पुन्हा वाटते की ..

पुन्हा वाटते कीतुझी प्रीत व्हावे,
तुझ्या अंतरातील संगीत व्हावे,
तुला वाटते जे कधी गुणगुणावे,
तुझ्या मूक ओठात ते गीत व्हावे....  ॥ धृ ॥ 

किती दूर गेले मनाचे किनारे
नसे हात हातात
विरले शहारे
कशा ओळखीच्या खुणा सापडाव्या
?
तुला दूर करतात सारे पहारे

असे का, कशाने हे अघटित व्हावे?
पुन्हा वाटते कीतुझी प्रीत व्हावे...॥ 1 ॥ 

किती कोरड्याशुष्क झाल्यात भेटी
कशा काळजालाही बसल्यात गाठी
चुकांचा धनी मीच आहे सदाचा
तरी राहताना तुझे नांव ओठी

अकल्पित पुन्हा तुझा मीत व्हावे
तुझ्या मूक ओठातले गीत व्हावे... ॥ 
2  ॥ 

तुझ्या संगतीने उभा जन्म तरतो
तुझ्या आठवांचा उरी गंध भरतो
जरी पोळलो मी उन्हाच्या झळांनी
तुला पाहता मी ना माझाच उरतो

पुन्हा अंगणी तूच बरसात व्हावे,
तुझ्या मूक ओठातले गीत व्हावे.... ॥ 3 ॥