म्हणींच्या गोष्टी ... (१)

मराठी भाषेचे  शब्दवैभव, मराठी भाषिकांना आणि मराठीच्या जाणकारांना चिरपरिचित आहे.  विविध प्रकारच्या म्हणी,  वाक्प्रचार आणि सुविचारांच्या  अलंकारांची  लेणी मराठी भाषेला लाभलेली आहेत.  काही म्हणी  रोजच्या  संवादात  अगदी सहजपणे  वापरल्या जातात. त्या म्हणी कशा प्रचलित झाल्या असाव्यात,  त्या मागे काय कथा असतील?  
तर काही म्हणींच्या या कथा ...  

एखाद्या  व्यक्तीला  बदलण्याचा काही जण प्रयत्न करीत असतात. त्यांना मनापासून वाटत असते, की त्या व्यक्तीने बदल स्वीकारले तर कल्याण होईल. परंतु त्यांचे सर्व प्रयत्न फोल  ठरतात. आणि ती व्यक्ती मूळ स्वभाव काही सोडत नाही. हे सांगणारी म्हण --

"आधी होता पाग्या - त्याचा केला वाघ्या 
त्याचा येळकोट  राहीना - मूळ स्वभाव जाईना 
कथा : - 
एका  शेतात एक पिटुकला उंदीर  राहत होता. तिथे त्याने  जमिनीमध्ये बीळ केले होते. त्याच्या सग्यासोयऱ्यांच्या सोबत तिथे तो सुखेनैव नांदत होता. एकदा अन्नाच्या शोधात, त्या शेताची सीमा त्याने ओलांडली. एका गावात तो प्रविष्ट झाला. तिथे अनेक घरे होती. घरांमध्ये, रस्त्यांवर माणसेच माणसे. गाई, म्हशी, बैल इ. पाळीव प्राणी देखिल होते.
 
उंदीर दबकत दबकत एका घराच्या अंगणात आला. तिथून ओसरीवर गेला. थोडावेळ घुटमळून घरात शिरला. एका पाठोपाठ एक खोली ओलांडत तिथल्या स्वयंपाकघरात पोहोचला. तिथले दृश्य पाहून हरखूनच गेला. अन्नाची तिथे रेलचेल होती. पण एक बाई तिथे काही कामात मग्न होत्या. म्हणून उंदीर आणखी पुढच्या खोलीत गेला. अनेक खोल्या शोधून शोधून शेवटी तो कोठीच्या खोलीत आला. तिथे भरपूर पोती धान्यसाठा होता. तेलातुपाचे डबे होते. आणखी पण बऱ्याच वस्तू होत्या. उंदराने तिथे काही धान्याची पोती कुरतडली,  भाजीपाल्याच्या, फळांच्या टोपल्यांमधून मनमुराद खेळला. काही वेळाने तो आपल्या शेतातील  बिळाकडे परतला.  दुसऱ्या दिवशी परत त्याने आपला मोर्चा गावाकडे वळवला, पण आज तो एकटा नव्हता. त्याचे भाईबंद त्याच्या बरोबर होते. आज उंदीर सरळ कोठीघराकडेच आला. त्याने आणि त्याच्या भाईबंदांनी तिथे मनमुराद लुटालूट केली. आणि नंतर ते सगळे त्यांच्या बिळाकडे परतले. इकडे घराच्या मालकिणीच्या लक्षात सारा प्रकार आला. तिने तिच्या पती कडे तक्रार केली. घरमालकाने दुसऱ्या दिवशी सगळीकडे पिंजरे लावले. अनेक उंदीर त्यात फसले. काही मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. आता त्या घराकडे यायला कुणी तयार होईना. ज्याने ते घर शोधले, तो उंदीर मात्र थांबायला तयार नव्हता.  तो परत परत तिकडे जातच होता. तिथल्या धान्य, भाज्या वगैरेंचा मनसोक्त उपभोग घेतच होता. घरमालक, मालकीण काळजीत पडली. त्यांचा शाळेत जाणारा मुलगा होता मोठा चतुर. त्याला सुचली एक युक्ती.  त्याने एक मांजर आणली घरात. एक दिवस उंदीर हळूच घरात शिरला. आता तो चांगलाच धीट झाला होता. समोर माणसे दिसली तरी बिनदिक्कत जायचा. आज पण तसेच झाले. तो कोठीघराकडे  जातच होता, तितक्यात त्याला वाटेत मांजर आडवी गेली. उंदीर जरा घाबरला. एका मेजाखाली जाऊन लपला. थोड्यावेळाने मांजराची चाहूल घेत बाहेर आला आणि मांजराने घातली की झडप. उंदीर जीव घेऊन पळत सुटला. कसाबसा गावाबाहेर आला. मांजर मागे नाहीये याची खात्री करून एका झाडाखाली थांबला. त्याला रडू यायला लागले होते. तो नशिबाला दूषणे देऊ लागला.  तितक्यात आवाज आला...

"का रडतोयस?  कोणी तुला त्रास देतंय का? " 
उंदराने रडणे थांबवून आजूबाजूला पाहिले. कुणीच नव्हते.
"अरे सांगशील की नाही?  रडतोयस का?  " 
आता उंदराला समजले. तो जिथे थांबला होता, त्या वृक्षाची देवता बोलत होती. मग उंदराने त्याची कर्मकहाणी सांगितली.  म्हणाला.. "मी इतका लहान, म्हणून मला पळायला लागले. जर मी मांजर असतो तर ..  " 
वृक्षदेवता म्हणाली,  "तथास्तु! " 
आणि काय आश्चर्य? उंदराचे रूपांतर मांजरात झाले होते. मांजर झालेला उंदीर प्रचंड खूश झाला.  

मोठ्या झोकात शेपटी फुलवत त्याने त्याच नेहमीच्या घरात प्रवेश केला. त्याची चाहूल लागल्यावर घरातली मांजर आलीच, पण त्याला बघून मागेच सरली. उंदराला हे नवीनंच होते. उभा जन्म त्याने मांजराला घाबरण्यात घालवला होता. आता तो मनमुक्तपणे घरात वावरू लागला. घरातल्या मुलांना हे नवीन मांजर फारच आवडले होते. ती मुले त्याला दूध देत. त्यांच्याबरोबर खेळायला घेऊन जात. सुखाचे दिवस होते ते. कधी कधी मांजर झालेला उंदीर, त्याच्या जुन्या बिळाकडे जाई. पण तिथले उंदीर त्याला घाबरत. मग या मांजर झालेल्या उंदराला मजा वाटे. 

एक दिवस तो ( मांजर झालेला उंदीर ) घरात फिरत होता. फिरत फिरत स्वयंपाक घरात गेला. तिथे एक दुधाचे भांडे ठेवलेले होते. घरमालकीणबाई त्यावर झाकणी ठेवायला विसरल्या होत्या  बहुदा. या मांजराने लगोलग भांड्यात तोंड घातलेच. जमलेल्या सायीसकट दुधाचा चट्टामट्टा केला त्याने. मग हा त्याचा नेहमीचाच उद्योग झाला. उंदीर त्याच्या समोरून ये जा करीत, आणि हा स्वस्थ पडून राही. मात्र चोरून दूध पिऊन चांगला गलेलट्ठ झाला होता.  

एक दिवस त्या घरात एक नवीन पाहुणा आला. एक भला मोट्ठा कुत्रा. काही दिवसातच घरातल्या सगळ्यांचा लाडका झाला. मुले त्याच्याबरोबरच खेळू लागली. त्यांना आता गलेलठ्ठ झालेले आळशी मांजर आवडत नव्हते. मांजर देखिल कुत्र्याला पाहून फिस्कारत असे. पण पुढे जायची त्याची हिंमत नव्हती. एक दिवस कुत्रा घराच्या अंगणात बसलेला होता. मांजर दबकत दबकत घरात शिरले. सरळ स्वयंपाकघराकडे निघाले. त्याला माहीत नव्हते, की कुत्रा त्याच्या मागेच आहे. दुधाच्या भांड्यात तोंड घालणार, तेव्हढ्यात त्याच्या पाठीवर फटका बसला. मागे वळून पाहिले तर तोच तो भला दांडगा कुत्रा. मांजर घाबरून पळत सुटले. त्याच्या मागे कुत्रा. जरा वेळाने मांजराने मागे वळून पाहिले. पाठीमागे  कुत्रा नव्हता. तो (मांजर झालेला उंदीर ), त्या आधीच्याच झाडाखाली आला. जोरजोरात रडू लागला. नशिबाला दोष देऊ लागला.  

तितक्यात वृक्षदेवतेचा आवाज उमटला,  
"आता काय झाले तुला?  का  रडतो आहेस? "
 ( मांजर झालेला)  उंदीर म्हणाला,
"मला सारखे कुणाला तरी घाबरूनच राहावे लागते.  माझे नशीब किती वाईट आहे?" 
वृक्षदेवतेने विचारले,
"कुणाला घाबरतो आहेस? नीट सांग काय झाले ते. "
( मांजर झालेल्या ) उंदराने सारे काही सविस्तर सांगितले. मग वृक्षदेवतेने त्याचे रूपांतर कुत्र्यात केले.  
"आता काही चिंता नाही ना तुला?  जा आता सुखाने राहा." 

उंदराचा आनंद आता गगनात मावेनासा झाला. तो मोठ्या ऐटीत गावात प्रवेश करता झाला. घराजवळ आला, तर तिथे कुत्रा होताच, अंगणात बसलेला. पण तो आता त्याच्यावर भुंकला नाही, उलट काहीतरी बोलू लागला. कुत्रा बनलेला उंदीर त्याचा मित्र बनला. दोघे मिळून गावातल्या मांजरांना सळो की पळो करून सोडीत. कुत्रा बनलेल्या उंदराला खूप बरे वाटे. याच मांजरांनी त्याला आणि त्याच्या भाईबंदांना लपुनछपून जगणे भाग पाडले होते ना? पण आता त्याला घरात प्रवेश करता येत नसे. तो गावभर फिरे. कुणी ना कुणी त्याला खाऊ घालीत. एकंदरीत बरे चालले होते. 

एक दिवस फिरत फिरत तो ( कुत्रा झालेला उंदीर ) त्याच्या शेतातल्या बिळाकडे आला. कुणीच त्याला ओळखत नव्हते. त्याला जरा वाईट वाटले. तो उदास होऊन तिथे बसला होता. तितक्यात त्याला कसलेतरी हाकारे ऐकू आले. शेतातल्या पिकात कुणीतरी पळत होते. एक दोघे नाही, तर बरीच मोठी टोळी असावी. कुत्रा झालेला उंदीर सावधपणे उभा राहिला. कुत्रा झाला असला, तरी त्याचे काळीज तर उंदराचेच होते ना? त्याचे कान उभे राहिले, शेपटी ताठ झाली. त्याने चाहूल घेतली.  
-- आणि शेतातील उभ्या पिकातून एक भयंकर प्राणी त्याच्यापुढे आला. लालभडक डोळे, तांबूस काळा रंग. कुत्र्यासारखा दिसणारा तो प्राणी, पण कुत्र्यापेक्षा मोठा होता. स्वरूपावरून तो हिंस्र दिसत होता. कोल्हा होता तो. त्याच्या मागून अजून ३-४ कोल्हे आले. आता कुत्रा झालेला उंदीर चांगलाच घाबरला. वाट फुटेल तसा सैरावैरा धावत सुटला. तितक्यात त्याला शेताच्या राखणदारांचा आवाज आला. तेच हाकारे घालत होता,  " कोल्हा आला रे आला..  ". तरीही तो पुढे पळतच राहिला. शेवटी आवाज अस्पष्ट होत,  बंद झाले.  

तो परत त्याच विशाल वृक्षाखाली आला. मागील अनुभवावरून त्याला वाटत होतेच, की देवता त्याला मदत करणार. आणि तसेच झाले. आता त्याचे रूपांतर कोल्ह्यात झाले होते. कोल्हा झालेला उंदीर आता जंगलातच फिरू लागला. गावात तो जाऊ शकत नसे. शेतात देखिल जाण्याचा प्रयत्न केला, की लाठ्या काठ्या घेऊन राखणीला आलेले लोक त्याच्या मागे लागत,  दगड मारत. मग या कोल्ह्याला पळता भुई थोडी होई. त्याचे आयुष्य खूपच बदलून गेले होते. पण त्याला तेच बरे वाटत होते. सगळे आपल्याला घाबरतात, ही जाणीव त्याला सुखदायक वाटायची. जंगलातील काही कोल्हे त्याचे दोस्त झाले. त्यांनी याला आपल्या टोळीत घेतले. पण तरीही जास्त करून तो एकटाच फिरत असे. 

बरेच दिवस उलटले. जंगलातल्या आयुष्याला तो चांगलाच सरावला होता. एक दिवस तो एक झुडपामागे दबा धरून बसला होता. एक लहानसे हरीण गवताच्या शोधात एकटेच तिकडे आले होते. ते जरा टप्प्यामध्ये येताच कोल्ह्याने झडप घातली. पण त्याच्या दुर्दैवाने एका विशालकाय वाघाने देखिल नेमकी त्याच वेळी झेप घेतली होती. या गडबडीत हरीण निसटले. वाघाची क्रुद्ध नजर कोल्हा झालेल्या उंदराकडे वळली. त्या कोल्ह्यामुळे त्याची शिकार निसटली होती. त्याने आपला ताकदवान पंजा उंचावून जोरात फटका मारला. कोल्ह्याने तो कसाबसा चुकवला. पण वाघ काही त्याची पाठ सोडेना. कोल्हा झालेल्या उंदराची भीतीने गाळण उडाली. लहान मोठ्या झुडुपांमध्ये लपून लपून त्याने कशीबशी सुटका करून घेतली.    

आता तो अगदी हताश, निराश झाला होता. इतकी रूपे पालटली, पण ही भीती काही पाठ सोडत नव्हती. त्याला नवल वाटले. बाकीचे प्राणी कसे त्यांच्या त्यांच्या रूपात बदल न करता सुखाने राहतात? माझेच नशीब वाईट. तो मोठ्याने गळा काढून रडू लागला. 
वृक्षदेवतेला कळेना, की इतकी मदत करून देखिल हा प्राणी रडणे काही थांबवत नाही.  तिने जरा त्रासूनच विचारले,  

"अरे आता काय झाले? किती रडशील?" तुला अजून किती मदत करायची? तू काहीही झाले की रडत माझ्याकडे येतोस? तुला तुझ्या संकटांचे निवारण करायला जमलेच पाहिजे. मला इतर प्राण्यांकडेपण लक्ष द्यायला हवे ना?" 
कोल्हा झालेला उंदीर रडवेल्या आवाजात म्हणाला, 
"मला माफ कर.  पण माझ्याहून ताकदीने जास्त असणाऱ्या बरोबर मी कसा मुकाबला   करणार?" 
परत त्याने आपली कर्मकथा वर्णन करून सांगितली.  वृक्षदेवता म्हणाली,  
"ठीक आहे, मी तुझे वाघात रूपांतर करीन. वाघ तर जंगलातील सर्वात ताकदवान प्राणी. त्याला सगळेच घाबरतात. मग तुझी समस्या कायमची संपेल." 
उंदीर र्षभराने म्हणाला, "देवीमाते, तुझी कृपा अपार आहे." 

आता तो वाघ झालेला उंदीर जंगलात ऐटीत फिरू लागला. त्याची चाहूल लागताच, इतर प्राणी पळू लागत. मग त्याचे मस्तक गर्वाने अधिक उंचावले जाई. त्याला वाटले की शेवटी त्याला त्याच्या आयुष्याचे ईप्सित गवसले आहे. आता तो सारे आयुष्य निःशंक,  निर्धोक आणि निर्भयपणे जगू शकेल.
नव्या आयुष्यात तो लवकरच रुळून गेला. गावाच्या, शेताच्या दिशेला जायची आता त्याला गरजच नव्हती. अनुभवातून त्याला कळले होते, की तो जर तिथे गेलाच तर त्याला कुणीच ओळखणार नाही.  

एक दिवस तो आपल्या गुहेच्या बाहेर आरामात बसलेला होता. मधूनच डोळे उघडायचे, मध्येच बंद करायचे, असे चालले होते. एकदम त्याला त्याच्या एका बाजूला काहीतरी हालचाल जाणवली. त्याने सावकाश तिकडे नजर वळवली, तर त्याला एक पिटुकला उंदीर दिसला. त्याने डोळे पूर्ण उघडून, निरखून पाहिले. ती एक लहानशी उंदरी होती. मोठ्या डौलात इकडून तिकडे फिरत होती. काय शोधत होती कोण जाणे? फारा दिवसांनी कुणीतरी ओळखीचे दिसल्या प्रमाणे तो वाघ झालेला उंदीर आनंदला, पटकन उठून आपल्या चार पायावर उभा राहिला. एक क्षण त्याला त्याच्या सद्यस्वरूपाचा विसरच पडला. पण  तो जसा उठला, तसी ती उंदरी सावध झाली. झटकन दूर जाऊन उभी राहिली होती. जरा घाबरल्यासारखी दिसत होती. वाघ झालेल्या उंदराला तिला सांगायचे होते, की त्याच्यापासून तिला काही धोका नाही. पण त्याने बोलायचा प्रयत्न करताच, ती उंदरी अजून दूर पळाली. आता वाघ झालेला उंदीर पुढे गेला, की उंदरी अजून दूर जाई. शेवटी ती एका डोंगराच्या पायथ्याजवळ आली. आणि अचानक तिने डोंगर पोखरायला सुरुवात केली, काही क्षणात ती त्या बिळामध्ये दिसेनाशी झाली.  

वाघ झालेला उंदीर बराच वेळ तिथे थांबला, मग निराश होऊन परत त्याच्या गुहेकडे वळला. तो खूप दुःखी झाला होता. अनेक दिवसांनी त्याच्या मूळ जातीचे कुणी त्याला दिसले. पण तो संवाद साधण्यात अयशस्वी झाला. खाण्यापिण्याकडेही त्याचे लक्ष लागेना. उदास उदास राहू लागला. एक दिवस तो परत त्याच झाडाखाली येऊन थांबला. आता त्याला कसलीही आशा नव्हती. वृक्षदेवतेने त्याला सांगितले होते, की त्याच्या समस्या आता त्यानेच सोडवायला हव्यात. त्याला काहीच सुचत नव्हते. बराच वेळ गेला. काही ससे, बकऱ्या त्याच्या समोरून गेल्या. पण त्याने पंजाही हालवला नाही. 

बरीच रात्र झाली होती. सगळीकडे काळोख दाटला होता. आणि अचानक त्याला तोच चिरपरिचित आवाज ऐकू आला.  
"काय रे?  असा का बसलायस?  बराच काळ लोटला, पण शिकार सुद्धा केली नाहीस?  सारे काही ठीक चाललंय ना? "
त्याला क्षणभर त्या वृक्षदेवतेचाच राग आला. का तिने माझे रूप पालटले? एकदा नव्हे अनेकदा. आणि शेवटी काय झाले? मी सुखी नाहीच होऊ शकत. तो वाघ झालेला उंदीर अश्रू ढाळू लागला. देवीच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. 
 
"अरे जंगलातील सर्वात ताकदवान प्राणी तू.  असे अश्रू का ढाळतोस?"  वृक्षदेवतेने विचारले. 
"देवी मी शक्तिवान आहे, पण फार एकाकी झालो आहे. तू माझे बाह्यरूप पालटलेस, पण अंतर्यामी मी तोच आहे. मी इतर वाघांबरोबर  मिळून मिसळून राहू शकत नाही. आणि माझ्या जातीचे प्राणी मला घाबरतात. माझ्यापासून दूर जातात. " 
देवीला क्षणार्धात सारे काही उमगले. अंतर्ज्ञानाने तिने जाणले, की त्याच्या आताच्या समस्येचे मूळ आहे ती पिटुकली उंदरी.
" अस्सं आहे होय? मग काय तू परत उंदीर होणार? परत सगळ्यांना घाबरून राहणार? जमिनी खालच्या बिळातच सारे आयुष्य काढणार? "
वाघ झालेला उंदीर केविलवाणेपणाने देवीकडे बघत म्हणाला,
"होय देवी, माझी तिच इच्छा आहे. परत मी कधी तुझ्याकडे गाऱ्हाणे घेऊन येणार नाही. वचन देतो. " 
"ठीक आहे तर मग. हो तू उंदीर. "  वृक्षदेवतेने आशीर्वाद दिला, आणि ती अंतर्धान  पावली. 

क्षणार्धात वाघाचा उंदीर झाला. अत्यंत आनंदीत झालेल्या उंदराने लगोलग तो डोंगर गाठला. त्या उंदरीने पोखरून तयार केलेल्या बिळात त्याने सहज प्रवेश केला. आत असलेली उंदरी सावध झाली. पण उंदराला पाहून निश्चिंत झाली.  
आता या पुढे काय सांगणार? दोघेजण परत शेतातील बिळाकडे आले. बघता बघता त्यांची संख्याही वाढू लागली. आणि सारेजण सुखाने कालक्रमणा करू लागले.  

हीच म्हण अशीही वापरतात, 
 
आधी होती दासी - तिस केले पट्टराणी 
तिचे हिंडणे राही ना - मूळ स्वभाव जाईना 
त्याची कथा पुन्हा केव्हा तरी ...