महाभारत कथा (२०)

महाभारत कथा (२०)
पांडवांचा अपमान करण्यासाठी दुर्योधन थाटामाटात द्वैतवनात दाखल झाला. पण वनवासातही शांत आणि समाधानी असलेल्या पांडवांना त्याच्या वैभवाचे आकर्षण नव्हते. सरोवरातील जलक्रीडेवरून गंधर्वांशी संघर्ष झाला आणि दुर्योधनासह कौरव बंदी बनले! शत्रूला संकटात पाहूनही युधिष्ठिराने मदतीचा आदेश का दिला?
वाचा, अहंकाराचा अनपेक्षित पराभव करणारी महाभारतातील विलक्षण कथा!

द्रौपदी आणि पांडवांचा विवाह संपन्न झाला होता. त्या जगावेगळ्या विवाहाला कुणीही विरोध केल्याचा उल्लेख दिसत नाही. नारदमुनी आणि श्रीकृष्णांच्या संमतीनेच तो विवाहसोहळा पार पडला होता. पण आता नवे संकट सामोरे होते. पांडव सुखरूप आणि जिवंत आहेत हे सर्व जगाला कळले होते. दुर्योधनाने स्वतः पाहिले होते आणि युद्धात त्यांच्याकडून पराभव स्वीकारला होता. पांडव आता उघडपणे वावरू शकत होत, पण त्यामुळे दुर्योधनाला त्यांचा ठावठिकाणा माहिती झालेला होता. त्याचे सैनिक कधीही पांडवांपर्यंत पोहोचू शकत होते .

असे असले तरी परिस्थिती पूर्णतः बदललेली होती. पांडव आता एकाकी नव्हते, सामर्थ्यशाली आणि प्रबळ प्रदेशाचे राज्यकर्ते असलेले महाराज द्रुपद त्यांचे श्वशुर होते. द्वारकाधिपती श्रीकृष्णाचे समर्थन आणि साहाय्य त्यांच्या पाठीशी होते. घडलेल्या घटनेची वार्ता हस्तिनापुरात पोहोचली होतीच. पितामह भीष्मांनी पांडवांशी वैर न करण्याचा सल्ला दुर्योधनाला दिला आणि पांडवांना सन्मानाने हस्तिनापुरामध्ये निमंत्रित करण्यास सांगितले होते.

नाईलाजाने धृतराष्ट्राने पांडवांना हस्तिनापुरामध्ये येण्याचे रीतसर आमंत्रण दिले आणि पांडवांनीही ते स्वीकारले. परंतु हे वरवरचे सौजन्य होते, त्यामुळे निर्माण झालेली शांतता चिरस्थायी नाही याची जाणीव सर्वांनाच होती. दुर्योधनाच्या मनात असलेला पांडवांविषयीचा विखारी द्वेष सर्वांना कळून चुकला होता. हस्तिनापुरामध्ये पांडव सुरक्षित नव्हते, कौरव पांडव फार काळ एकत्र राहू शकत नव्हते. भीष्म आणि विदुरांनी धृतराष्ट्राला राज्याची विभागणी करण्याचा सल्ला दिला. राजपुत्रांनी विनाकारण आपापसात लढून जीवितहानी, वित्तहानी करू नये असे त्यांचे मत होते. दुर्योधनाने केलेली कारस्थाने उघडकीस आल्याने धृतराष्ट्र धास्तावलेला होता. न्यायी राजा अशी स्वप्रतिमा कायम राहावी म्हणून त्याने राज्यविभागणीचा सल्ला मान्य केला.

नववधू द्रौपदीसह पांडव आणि कुंती हस्तिनापूर नगरीमध्ये आले. वरकरणी आनंदाने दुर्योधन आणि सम्राट धृतराष्ट्राने त्यांचे स्वागत केले होते. पांडव सुखरूप असल्याची वार्ता समजल्यानंतर प्रजाजन आनंदात होते. पांडव आता एकाकी आणि अनाथ नव्हते त्यामुळे दुर्योधनाचा नाईलाज झालेला होता. पांडवांचा घात करण्याचा प्रयत्न करणेदेखील धोकादायक होते.

वारणावताच्या अग्निकांडातून पांडव सुखरूप परत आले याचा सर्व नागरिक आणि दरबारातील अधिकाऱ्यांना विलक्षण आनंद झालेला होता अपवाद फक्त कौरव आणि शकुनीमामा यांचा होता. वारणावतातील घटनेमुळे दुर्योधनाचे कारस्थान जगासमोर आलेले होते. सर्वांची सहानुभूती पांडवांच्या बाजूलाच होती. अर्धेच नाही तर संपूर्ण राज्य पांडवांना द्यावे, युधिष्ठिराला उत्तराधिकारी घोषित करावे असेही काहीजण म्हणू लागले होते. दुराचारी, कारस्थानी दुर्योधन राजा म्हणून सर्वांना नकोसा होता. परंतु नियतीची काही निराळीच योजना होती ...

पांडव सुखरूप परत आले म्हणून आनंदोत्सव साजरा केला जात होता. युधिष्ठिराला द्यूतक्रीडेचे आमंत्रण देण्यात आले. द्युतामध्ये जो पराजित होईल त्याने सहपरिवार बारा वर्षांसाठी वनवासात पत्करावा अशी द्युताची अटच होती. कपटद्यूत खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शकुनीमामाने त्या खेळामध्ये युधिष्ठिराला पराभूत केले.दुर्योधनाचा आनंद गगनात मावत नव्हता. इतका मोठा कालावधी वनवासात राहून आल्यावर पांडवांचे बळ कितीसे राहणार होते? कदाचित आज त्यांच्या बाजूने मत देणाऱ्यांचे बारा वर्षांनंतर मनपरिवर्तन होण्याचीही शक्यता होती. कदाचित इतक्या मोठ्या कालावधींनंतर हस्तिनापुराच्या नागरिकांना पांडवांचे विस्मरण सुद्धा होऊ शकले असते. सर्वच दृष्टीने पांडवांचे वनवासात जाणे दुर्योधनासाठी फायद्याचे होते.

द्रौपदीसह पांडव वनवासाला जाण्यासाठी निघाले. आजवर राजवैभवामध्ये राहिलेली द्रौपदी आता वनवासी आयुष्य जगणार होती. पांडवांनी द्वैतवनामध्ये वास्तव्य करण्याचे निश्चित केले. एका विस्तीर्ण जलाशयाशेजारी त्यांनी त्यांचा वनवासी वसवला होता. द्रौपदीसह पांडव तिथे सुखी आणि शांततापूर्ण वातावरणामध्ये कालक्रमणा करीत होते. वनवासात देखील त्यांची दिनचर्या नियमित होती. ग्रंथांचे अध्ययन, युद्धशास्त्राचा सराव आणि जनसंपर्क यात खंड नव्हता. त्यांच्या आश्रमामध्ये साधू संन्यासी येत, प्रवास करणारे वाटसरू येत आणि कधी कधी आजूबाजूच्या प्रदेशातील प्रमुख, राज्यकर्ते सुद्धा येत. पांडव सर्वांचे स्वागत आणि आदरातिथ्य करीत असत. त्यांच्या आश्रमामध्ये वास्तव्य करून गेलेला प्रत्येकजण पांडवांचे गुणगानच करीत असे.

बारा वर्षांच्या काळात अनेक प्रसंग, घटना घडलेल्या असणार .. पण त्यातील काही थोड्याच कथारूपाने नमूद केल्या गेल्या आहेत. त्यातील एक महत्त्वाची घटना म्हणजे दुर्योधनाची घोषयात्रा.

दुर्योधन अतिशय दुराभिमानी होता आणि तितकाच कारस्थानी देखील होता. पांडवांना बारा वर्षाकरता वनवासात पाठवले तरी त्याला स्वस्थता नव्हती. आजपर्यंत नेहमीच पांडव कौरवांपेक्षा श्रेष्ठ आहेत असे सिद्ध झालेले होते. तो अपमान दुर्योधनाला सलत होता. पांडव जिथे जातील तिथे तो त्याचे मित्र, बंधू, सोयरे इत्यादींना पाठवून त्यांच्यासमोर श्रीमंतीचे, राजविलासांचे प्रदर्शन मांडत असे. वनवासी पांडवांचे आयुष्य अधिक दुर्धर करण्याची योजना त्याने आखली. दुर्योधन त्याच्या सर्व लवाजम्यासह द्वैतवनामध्ये दाखल झाला होता. त्याच्या बरोबर त्याचा परिवार, दासदासी होते. ऐश्वर्याचे प्रदर्शन करीत तो पांडवांच्या निवासस्थाजवळ असलेल्या सरोवरासमीप पोहचला. त्याने तिथे मुक्काम केला होता. सुंदर दासी, कलाकार त्याच्या सोबत होते, विलासची सर्व साधने होती. पांडवांसमोर वैभवाचे प्रदर्शन करणे हाच त्याचा हेतू होता. पांडवांना त्यांच्या निष्कांचन आयुष्याबद्दल दुःख व्हावे म्हणून तो त्यांच्यासमोर भोगविलासामध्ये रममाण झाला होता. दुर्योधन, कर्ण, शकुनी आणि इतर कौरव, त्यांच्या स्त्रिया , नोकर चाकर असा लवाजमा होता. मेणे, पालख्या, अश्व, गज इत्यादींच्या वावराने त्या परिसरातील शांतता भंग पावत होती. दास, दासी सर्वांची व्यवस्था करण्यात गुंतलेले होते. सुग्रास अन्नाचा सुवास दरवळत होता.

अर्थात दुर्योधनाने स्वतःवरून जगाची परीक्षा करण्याची चूक केली होती. पांडवांना ऐश्वर्याचा मोह नव्हता, सुखोपभोगाची आसक्ती नव्हती. त्यांना दुर्योधनाचे मत्सर वाटण्याचे काहीच कारण नव्हते, ईर्ष्या आणि असूया यांना त्यांच्या आयुष्यात जणू स्थान नव्हतेच.

दुर्योधनाने जेथे मुक्काम केलेला होता तो परिसर नैसर्गिक वनराजीने नटलेला होता. तिथेच एक विस्तीर्ण सरोवर होते. सरोवरामध्ये कमळे फुललेली असत, डौलदार हंस तिथे विहार करीत असत. अनेक वन्य पशुपक्षी सरोवराकाठी येत असत. त्याच सरोवरामध्ये जलक्रीडा करण्याकरता चित्रसेन गंधर्व येत असे. त्यांच्या समवेत अप्सरा आणि यक्ष असत. काही काळाकरता तिथे येऊन सरोवरामध्ये जलक्रीडा करणे हा त्यांचा नित्यक्रमच होता. एके दिवशी यक्ष, गंधर्व आणि अप्सरा तिथे आले, परंतु आज त्यांच्या सरोवराकाठी कुणी परके लोक आलेले त्यांनी पाहिले. गंधर्व आणि अप्सरांनी त्यांच्याकडे दुर्लक्षच केले, पण दुर्योधनाला ते बिलकुल आवडले नाही.

-- महाभारत कथेमध्ये गंधर्व, अप्सरा, यक्ष, देव, देवता, राक्षस यांचे उल्लेख नेहमी येतात. तसेच ते स्वर्गलोकी, पृथ्वीतलावर, पाताळात आणि समुद्राच्या तळाशी सुद्धा जात येत होते अशा कथा आहेत. हे लोक नक्की कोण असावेत? त्या कथांमध्ये स्वर्ग, पाताळ आणि समुद्रतळाची वर्णने आहेत. वर्तमान काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने माणूस आकाशमार्गे प्रवास करू शकतो, अंतराळात जाऊ शकतो आणि समुद्रतळाशी जाऊ शकतो. त्यावेळी टिपलेली तिथली दृश्ये कथेमधील वर्णनांशी पुष्कळ मिळतीजुळती वाटतात हे आश्चर्य आहे. असे असण्याची दोन कारणे असू शकतात --

(१) महाभारताच्या कथालेखकाची अथवा त्या कथा सांगणाऱ्या कथनकाराची कल्पनाशक्ती अद्भुत असावी.

किंवा

(२) आकाशगामी विहार करणे, समुद्रतळाशी जाणे इत्यादीसाठी आवश्य असलेले तंत्रज्ञान उपलब्ध असावे.

यक्ष, अप्सरा आपापसात हास्यविनोद करीत जलक्रीडा करण्यात मग्नं होते. कौरवांच्या अस्तित्वाची त्यांनी जराही दखल घेतलेली नव्हती. दुर्योधनाला ते फारच अपमानास्पद वाटले. त्याचा स्वभाव मूलतः अहंकारी होता, आता तर त्याचा उन्माद शिगेला पोहोचला होता. दुर्योधनाने दूताकरवी यक्ष राजाला निरोप पाठविला की त्यांनी तिथून निघून जावे. शांतताप्रिय यक्षांना हा अपमान सहन झाला नाही आणि त्यांनी दुर्योधनाला युद्धाचे आव्हान दिले. दुर्योधनाने ते स्वीकारले पण त्याचा दारुण पराभव झाला होता. कौरव राजपुत्र, कर्ण, शकुनी या साऱ्यांना चित्रसेन गंधर्वाने बंदी बनविले होते.

दुर्योधनाच्या सेवकांपैकी काहीजण लपतछपत पांडवांच्या आश्रमात पोहोचले. त्यांनी युधिष्ठिराला सर्व हकीकत कथन करून मदतीची याचना केली. युधिष्ठिराने भीम आणि अर्जुनाला मदतीसाठी जाण्यास सांगितले. ते दोघे म्हणाले ज्या दुर्योधनाने इतका छळ केला, जीवघेणी कारस्थाने केली तो अनायास शत्रूहाती मरतो आहे तर मरू दे की.

युधिष्ठिराला असे बोलणे आवडले नाही. तो म्हणाला, कौरव आपले बंधू आहेत, त्यांच्याशी आपला वाद, भांडण असले तरी ते जगासमोर दाखविण्याचे कारण नाही. आपसात लढताना ते शंभर आणि आपण पाच असलो तरी परकीयांचे संकट आले तर त्यांच्यासमोर आपण एकशेपाच आहोत.

परस्परविरोधे तु वयं पंचश्चते शतम् |

परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पंचाधिकं शतम् ||

युधिष्ठिराने आज्ञा केली आणि नाईलाजाने अर्जुन आणि भीम कौरवांच्या मदतीसाठी गेले, यक्षांबरोबर युद्ध करून त्यांना पराभूत केले, कौरव आणि इतरांची मुक्तता केली. पांडवांना डिवचण्यासाठी आलेला दुर्योधन खजील झाला होता, अपमानित होऊन स्वगृही परतला होता.

आता पांडवांनीही त्यांचे वसतिस्थान सोडून स्थलांतर करण्याचे योजले. दुर्योधनाकडून वारंवार होत असलेला उपद्रव टाळण्याकरता तसे करणे जरुरी होते.

***