डबल अंडा भुर्जी

  • अंडी चार - दोन उकडलेली, दोन कच्ची
  • कांदे दोन मोठे / तीन मध्यम
  • टॉमेटो दोन मोठे / तीन मध्यम
  • हिरव्या मिरच्या - चार/आवडीप्रमाणे
  • तेल एक मोठी पळी
  • हळद एक चमचा, गरम मसाला दोन चमचे, मीठ चवीप्रमाणे
३० मिनिटे
दोन जणांसाठी

दोन अंडी उकडून घ्यावीत. गार करून सोलावीत / सोलून गार करावीत.

कांदे नि टॉमेटो बारीक चिरून घ्यावेत. मिरच्या आवडीप्रमाणे कापून घ्याव्यात.

कढईत तेल तापवावे. धुरावल्यावर ज्योत बारीक करून मिरच्या घालाव्यात. मिरच्यांचा खाट गेला की हळद घालून हलवून घ्यावे.

चिरलेला कांदा घालून ज्योत मोठी करावी. कांद्याचा रंग पालटू लागला की गरम मसाला घालावा. मसाला नीट लागला की चिरलेले टॉमेटो घालून ज्योत मोठी करावी. कांद्या-टॉमेटोपुरते मीठ घालावे.

उकडून सोललेली अंडी बारीक चिरून घ्यावीत.

कांद्या-टॉमेटोचे तेल सुटू लागले की उकडलेली-चिरलेली अंडी घालून ज्योत बारीक करावी. सगळे सारखे करून घेतल्यावर ज्योत मोठी करून दोन कच्ची अंडी फोडून सगळ्या मिश्रणात घालावीत. अंड्यांपुरते मीठ घालून पटापट हलवत रहावे. फोडून घातलेली कच्ची अंडी आळल्यावर गॅस बंद करावा.

ऐच्छिक:

(१) वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

(२) वरून किसलेले चीज घालावे.

(३) ज्योत बंद करण्याआधी वरून अमूल बटर घालावे.

स्वप्रयोग