अणोरणीयान्महतो महीयान्

     शरीर आणि देह हे शब्द सर्वसाधारणपणे एकाच अर्थी जरी वापरले जात असले तरी यात थोडा फरक जाणवतो. केवळ स्थूलधर्मी, ‘शीर्ण’ होत जाणारे ते शरीर आणि ज्यात अंतःकरण, जे शीर्णधर्मी नसते त्या़सह असलेला, तो देह असे म्हणता येईल. (शरीरापेक्षा देहाचे स्वरूप पंचकोशात्मक किंवा अधिक सूक्ष्म आहे. मृत्युनंतर स्थूलदेह नाश पावतो, पण प्राण, वासना, मन, विज्ञान, आदी ज्यात आहेत असा सूक्ष्मदेह नष्ट होत नाही, असे मानलेले आहे. द+इह; माणसाला भोग जिथे प्राप्त होतात, तो इहलोक व या भोगांचे दमन करू शकतो तो देह.)

     देहाची सारी कार्ये स्पंदनात्मक असतात. हृदयाचे स्पंदन चालते म्हणून रक्ताभिसरण चालते. आंतड्याच्या अंतःत्वचेवरील सूक्ष्म केश (सिलिया) स्पंदनशील असतात म्हणून अन्न पुढे सरकते, पचले जाते. फुफ्फुसांचे स्पंदन चालते म्हणून श्वासोच्छ्वास चालत राहातो. याच तत्त्वाने मनाचे कार्य अभिसरणात्मकच असते का? शरीरशास्त्रात ज्ञानसंस्थेचे कार्य कसे चालते, त्याचे स्पष्टीकरण मिळते. मेंदूतील ज्ञानकेंद्रे आणि इंद्रिये ही ज्या मज्जाप्रणालीने जोडलेली असतात, त्यात मज्जाद्रवाचा भाग असतो. या द्रवाच्या माध्यमातून स्पंदने वा तरंग बाहेरून ज्ञानकेंद्रापर्यंत पोहोचतात तसेच ज्ञानकेंद्राने दिलेल्या आज्ञा इंद्रिये तसेच स्नायूंपर्यंत पोहोचविल्या जातात. हे तरंग अथवा स्पंदनाचे माध्यम अदृश्य राहून कार्य करते, त्यालाच मन म्हणता येईल.

     महाभारताच्या शांतिपर्वातील एक वचन आहे,

               ‘व्यवसायात्मिका बुद्धिः मनो व्याकरणात्मकम्‌’

     यावर लोकमान्य टिळकांच्या ‘गीतारहस्य’ ग्रंथात श्रीमद्‌भगवद्गीता, उपनिषदांचाही संदर्भ देत (‘आधिदैवतपक्ष व क्षेत्रक्षेत्रज्ञविचार’ या प्रकरणात) विश्लेषण केलेले आहे. या विश्लेषणात त्यांनी दोन संदर्भ दिले आहेत-

     १) बृहदारण्यकोपनिषदाच्या पहिल्या अध्यायाच्या दुसर्‍या ब्राह्मणात आत्म्याच्या अन्नाचा विचार केला गेला आहे. त्यातील तिसरा मंत्र असा आहे-

               त्रीण्यात्मनेऽकुरुतेति मनो वाचं प्राणं तान्यात्मनेऽकुरुतान्यत्रमना अभूवं नादर्शमन्यत्रमना अभूवं नाश्रौषमिति मनसा ह्येव पश्यति मनसा शृणोति । कामः संकल्पो विचिकित्सा श्रद्धाश्रद्धा-धृतिर्ह्रीर्धीर्भीरित्ये तत्सर्वं मन एव तस्मादपि पृष्ठत उपस्पृष्टो मनसा विजानाति यः कश्च शब्दो वागेव सा । एषा ह्यन्तमायत्तैषा हि न प्राणोऽपानो व्यान उदानः समानोऽन इत्येतत्सर्वं प्राण एवैतन्मयो वा अयमात्मा वाङ्मयो मनोमयः प्राणमयः ॥ (बृ.उप. १.५.३)

          - त्याने (आत्म्याने) तीन प्रकारचे अन्न स्वतःसाठी निर्मिले- मन, वाणी आणि प्राण (हे ते अन्न होय.) ‘माझे मन दुसरीकडेच होते, म्हणून मी नाही ऐकले’ (असे जे मनुष्य म्हणतो, त्यावरून हे निश्चित होते की-) मनुष्य मनाद्वारेच पाहातो आणि मनाद्वारेच ऐकतो. काम, संकल्प, संशय, श्रद्धा, अश्रद्धा, धृती (धारणाशक्ती), अधृति, लज्जा, बुद्धी, भय हे सारे मनच आहे. याच्याद्वारेच मागच्या बाजूने केलेला स्पर्शसुद्धा (त्वचेद्वारे) मनुष्य जाणू शकतो. जो काही शब्द (ध्वनी) आहे, तीच वाचा आहे, कारण सांगण्याजोगा जो विषय असतो त्यात ती लपलेली राहाते (तिचा मनाद्वारेच बोध होतो). प्राण, अपान, व्यान, उदान, समान आणि अन हे सारे प्राणच आहेत. आत्म्याचा हा देह (सूक्ष्म शरीर) वाङमय, मनोमय आणि प्राणमय आहे.

      २) मैत्र्युपनिषदाचा मंत्र ६.३० पाहाताना एक गोष्ट लक्षात येते की हे उपनिषद म्हणजेच कपिलमुनिंचे ‘सांख्यदर्शन’ आहे. कपिल मुनी हे श्रीविष्णुचा अवतार समजले जातात. ब्रह्मदेवांच्या छायेपासून जन्मलेले, अर्थात्‌ब्रह्मदेवांसारखेच ज्ञानी असलेले कर्दम ऋषी आणि मनुकन्या देवहूती यांच्या पोटी जन्म घेऊन कपिलांनी तिला परमार्थज्ञानाचा जो उपदेश केला, तेच सांख्यदर्शन. त्याच्या अध्याय ६, मंत्र ३० मध्ये म्हटले आहे- लयविक्षेपयोर्व्यावृत्येत्याचार्याः ॥ - लय वृत्ती म्हणजे निद्रा. निद्रावस्थेत सार्‍या वासना निद्रेतच लीन झालेल्या असतात. (विक्षेपवृत्ती चार प्रकारच्या आहेत - प्रमाण, विपर्यय (भ्रम), विकल्प आणि स्मृती. ध्यानावस्थेतही या सार्‍या वृती लीन झालेल्या असतात.)

     भौतिक विज्ञान मनाचे दोन प्रकार करते; एक बाह्यमन व दुसरे अंतर्मन. इंद्रियांकडून संदेश घेऊन ज्ञानकेंद्रांकडे जाणारे ते बहिर्मन असे आपण म्हणू. पहा - श्वेताश्वतरोपनिषदात (अध्याय ४, मंत्र ६) एक प्रसिद्ध मंत्र आहे -

           ‘द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिषस्वजाते ।’

          -दोन सुंदर, बलिष्ठ पंखांचे पक्षी एकाच झाडाचा (देहाचा) आश्रय घेऊन सहचर होऊन राहातात.

     हे वर्णन जीव आणि आत्मा यांचे आहे, असे अध्यात्मात सांगितले जाते. परंतु हेच वर्णन मनालाही लागू होते. भौतिक विज्ञान मनाचे दोन प्रकार करते; एक बाह्यमन व दुसरे अंतर्मन. इंद्रियांकडून संदेश घेऊन ज्ञानकेंद्रांकडे जाणारे ते बहिर्मन असे आपण म्हणू. अधिक जाणती क्रिया करणारे, ज्ञानकेंद्राकडून आज्ञांचे वहन करणारे ते अंतर्मन असे म्हणू. भारतीय मानसशास्त्र मात्र केवळ मनाचा विचार न करता अंत:करणाचा विचार करते. हे अंत:करण मन, बुध्दी, चित्त, अहंकार या अंत:करण चतुष्टयाचा विचार करते. गीतारहस्यात या विषयाचा अधिक बारकाईने विचार करताना बुध्दी, धी, धृति, मती, मेधा, स्मृति, प्रज्ञा, विवेक असे विभाग मानले आहेत. या कार्यांचा वाहक असलेले जे मन, त्या मनाचे चोवीस गुण असल्याचे सांगितले जाते. ते गुण कोणते ते पाहू- मनाचे कार्य (चार गटात विभागलेले) : गट : १) कल्पना २) भावना ३) अनुभूती ४) रिपु

     गुण : संकल्प, उत्साह, लज्जा, काम, वासना, कारुण्य, आनंद, क्रोध, इच्छा, कळकळ, भीती, लोभ, स्मृती, प्रेम, राग, मोह, धृती, दया, संग, मद, श्रध्दा, कृतज्ञता, द्वेष, मत्सर.

     यावरून असे दिसते की मन हे एक असे माध्यम किंवा अंग आहे जे वरील चोवीस प्रकारची स्पंदने धारण करू शकते. ही स्पंदने निर्माण होतात, ती इंद्रियांचा बाह्य विषयाशी संबंध येतो तेव्हा. बाह्य विषयाशी इंद्रियांचा संबंध आलाच नाही तर मनात स्पंदने निर्माण होणार नाहीत. स्पंदनाचा अभाव हा कार्यशून्यता आणतो, हे ओघाने आलेच. प्रकाश हा डोळ्यांना शुभ्रवर्णी दिसतो. पण हा प्रकाश सात रंगांच्या किरणांचा बनलेला असतो हे कांचेच्या लोलकाच्या मदतीने अनुभवता येते. तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा हे सात रंग प्रकाशात सामावलेले असतात. जो रंग आम्ही अनुभवतो, तेव्हढेच किरण परावर्तित होऊन डोळ्यापर्यंत येतात. बाकीचे किरण त्या वस्तूत शोषले गेलेले असतात. प्रत्येक किरणाची विशिष्ट तरंगक्षमता असते, त्यामुळे हे घडते.

     तरंग हे वेगवेगळ्या स्पंदनांचे परिणाम असल्याचे दिसून येते. प्रकाशतरंगांचा अभाव कृष्णवर्णी अंधार असतो. ध्वनीचेही असेच तंत्र असते. ध्वनीचे तरंग नसतील तेव्हा नीरव शांतता असते. ध्वनीचे वेगवेगळे तरंग जेव्हा कानाच्या आतील पडद्यावर आघात करतात, तेव्हा कानाची अंतर्गत रचना ते स्पंदन ग्रहण करते. या तरंगांचे वहन श्रवण केंद्रापर्यंत पोहोचते आणि ध्वनीचे ज्ञान होते.      

     ध्वनीची भाषेशी सांगड घालत १६ स्वर आणि ३६ व्यंजनांची रचना केली गेली आहे. ही ५२ अक्षरांची वर्णमाला म्हणजे ध्वनीतरंगमालिका आहे. नाक, मुख, त्वचा या इंद्रियांची कार्येही याच प्रकारे स्पंदनात्मक असतात. ही स्पंदने शरीरांतर्गत ऊर्जेत रूपांतरित होतात. तारेतून वीज वाहाते, त्याप्रमाणे ही ऊर्जा मज्जातंतूद्वारे योग्य त्या ठिकाणी पोहोचून इंद्रियांद्वारे आवश्यक अनुभूती देण्याचे कार्य करते. आकाशवाणीची केंद्रे जशी एका विशिष्ट तरंग-अंकावरच कार्यान्वित होणारी असतात, तशीच ही प्रणाली कार्य पार पाडते. ५५० कि.हर्ट्झ वर मुंबई केंद्राचे कार्यक्रम ऐकू येतात हे आपण पाहातोच. मनाचे हे जे चोवीस गुण, त्या गुणांमुळे व्यक्तीच्या स्वभावाची ओळख तयार होत जाते. जो गुण प्रधानत्वाने असतो, ती व्यक्ती त्या स्वभावाची मानली जाते. या गुणांचा योग्य उपयोग मानवाला व्यक्तीपातळीवर तसेच सामूहिक पातळीवर व्हावा, सर्व समाज सुदृढ मनोवृत्तींचा असावा, जे सुख मिळावयाचे ते अनेकांना मिळत राहावे व आनंदप्राप्ती होत राहावी, यासाठी कालाच्या ओघात जसे अनुभव गोळा होत गेले, त्याप्रमाणे विचारवंतांकडून आचारनीती तयार केली गेली. त्यातून होणारे फायदे पाहून माणसाने त्या नीतीचा अवलंब कधी स्वेच्छेने केला तर कधी बंधन म्हणून त्याला ती नीतीतत्वे स्वीकारावी लागली.

***