झुंड

झुंड सिनेमा नागराजने त्याच्याच कामाने उंचावलेल्या अपेक्षांची उंची गाठण्यात कमी पडतो. मी फारच अपेक्षा ठेवून गेलो होतो आणि त्यामुळे निराशा पदरी पडली असे खेदाने म्हणावे लागतंय. पण ह्याचा अर्थ सिनेमा फसलाय का? तर अजिबात नाही. जे काही 'स्टोरी टेलींग' नागराजला करायचे आहे ते काम नागराजने व्यवस्थित केले आहे. पण सिनेमा बघताना काहीतरी कमी पडतंय असं सतत वाटत राहतं.

सिनेमाची लांबी खूप आहे, त्यात असलेल्या पात्रांच्या संख्येमुळे तसं असणं साहजिक असेल असं वाटलं होतं. पण, सिनेमात प्रत्येक पात्राची बैठक ठसवण्याचा प्रयत्न अपुरा पडला आहे. डॉक्युमेंट्री पद्धतीने पात्रांची ओळख करून देण्याचा वेगळाच प्रयत्न केला आहे. तो मनाला भिडतो पण काळजाचा ठाव घेत नाही. अंकुशची मुख्य व्यक्तिरेखा बऱ्यापैकी आकार घेत साकार होते पण त्याप्रमाणे बाकीच्या व्यक्तिरेखा आकार न घेता साकार होत राहतात. कलाकारांच्या भाऊगर्दीत पटकथा रेंगाळत राहते आणि बऱ्याच वेळा संथ होते. पात्रांची संख्या मर्यादित ठेवूनही झोपडपट्टीतल्या आयुष्याची विदारकता परिणामकारक करता येऊ शकली असती पण ह्यावेळी काहीतरी गडबड झाली आहे. पटकथा विस्कळीत झाली आहे. सगळी उपकथानकं एकसंध, घट्ट आणि ठाशीव न वाटता तुकड्या-तुकड्याने जोडल्यासारखी येत राहतात.

स्पॉयलर अलर्ट:
(विसा नसलेला, नुसता नवाकोरा पासपोर्ट घेऊन परदेश प्रवासासाठी बोर्डिंग पास कसा देता येईल? इतका महत्त्वाचा तपशील पटकथेला ठिसूळ बनवतो.)

अजय-अतुल यांचं संगीत ठीक आहे. फार काही स्कोप नाहीयेय पण आंबेडकर जयंतीचे गाणे झिंगाटच्या सावलीत असल्यासारखे झाले आहे.

सिनेमात दखल घेण्यासारखं काय असेल तर ते म्हणजे हा सिनेमा भारतीय सिमेनातले प्रस्थापित स्टीरिओटाइप्स मोडतो. झोपडपट्टीच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर जयंतीचं सेलीब्रेशन, त्यासाठीची वर्गणी वसुली आणि 'जय भीम' कथानकात ठळक आणि ठाशीव रूपात येतात. अमिताभने अतिशय लो प्रोफाइल आणि टोन्ड डाउन होऊन व्यक्तिरेखा साकारली आहे. चित्रपटभर अमिताभ नागपूरमधला एक सामान्य शिक्षकच वाटतो, फक्त कोर्टातल्या सीनमध्ये त्याच्यातला 'अमिताभ' बाहेर आला आहे. सर्व कलाकार जीव तोडून काम करतात. अर्थात तसे कलाकार शोधून त्यांच्याकडून काम करून घेणं ह्या नागराजचा हातखंडा आहे. त्याच्या टीममधले सगळे जुने कलाकार ह्या सिनेमातही आहेत आणि आपापली कामं चोख करतात.

देशभरातला निम्न स्तरावरचा समाज, त्या समाजाचं विस्थापित असणं, उच्च स्तरावर त्या समाजाच्या अस्तित्वाची दखलही नसणं आणि जर ती दखल घेणं भाग पडलं तर अवहेलना करणं, हे आजच्या काळातही कसं चालू आहे ह्यावर संवेदनशीलपणे परिणामकारक भाष्य करणं ही नागराजची खासियत आणि ताकद आहे. ह्या सिनेमातही तो ते भाष्य करण्याचा प्रयत्न करतो. पण ते तितकं अंगावर येत नाही. उच्चभ्रूंचं कॉलेज व प्रस्थापित समाज आणि झोपडपट्टी ह्यांच्यामध्ये एक भिंत दाखवली आहे. ते ह्या दोन समाजातल्या संबंधांचं प्रतीक आहे. झोपडपट्टीमधली मुलं त्यांच्या अंगी असलेल्या गुणांमुळे, क्षमतांमुळे ही भिंत ओलांडू बघतात आणि एक भला माणूस त्यांना भिंतीच्या ह्या पलीकडे आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. फ़ॅन्ड्रीमधेही ही भिंत आहे, शाळेची भिंत. पण ती भिंत ज्या परखडपणे अंगावर येऊन काळजाचा जसा ठाव घेते तितकी ह्या सिनेमातली भिंत उंची गाठत नाही. कदाचित, हिंदी सिनेमाचा पहिलाच प्रयोग असल्यामुळे नागराज त्याच्या होम ग्राउंड मराठी सिनेमात जितका परखड होतो तितका ह्या सिनेमात तो होतोय असं जाणवतं नाही.

प्रस्थापित आणि विस्थापित ह्यांच्यामधल्या प्रचंड मोठ्या भिंतीला ही 'झुंड' टक्कर देते पण भिंतीला ह्यावेळी भगदाड पडत नाही!

जरी सिनेमा अपेक्षीत उंची न गाठल्याने निराश करतो तरीही स्टिरीयोटाइप्स तोडणारा प्रयोग चुकवून चालणार नाही, एकदा दखल घेण्याजोगा नक्कीच आहे!