देह आणि बंदिवास (८)

इथली प्रत्येक व्यक्ती आपण देहात आहोत या विभ्रमात आहे आणि आजतागायत सर्व सिद्धांनी, एकूण एक आध्यात्मिक साधना; देहाच्या परिप्रेक्ष्यातूनच सांगितल्या आहेत. देहात कुणीही नाही याची कुणाला कल्पनाच नाही ! आपण देहात आहोत या भ्रामक धारणेतून एकदा साधना सुरू केली की मुक्त स्थितीचा उलगडा असंभव. उलट पक्षी, सगळी साधना आपण देहात आहोत आणि आपल्याला मुक्त व्हायचंय हाच भ्रम सघन करत नेते.

तस्मात, सुरुवात वस्तुस्थितीशी सुसंगत हवी आणि वास्तविकता अशी आहे :

अर्भकाचा जन्म होतो तो केवळ स्केलेटन आणि फ्लेश असतो आणि त्यात श्वासोत्छ्वास करण्याची क्षमता निर्माण होऊन देह जिवंत होतो. मृत्यूची अनेक कारणं असू शकतात पण मुख्य कारण देहाची श्वासोत्छ्वास करण्याची क्षमता संपते. थोडक्यात, तुमचा देह या क्षणी सुद्धा श्वासोत्छ्वास करण्याची क्षमता असलेला स्केलेटन आणि फ्लेश आहे. 

अंगीभूत जाणण्याची क्षमता असलेली एक व्यापक सार्वत्रिकता; जगातले सर्व देह अंतर्बाह्य व्यापून आहे आणि ज्याप्रमाणे ती सध्या देहाचं जिवंत असणं जाणते आहे तद्वत ती देहाचा अंत ही जाणेल. ही सार्वत्रिकता देहाच्या जिवंत असण्यानं किंवा देहान्तानं यत्किंचितही बदलत नाही.

आपली जाणण्याची प्रक्रिया म्हणजे व्यापक सार्वत्रिकतेच्या जाणण्याच्या क्षमतेचा इंद्रियगम्य उपयोग आहे. सार्वत्रिकता निरिंद्रिय आहे त्यामुळे ती उच्चारण, अवलोकन, गंध, स्वाद किंवा स्पर्श वीराहीत आहे, त्या सर्व इंद्रियगम्य दैहिक प्रक्रिया आहेत. अर्थात, सार्वत्रिकतेच्या जाणण्याच्या क्षमतेचा, वैयक्तिक जाणिवेसाठी क्षणोक्षणी होणारा उपयोग जगण्यासाठी अनिवार्य आहे पण त्यामुळे जाणणारा असा कुणी तरी देहात आहे असा जो भ्रम होतोय तो सर्वस्वी व्यर्थ आहे.

देहात जाणणारा असा कुणी तरी आहे हा भ्रम सार्वजनिक आहे आणि भाषा अज्ञानी लोकांनी तयार केल्यानं प्रत्येक जण; मी चालतो, मी बोलतो, मी हे किंवा ते केलं असंच म्हणतो. वास्तविकात सगळं इंद्रियगम्य जाणणं आणि प्रत्येक क्रिया या दैहिकच आहेत, तरीही खुद्द देहात मात्र कुणीही नाही. 

सर्व जाणण्याशी आणि करण्याशी, भाषिक विभ्रमातून,  कुठेही नसलेला एक भ्रामक मी जोडला जातो. भाषा ही व्यावहारिक अनिवार्यता आहे आणि ती बदलणं आता शक्य नाही.

अज्ञानी भक्तीमार्गीयांनी हा 'मी' चा विभ्रम सोडवण्यासाठी 'तो करतो' किंवा 'करून घेतो' असा नवा भंपकपणा शोधला आहे. देहात जसा कुणी नाही तव्दत बाहेर सुद्धा कुणी नाही. मूळ मुद्दा असा आहे की क्रिया ऐच्छिक असो की अनैच्छिक, ती दैहिकच आहे आणि देहात मात्र कुणीही नाही ! 

उपरोक्त लेखनातून तुम्ही जर वस्तुस्थिती जाणली तर तीन गोष्टी हमखास घडतील :

१. देह केवळ स्केलेटन आणि फ्लेश आहे त्याच्या आत कुणीही नाही हा उलगडा होईल.

२. देहात कुणीही नाही या उलगड्यानं तुम्हाला मुक्ततेचा आल्हाद जाणवेल. आता या क्षणी सुद्धा देहात कुणीही नाही अशी साधी कल्पना करून पाहा, तुम्हाला एकदम निर्भार झाल्यासारखं वाटेल.एकदा देहात कुणी नाही म्हटल्यावर मृत्यूची भीती संपली. म्हणजे देहाचा अंत होईल पण आत मरणारा कुणीही नसेल.

३. जसे तुमच्या देहात कुणी नाही तसेच कुणाच्याही देहात कुणीही नाही. त्यामुळे सर्व नाती-गोती या व्यावहारिक कल्पना आणि मान्यता आहेत. हे समजता क्षणी तुम्ही नात्यांच्या भावनिक गुंत्यातून मुक्त होता ! तुमचं जगणं निर्वैयक्तिक, मुक्त आणि स्वच्छंद होतं.