शब्द शब्द जपून ठेव

ठाणे कट्ट्याच्या निमित्ताने नित्याच्या वापरात येणाऱ्या इंग्रजी शब्दाना पर्यायी ठरतील असे मराठी शब्द शोधण्याचा प्रयत्न उपस्थित मनोगतींच्या चर्चेद्वारे आयोजीला होता. हे शब्द सहज बोलले जातील, रुजतील असे असावेत, पर्यायी असले तरी शब्दशः भाषांतरापेक्षा आशयावर आधारलेले असावेत, क्लिष्ट वा संभ्रम निर्माण करणारे नसावेत असे सर्वानुमते ठरले. मुळात ज्या वस्तू वा कृति आपल्या नाहीत त्याना उगाच अट्टाहासाने मराठी शब्द न शोधता रुढ इंग्रजी शब्द वापरण्यास हरकत नसावी असेही ठरले (उदाहरणार्थः केक, बर्गर, पिझा, वेफ़र्स, सोफ़सेट वगरे)


अशा प्रकारे संमत झालेले शब्द इथे द्यावेत व सर्व मनोगतींना हे शब्द वापरात आणण्याची विनंती करावी असे ठरले. त्याचबरोबर या शब्दांना कुणी मनोगती अधिक योग्य व वरील निकषात बसणारे शब्द देउ करतील तर त्याचे स्वागत करून त्यावर चर्चा करून तेही संमत व्हावेत असेही ठरले.


सर्वप्रथम असे प्रस्तावित केले गेले की दुरध्वनीला प्रतिसाद देताना नकळत आपण 'हॅलो' असे म्हणतो त्याऐवजी काय म्हणता येइल? विशेषतः भ्रमण्ध्वनीसंचावर कोण साद देतो आहे हे समजण्याची सोय असल्याने जर साद देणारही मराठी असेल तर उगाच हॅलो कशाला? सर्वानुमते नमस्कार! असे म्हणावे असे ठरले. (मात्र नमस्कार हा शब्द स्नेहाभावाने, प्रसन्नपणे उच्चारावा म्हणजे पोलीसठाण्याचा वा सरकारी कचेरीचा भास होणार नाही असेही ठरले). तसेच आपल्या लकबीप्रमाणे वा साद देणाऱ्याशी असलेल्या सम्बंधानुसार बोला, ऐकवा, किटवा वगरे मजेशीर मायनेही संमत झाले अर्थात 'हॅलो' नको.


त्याचप्रमाणे संभाषण संपविताना बोलु/ भेटु पुन्हा अथवा धन्यवाद! असे म्हणावे असेही ठरले.


काही शब्द जे संमत झाले ते असे


मोबाईल - भ्रमणध्वनी


एस एम एस - संदेश


स्टेशनरी - लेखनसामुग्री


रिमोट कंट्रोल - दूरनियंत्रक (नियंत्रक)


पंच - छिद्रक


स्टेपलर - टाचक


ट्रेलर - जोडगाडी


क्लब - मंडळ


वायपर - निस्सारक


की चेन - चावीबंध


वेटर - वाढपी


कॅमेरा - प्रकाशचित्रक (चित्रक)


शोकेस - प्रदर्शिका


कॉन्टॅक्ट लेन्स - नेत्रिका


शॉवर बाथ - स्नानवर्षाव


क्रेडिट कार्ड - धनपत्र


डेबिट कार्ड - ऋणपत्र


पासपोर्ट - पारपत्र


विसा - देशांतर परवाना


रिफ़ील - भरणी


वन्स मोअर - पुनराग्रह


ए टी एम - सुलभ धनालय ( जोडुन दोन तीन दिवस सुट्ट्या आल्या असता ए टी एम बाहेर ज्या रांगा लागतात ते पाहून हा शब्द सुचला व फ़ारच चपखल वाटला)


वेळेअभावी चर्चेला येउ न शकलेले शब्द - (आपण आता शोधुया)


बोर्डिंग कार्ड - माझा प्रस्ताव - उड्डाणपत्र


मल्टिप्लेक्स - माझा प्रस्ताव - बहुपटलगृह


अपडेट, गॅस( स्वयंपाकाचा), टेक अवे, गिअर, गीफ़्ट पॅक, पॅकेज टूर, मिनरल वॉटर, मॉल, टॉक टाइम, ट्रॅक्टर, शॅम्पू, स्केच पेन, सॉफ़्ट्वेअर, हार्डवेअर, हँगर (कपडे टांगाचा), बॅनर, जॅक ऑफ ऑल, कॅफ़े, वीक पॉइंट, वेब डिझायनर.