गीताई विषयी

गीताई आणि पू. विनोबा भावे यांच्या गीताई लेखनाविषयी महत्त्वाची माहिती देणारा हा लेख महाराष्ट्र टाईम्स मध्ये वाचायला मिळाला. मनोगतच्या गीताई च्या पुस्तकाच्या आरंभी ही माहिती शोभून दिसेल असे वाटल्याने तो येथे उतरवून ठेवला आहे.


मूळ लेख येथे आहे:
गीताई माउली माझी
(म. टा. ७ ऑक्टो. २००४ दु. २:२४:४२)


गीताई माउली माझी तिचा मी बाळ नेणता।
पडतां रडतां घेई उचलूनि कडेवरी॥


ज्येष्ठ गांधीवादी नेते आणि भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांनी केलेले महर्षी व्यासांच्या श्रीमद्भगवदगीतेचे समश्लोकी मराठी भाषांतर 'गीताई' हे त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचे कार्य.


'गीताई'च्या लेखनास प्रारंभ होण्याच्या घटनेचा अमृत महोत्सव आज सुरू होत आहे. मराठी वाङ्मयाच्या इतिहासातील ही महत्त्वाची घटना असल्याने आज तिचे स्मरण करणे आवश्यक ठरते. गीतेवर अनेक भाष्ये लिहिली गेली. मराठीत सातशे वर्षांपूवीर् संत ज्ञानेवरांनी 'ज्ञानेवरी' लिहून संस्कृतमधील गीतेचे निरूपण सामान्य जनांसाठी खुले करून दिले.


लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात 'गीतारहस्य' लिहिले. ही गीतेवरील बौद्धिक चर्चा होती. विनोबांना गीता जशीच्या तशी सामान्यांर्पंत पोहोचवायची होती. म्हणून 'गीताई' जन्माला आली. ज्ञान समाजाच्या केवळ एका घटकापुरते सीमित न राहता, ते सर्वांपर्यंत पोहोचावे, हे महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे सूत्र विनोबांनी आचरणात आणले, म्हणून तेसुद्धा अर्वाचीन संतच ठरतात.


वामन पंडितांनी गीतेचे समश्लोकी भाषांतर केले होते. पण ते पंडित परंपरेचे असल्याने त्याची शब्दरचना अर्थातच कठीण होती. विनोबांच्या आईला गीता मराठीत वाचायची होती, म्हणून विनोबांनी तिला वामन पंडितांचे भाषांतर आणून दिले. ते समजण्यास अवघड गेल्याने, तिने विनोबांना गीतेचे भाषांतर करण्यास सांगितले. आईच्या प्रेरणेने हे समश्लोकी भाषांतर झाल्याने मराठीतील गीता 'गीताई' बनली.


आपल्या आईवरचे निस्सीम प्रेम आणि नितांत श्रद्धा यांचे वारंवार दर्शन 'गीताई'मध्ये दिसत राहते. 'पडतां रडतां घेई उचलुनि कडेवरी' असे म्हणताना विनोबांनी खरेच मुलाला समजेल आणि ज्ञानाच्या कडेवर उचलून घेईल, अशा भाषेत ही पद्यरचना केली. गीता हे काव्य नसून तत्त्वाज्ञान आहे. ते सोपे करून सांगणे, ही अवघड बाब. गीतेच्याच श्लोकांबरहुकूम मराठीत रचना करून छंद आणि वृत्तांचेही भान राखायचे आणि अर्थहानी होऊ द्यायची नाही, हे शिवधनुष्य विनोबांनी पेलले. आपल्या पांडित्याचे दर्शन न घडवता सोप्यात सोपे शब्दप्रयोग योजण्यासाठी विनोबांनी अपार श्रम घेतले.


चार महिन्यांत 'गीताई' लिहून झाल्यावरही विनोबांना चैन पडत नव्हती. म्हणून त्यांनी आश्रमातील लहान मुलींना ती शिकवली. जिथे त्यांना अडचण आली, तिथे बदल केले. 'हे देवाचे काम' म्हणून विनोबा 'गीताई'कडे बघत असल्याने त्यासाठी सर्व कष्ट घेण्याची त्यांची तयारी होती. आपल्या वाङ्मयीन कामावर अशी निष्ठा ठेवणारा लेखक विरळाच. ज्यांनी मूळ गीता आणि 'गीताई' वाचली, त्यांना विनोबांच्या शब्दप्रयोगांचा नेमकेपणा जाणवतो. पाचवा अध्याय गीतेची किल्ली आहे, असे ते मानत. चौथ्या अध्यायातील १८वा श्लोक त्यांना भावला. त्याची छाया विनोबांच्या गीताप्रवचनावर सतत उमटलेली दिसते. 'कर्मण्यकर्म य पश्येदकर्मणि च कर्म य। स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्त कृत्स्नकर्मकृत्॥' हा तो अर्थगर्भ श्लोक. हे कर्माचे गहन तत्त्वाआन मराठीत उतरवताना विनोबा म्हणतात, 'कमीर् अकर्म जो पाहे अकमीर् कर्म जो तसें। तो बुद्धिमंत लोकांत तो योगी कृतकृत्य तो॥'


'गीताई' १९३२ साली प्रकाशित झाली. त्या वेळी गांधीजींच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल ते धुळ्याच्या जेलमध्ये बंदिवान होते. एका बाजूला तत्त्वज्ञानाचा गाढा अभ्यास चालू असताना दुसरीकडे त्यांचे राजकीय कार्यही चालू होतेच. स्वातंत्र्यचळवळ आणि त्यामुळे होणारा बंदिवास यामुळे सामान्यांत मिसळण्याची संधी मिळाल्याबद्दल विनोबा आनंदीच असायचे. १९३२ सालापासून आतापर्यंत 'गीताई'च्या लाखो प्रती घरोघर विकल्या गेल्या. २००३पर्यंत 'गीताई'च्या ३६ लाख २५ हजार प्रती छापल्या गेल्याची नोंद आहे. अर्वाचीन काळात एखाद्या पद्य पुस्तकाचा इतक्या मोठ्या संख्येने खप होण्याची उदाहरणे क्वचितच सापडतील.


महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांमध्ये संस्कृतमधील गीतेचे पठन व अध्ययन ही कठीण बाब होती. 'गीताई'ने ही ज्ञानाची कवाडे सर्वांसाठी उघडली. गीतेच्या पंधराव्या अध्यायात 'पुरुषोत्तमयोग' विशद केलेला आहे. मानवी शरीराचे वर्णन करताना व्यासांनी शरीर उलट्या वृक्षाप्रमाणे असल्याचे म्हटले. 'ऊर्ध्वमूलमधशाखमवत्थं प्राहुरव्ययम्। छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् ॥' विनोबांनी हे सारे सोप्या मराठीत सांगितले. 'खाली शाखा वरी मूळ नित्य अवत्थ बोलिला। ज्याच्या पानांमधें वेद जाणे तो वेद जाणतो॥' 'गीताई' मराठी वाङ्मयाचा मैलाचा दगड बनला. आपल्या 'प्रेमपंथ अहिंसेचा'मध्ये विशद केलेली विनोबांची आठवण अधिक मनोवेधक आहे. धुळ्याच्या जेलमध्ये विनोबांचे प्रसिद्ध 'गीता प्रवचन' झाले आणि त्याची भारतातील अनेक भाषांत रूपांतरे झाली. या जेलमधून विनोबांची सुटका झाली, तेव्हा सर्व कैद्यांनी जेलरला विनंती केली की, आमच्या श्रमाने मिळवलेल्या पैशांतून दोन आणे कापा आणि आम्हाला 'गीताई' द्या. या पुस्तकाची किंमत तर एक आणा होती. पण कैदी म्हणाले, 'एक आणा 'गीताई'चा आणि एक आणा विनोबांच्या दक्षिणेचा.' हे भाग्य किती लेखकांना लाभते?