काळया वाटाण्याचा रस्सा - सोयाबीनसह

  • भिजवलेले काळे वाटाणे पाव किलो (किमान अठरा तास पाणी बदलत भिजवलेले; म्हणजे पाककृतीसाठी लागणारा वेळ खरे तर एकोणीस ते पंचवीस तास))
  • सोयाबीन चंक्स (न्यूट्रीला मिनि चंक्स वा तत्सम) ८० ते १०० ग्रॅम
  • कांदे २५० ते ३०० ग्रॅम
  • मॅगी कोकोनट मिल्क पावडर १०० ग्रॅम
  • हिरव्या मिरच्या ६ - १० आवडीप्रमाणे
  • गरम मसाला २५-३० ग्रॅम (शक्यतो मालवणी मसाला)
  • तेल दोन-तीन पळ्या (आवडीप्रमाणे)
  • हळद, हिंग, जिरे, मेथीदाणे, मीठ - गरजेप्रमाणे
१ तास
चार-सहा जणांच्या जेवणासाठी

काळे वाटाणे अठरा ते चोवीस तास पाणी बदलत भिजवावेत. तदनंतर दोन चमचे हळद नि अर्धा चमचा हिंग घालून कुकरमध्ये शिजवून घ्यावेत. एक शिटी झाल्यावर ज्योत बारीक करून पंधरा मिनिटांत शिजतील.

सोयाबीन चंक्स गरम (उकळत्या नव्हे) पाण्यात घालून ठेवावेत.

मॅगी कोकोनट मिल्क पावडर ७५० मिली कोमट पाण्यात घालून ढवळून नारळदूध करून घ्यावे.

कांदे बारीक कापून घ्यावेत.

तेल कढईत गरम करून घ्यावे.

धुरावल्यावर ज्योत बारीक करून जिरे, मेथीदाणे, हळद आणि उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालाव्यात. नीट हलवून घ्यावे.

चिरलेला कांदा घालून ज्योत मोठी करावी. कांद्यापुरते मीठ घालावे.

कांद्याचा रंग पालटायला लागला की गरम मसाला घालून ज्योत बारीक करावी. सगळे सारखे करून घ्यावे.

पाच मिनिटांनी शिजवलेले काळे वाटाणे घालावेत. काळ्या वाटाण्यांपुरते मीठ घालावे. ज्योत मोठी करून हलवत रहावे. पाच मिनिटांनी सोयाबीन चंक्स घालावेत आणि त्यांच्यापुरते मीठ घालावे.

पाच मिनिटे ज्योत मोठी ठेवून हलवत रहावे.

ज्योत बारीक करून नारळदूध घालावे.

सगळे हलवून सारखे करावे.

किमान अर्धा तास मंद आचेवर रटरटवावे. अर्ध्या तासाहून जास्ती रटरटवल्यास 'पाककृतीला लागणारा वेळ' त्याप्रमाणे बदलून घ्यावा.

सोबत पुऱ्या असल्यास उत्तम.
स्वप्रयोग