भोवताली कडे ताशीव होते...
दु:ख माझे कसे रेखीव होते!
कंठतो दिवस मी व्यापांत अपुल्या
सांज होता तुझी जाणीव होते...*
भेट घडता तुझी कळले मलाही
तर्क माझे कसे ऐकीव होते!
कारणे सर्व वर-वरची तुझी ती
मात्र नाकारणे ठाशीव होते!
देव, माणूस - दोन्ही पाहिले मी
फक्त पुतळेच ते निर्जीव होते
रागरूपी जिथे रस्ते निराळे...
ते सुरांचे शहर आखीव होते!
- कुमार जावडेकर
* क्र. २ चा शेर ग़ुलाम अली- आशा भोसले यांनी गायलेल्या 'फिर सावन रुत की पवन चली' (मिराज़ ए ग़ज़ल) मधल्या -
दिनभर तो मैं दुनिया के धंदों में खोया रहा
जब दीवारोंसे धूप ढली तुम याद आए'
या शेरावर आधारित. (मूळ शायर माहिती नाही, तसंच गझल ऐकल्याला बरेच दिवस झाले, त्यामुळे शेरही अंदाजानं लिहिला आहे - चू. भू. द्या. घ्या.).