सांस्कृतिक राष्ट्रवादाचा धोका

म.टा. मधील खालील लेख वाचनीय वाटला- जरी त्याचे शिर्षक त्यातील विषयाला धरून वाटले नाही तरी...


____________________


सांस्कृतिक राष्ट्रवादाचा धोका -


गोविन्द तळवळकर


मुंबईत मराठी लोकांचा प्रभाव कमी असणे आणि राज्यात मराठी भाषेची चिंताजनक अवस्था असणे या एक प्रकारे वेगळ्या गोष्टी आहेत; तर दुसऱ्या अर्थाने त्या संबंधित आहेत. मुंबईत कित्येक वर्षांपूवीर् विद्वान मराठी प्राध्यापक व लेखक होते; नामवंत डॉक्टर, वकीलही होते. त्यांचा त्यांच्या क्षेत्रात प्रभाव होता. तथापि, मुंबई पूवीर्पासून देशाची आथिर्क राजधानी असताना या राजधानीतील आथिर्क नाड्या गुजराती, पारशी अशांच्या हाती होत्या. युद्धानंतर पंजाबी, सिंधी इत्यादी आले आणि तेही आथिर्क क्षेत्रात पाय रोवून उभे राहिले. आथिर्क नाड्या अन्य भाषिकांकडे असताना मराठी लोकांचा मुंबईवर किती प्रभाव पडणार?


उलट असेही दिसेल की, मराठी लोकांत उद्योग, व्यापार या क्षेत्रात कर्तबगारी गाजवण्याची धमक नाही, असे नव्हे. आपल्या लोकांनी सहकारी साखर कारखाने, बँका इत्यादी चालवल्या. त्यातले काही उपक्रम राजकारण व गटबाजी यांनी डबघाईला आले ही गोष्ट वेगळी. तसेच शंतनुरावांच्या नातवांनी 'किलोर्स्कर कंपनी' पुन्हा जोमदार बनवली आहे तर बाबा कल्याणी यांच्या कारखान्याचा व्यवहार परदेशांतही वाढला आहे. महाराष्ट्रातील काही दाक्ष-बागायतदार इंग्लंड व इतर देशांत माल पाठवतात आणि आपल्याकडील फुलेही हॉलंडच्या बाजारात खपतात. तेव्हा व्यापार-उद्योग यापासून आपण अगदीच दूर राहिलेलो नाही. पण जे महाराष्ट्राच्या काही भागांत होऊ शकते, ते मुंबईत साध्य झाले नाही.


असे असतानाही मुंबईच्या आथिर्क व सामाजिक जीवनावर प्रभाव पाडण्याचे आणखी एक साधन होते. ते म्हणजे व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात प्रवेश. आजकालची कारखानदारी ही मालक व त्याचे कुटुंबीय यांच्याच पूर्ण ताब्यात नसते. तीत व्यवस्थापकांचा वाटा मोठा असतो. पण हे साधनही हस्तगत करण्याचे पद्धतशीर प्रयत्न आपण केले नाहीत.


शिवसेनेचा जन्म मराठी लोक व मराठी भाषा यांना मानाचे व मोक्याचे स्थान देण्याची घोषणा करून झाला. पण जगापुढे आली ती कोणत्या तरी भाषिक गटाच्या विरुद्धची झुंडशाही. मराठी लोक व भाषा यांना प्रतिष्ठेचे स्थान मुंबईत मिळवून देण्याचा मार्ग सुधीर जोशी यांनी सेनेतफेर्च चालवलेल्या विधायक कार्यामुळे साध्य होण्याचा संभव होता. व्यवस्थापक, आय. ए. एस. इत्यादी तयार करण्यासाठी व बँकांत महत्त्वाची पदे मिळवण्यासाठी जोशी यांनी खास शिक्षणाची योजना हाती घेतली होती. तिला सेनेनेच प्राधान्य दिले नाही. उलट महापालिका, विधिमंडळ व नंतर लोकसभा यांच्या निवडणुकांचे आकर्षण वाढले.


निवडणुकांच्या राजकारणात झगमगाट असतो. प्रसिद्धीचा झोत राहतो आणि सत्ता हाती आली तर बरेच काही हाती लागते. पुढील काळात महाराष्ट्र व मराठी बाजूला ठेवून हिंदुत्वाचा घोष सुरू झाला. मग राज्यसभेवर स्वपक्षीय मराठी बाजूला करून परभाषी उमेदवार धाडण्याचे धोरण अवलंबताना संकोच वाटला नाही. या निवडणुकीच्या राजकारणाला सुधीर जोशी यांच्यापेक्षा मनोहर जोशी जवळचे होते. पण आता काय झाले? सेना दुभंगली आणि मनोहर जोशी व राज ठाकरे संयुक्तपणे चारशे कोेटींचे कंत्राट घेऊन बांधकामाच्या क्षेत्रात उतरले.


इंग्रजीचा वरचष्मा असल्याबद्दल खंत व्यक्त होते. एका प्रभावी भाषेशी संपर्क आल्यावर दुसरीला दुय्यम स्थान प्राप्त होत असते. झारच्या काळात रशियातील उमराव व धनिक वर्गात फ्रेंच व त्या खालोखाल जर्मन भाषेचा वापर हा प्रतिष्ठेचा मानत. पण त्याच काळात पुष्किन, गोगोल व नंतर टॉलस्टॉय, डोस्टोव्हस्की, चेकॉव्ह, पास्तरनाक, आखमातोवा असे कवी, कथाकार, नाटककार व कादंबरीकारही झाले. रशियन समाज त्यांच्या कलाकृतींवर जीव टाकत होता. स्टालिनच्या काळात डोस्टोव्हस्कीच्या काही कादंबऱ्यांवर बंदी होती. पण नंतर जेव्हा त्या प्रसिद्ध झाल्या तेव्हा लाखांनी खपल्या. पुष्किन, आखमातोवा, पास्तरनाक इत्यादींच्या कवितांचे वाचन हजारोंच्या उपस्थितीत आजही होते. या स्थितीत फ्रेंच भाषेमुळे रशियन भाषा खुंटली नाही.


बंगाली लोकांचे भाषाप्रेम प्रसिद्धच आहे. इतके की, पूर्व पाकिस्तानच्या लोकांनी बंगाली दडपल्याच्या निषेधार्थ उठाव करून पाकिस्तानपासून फारकत घेतली. या प्रकारचे भाषाप्रेम महाराष्ट्रात पूवीर्पासून नाही.


हेही लक्षात ठेवले पाहिजे की, ललित साहित्यामुळेच भाषा समृद्ध होते असे मानून चालणार नाही. जगभर ललित साहित्याला लोकाश्ाय मोठा असतो, हे खरे आहे. तथापि भाषा जेव्हा ज्ञानभाषा होते, तेव्हाच ती खऱ्या अर्थाने समृद्ध होते. इंग्रजी तशी होती व आहे. भारतातील हिंदीसह कोणतीही भाषा ज्ञानाची झालेली नाही. तशी होण्यासाठी अनेकविध शास्त्रांवर मान्यता मिळवणारी ग्रंथनिमिर्ती व्हायला लागते. इंग्रजीचे सोडाच, पण फ्रेंच, जर्मन, रशियन या भाषाही ज्ञानभाषा होत्या व आहेत.


मराठीत विविध विषयांवरील लेखनासाठी पारिभाषिक शब्द एक काळ तयार होत असत. न्यायमूतीर् रानडे यांनी बहुतेक लिखाण इंग्रजीत केले, पण त्याचबरोबर त्यांनी व्यापारविषयक दोन भाषणे मराठीत दिली. असेच बहुतेक लिखाण इंग्रजीत करणारे दुसरे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पण त्यांनी अस्सल व प्रभावी मराठीतही लिखाण केले. प्राच्यविद्याविषयक ग्रंथ महामहोपाध्याय मिराशींनी सुबोध मराठीत लिहिले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींनी 'वैदिक संस्कृती,' 'हिंदू धर्मसमीक्षा' इत्यादी ग्रंथांत इंग्रजीचा संपर्क येऊ दिला नाही. लोकमान्यांच्या 'गीतारहस्या'त इंग्रजीचा आढळ होणार नाही. त्यांनी वृत्तपत्रीय लिखाणात नोकरशाहीसारखे शब्द आणले आणि 'रेट ऑफ एक्स्चेंज'ला 'हुंडणावळीचा दर' असा पर्याय दिला. डॉ. पुणतांबेकर राज्यशास्त्रावर मराठीत विचारप्रवर्तक लिहीत. धनंजयराव गाडगीळ व वि. म. दांडेकर यांची आथिर्क विषयावरील मराठी भाषणे व लिखाण निखळ मराठी होते. रा. श्ाी. जोग, क्षीरसागर यांचे साहित्यसमीक्षात्मक लिखाण शुद्ध मराठीत होते. माटे शाळेत इंग्रजी शिकवत; पण 'विज्ञानबोधाची प्रस्तावना' हा त्यांचा ग्रंथ इंग्रजीमिश्ाति नाही. विनोबांना दहा-बारा भाषा येत होत्या. पण त्यांनी सरमिसळ होऊ दिली नाही. त्यांच्या 'मधुकर'ची भाषा लालित्यपूर्ण आहे, तर 'स्थितप्रज्ञदर्शन'चे लेखन एखाद्या गणितज्ञाने प्रमेय उलगडून दाखवावे तसे आहे. गंगाधर गाडगीळ यांनी मढेर्करांची कविता, नवकथा अशा विषयांवर स्वच्छ मराठीत लिहिले व आथिर्क विषयांवरील लेखनही याच रीतीने केले. गंभीर विषयांवर लिहिणाऱ्यांत गं. बा. सरदार यांचा उल्लेख करायला हवा. सुबोध मराठी ते लिहीत. धुरंधर यांनी क्रिकेटच्या खेळाची मराठी परिभाषा रूढ केली होती.


मराठी लोकांत एक प्रकारची न्यूनगंडाची भावना आहे. त्यामुळेही इंग्रजी वापरून आपण वरच्या वर्गात गेल्याचे समाधान मिळते की काय, हे कळत नाही. यांपैकी अनेकांची धड मराठी येत नाही व इंग्रजीही नाही अशी अवस्था असते.


याचबरोबर मराठीचा आग्रह धरताना इंग्रजी व इतर कोणत्याही भाषेचा व अन्य भाषिकांचा द्वेष करण्याचे कारण नाही. भाषाभिमान हे वळण घेण्याचा धोका असतो. विशेषत: मराठीसाठी आंदोलन इत्यादीचा अवलंब झाला तर सांस्कृतिक राष्ट्रवाद वाढीला लागू शकेल. तो हुकुमशाही प्रवृत्ती प्रबळ करील. याविरुद्ध खबरदारी घ्यायला हवी. हे दीर्घकाळचे काम आहे. झटपट करण्याचे नाही.


- गोविंद तळवलकर