट्यांपैकी 'विजय राज' हा 'मॉन्सून वेडिंग'पासूनचा माहीत होता. आणि बाकी एक दोन फुटकळ.
सुरुवात झाल्याझाल्या जाणवले की याची कथा अगदी चिरेबंदी भक्कम आहे.
हा एक दुर्मिळ योग.
आणि मग अतिदुर्मिळ योगायोगांची रांगच लागली.
कथेची पटकधा होताना, पटकथेवर संस्करण करून त्यात संवाद पेरताना, ते मिश्रण चित्रित आणि संकलित करताना, कुठेच त्या भक्कमपणाला बाधा आली नाहे.
राजस्थानातल्या एका खेड्यात वाढणाऱ्या दोन बहिणींची ही कथा.
'वन लायनर' म्हणून जर असे लिहिले तर एकच साध्य होईल.
'वन लायनर' ही अतीमूर्ख संकल्पना ज्या व्यक्तीने काढली त्या व्यक्तीला उजवा हात तीन फूट मागे खेचून सण्णकन कानाखाली लगावावी ही इच्छा छळत बसेल.
कथा सांगायला वन लायनर डझनांनी नव्हे, ग्रोसमध्ये लागतील.

या बहिणींना एकमेकांशी भांडायची नि मारामारी करण्याची फार हौस.
मारामारी खरीखुरी. झिंज्या उपटणारी, गाल बोचकारणारी, दगडविटा फेकून मारणारी.

वडील सरकारी ठेकेदार. पण अन्नसाखळीतल्या पार खालच्या पायरीवरचे. शोषक नव्हे, शोषित.
बहिणी अगदी लहान असताना आईचे ऊर्ध्वगमन झालेले. घरात आईचा (चंदनाचा हार घातलेला) फोटोदिखिल नाही. त्यामुळे भावपूर्ण प्रसंगांत आईच्या फोटोसमोर जाऊन केलेली डायलॉगबाजी वा गाळलेली टिपे नाहीत.

भाषा मारवाडी, हिंदीची एक बोलीभाषा. 'न' ऐवजी बहुतेक वेळेस 'ण' वापरल्याने मराठी जनांना उगाचच हिंदीपेक्षा जास्ती ओळखीची वाटणारी.

शब्द समजायला फार अवघड नाहीत. शब्दांना स्वतःचा अंगचा असा एक गंध आहे. शिव्या खेचराची लाथ छातीत बसल्यासारख्या बुलंद आणि गोड शब्द अंगावर मोरपीस झुळझुळल्यासारखे.
'डिप्पर' हे पात्र म्हणजे नारदमुनी. सुरुवातीला तरी तसे भासते.
पण चित्रपट जसजसा पुढे सरकतो नात्यागोत्याचे कुणीही नसलेल्या, रहायला पक्के घरही नसलेल्या या पात्राच्या वेगवेगळ्या पैलूंनी भुरळ पडायला सुरुवात होते.
बहिणी भांडतच राहतात.
वडील पैशाच्या अडचणीत आले आहेत.
गावच्या सावकाराबरोबर एकीचे लग्न लावून द्यावे आणि आर्थिक विवंचनेतून मुक्ती मिळवावी या उद्योगाला ते लागतात.
ते लग्न होते का?
की त्यात अडथळा येतो?
दुसऱ्या बहिणीचे लग्न होते का?
लग्न झाल्यावर दोघी एकमेकींच्या आठवणींनी व्याकुळ होतात का?
हरणाच्या पाडसासारखे अवखळपणे बागडणारे कथासूत्र असे अनेकानेक प्रश्न जन्माला घालते.
आणि हेही उमगत जाते की कथासूत्र अवखळपणे बागडत नसून त्यामागेही काही एक विचार आहे.
काही ठिकाणी 'आता दिग्दर्शकाची पकड निसटली की काय' अशी शंका मनात डोकावते.
पण लगेच कथासूत्र एक मुरका मारून समेवर येते.
मग जाणवायला लागते की 'दिग्दर्शकाची पकड निसटते आहे की काय', 'कथासूत्र भरकटायला लागलेय की काय' अशी शंकासुराची भूमिका करण्यापेक्षा जे समोर घडते आहे त्याचा मनमोकळा आस्वाद घ्यावा हे बरे.
एखाद्या उत्कृष्ट प्रसंगाला काय विशेषण लावावे या विचारापेक्षा पुढच्या उत्कृष्ट प्रसंगाला सामोरे जावे. विशेषणे झक्कत येतील मागनं.
'दंगल' आणि 'बधाई हो' या चित्रपटांतून प्रसिद्धीस पावलेली सान्या मल्होत्रा ही एका बहिणीच्या भूमिकेत आहे.
मी हे दोन्ही चित्रपट पाहिलेले नसल्याने कोऱ्या पाटीने तिला सामोरे गेलो.
विजय राज या अभिनेत्याला कित्येक भूमिकांत पाहिला होता.
'मॉन्सून वेडिंग' सोडता सगळ्या तत्परतेने विसरण्यायोग्य. विशेषतः वेलकम, नो प्रॉब्लेम, वेलकम बॅक इत्यादी चित्रपटांत. [आता असले भयाकारी चित्रपट मी का पाहतो? पहिल्या दोन ओळी वाचा.]
गॉसिपच्या भक्तांसाठी - अंमली पदार्थ बाळगल्यापायी त्याला अबू धाबीला अटक झाही होती. नको त्या गोष्टी कशा अगदी वेवस्थित लक्षात राहतात!
या चित्रपटात विजय राजने कमाल केली आहे.
इतरांना खाऊन टाकले असे म्हणणार नाही. कारण या चित्रपटातल्या नट-नट्यांपैकी सर्वांना पोटभर खाणे मिळत असल्याने कुणीच कुणाला (कच्चे/मीठ लावून/शिजवून, जेवायला/नाश्त्याला/चहाबरोबर) खाऊन टाकण्याच्या भानगडीत पडत नाही.
दिग्दर्शकाचा वट दिसतो तो असा.
राधिका मदन या अभिनेत्रीने या चित्रपटातून पदार्पण केले आहे. आधी काही टीव्ही मालिकांमध्ये तिने कामे केली आहेत (असे म्हणतात). ती प्रशिक्षित कथ्थक नर्तकी आहे. तिने नृत्य-शिक्षकाचे कामही केलेले आहे. हे सर्व सांगण्याचे कारण, यातील काहीही या चित्रपटात दिसत नाही. कथेची गरज नाही, प्रश्न मिटला.
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील मंडळींना हे कळेल तो सुदिन.
सुनील ग्रोव्हर हा नट नव्वदीच्या दशकापासून (प्यार तो होना ही था) हिंदी चित्रपटांतून दिसतो.
पण 'कुठल्याही चित्रपटातली त्याची कुठलीही भूमिका आठवली तर जीवनदान मिळेल, नाहीतर गोळी घालीन' अशी कुण्या खऱ्या खलनायकाने खऱ्या आयुष्यात अट घातली तर आपण सगळेच मरू.
'पटाखा' नंतर नाही!
सानंद वर्मा हा असाच मधून अधून दिसणारा चेहरा. बहुतेक वेळा टीव्हीवर. त्याने 'ठरकी पटेल' या भूमिकेत जी काही रंगत आणली आहे ती लिहिण्यापलीकडची!
समीर कक्कडची भूमिका नुक्कड मधल्या 'खोपडी'ची अजिबात आठवण करून देत नाही.
केवळ याबद्दलही त्याचे कौतुक करायला हवे. पण नाही. ही भूमिका त्याने आगळीच साकारली आहे, आणि त्याबद्दल कौतुक करायला हवे.
छायाचित्रण कथेशी सुसंगत आहे. उगाचच भलत्यासलत्या कोनातून कॅमेरा लावून गरज नसताना अंगावर येण्याचा मोह दिग्दर्शकाने टाळला आहे.
गाण्यांबद्दल मी उगी राहतो.
पूर्वीपासून, शुद्ध स्वसंरक्षणाच्या भावनेतून, चित्रपटगृहात चित्रपट पाहताना मी गाणी सुरू झाली की लगेच बाहेर पळत असे. सिगरेट ओढायला उत्तम वेळ. टीव्ही बरा. 'म्यूट' करून आवाज दाबता येतो.प्राईम व्हिडिओ (वा तत्सम) सगळ्यात उत्तम. टेप फॉरवर्ड केल्यासारखे पुढे सरकता येते.
थोडक्यात, या चित्रपटाचे संगीत अत्त्युत्तम/उत्तम/बरे/वाईट/भिकार/महाभिकार यातील काहीही असेल.मला ठावे नाही, कारण मला फरक पडत नाही.
गोषवारा असा - या चित्रपटाने मला उदंड आनंद दिला. इंग्रजीत 'सेरेंडिपिटी' म्हणतात त्याचा अनुभव मिळाला.