नवीन वर्षाचे स्वागत

नवीन वर्षाला सजवाया जुनाच अंगरखा पाजामा
स्वप्न अधाशी आप्पलपोटी अतृप्तीचा जाहिरनामा


इंचभराने फुगली नाही युगायुगांची खोगिरभरती
सूर्य कारकुन रोज सारखी सही ठोकतो मस्टर वरती


गाडली तरी पुन्हा उगवती भुते कालची रोजनिशीची
काळ पुन्हा डोकावत राही मुळे पांढरी डाय मिशीची


ईश्वर साक्षी नवीन वर्षी करीन यंव त्यंव नव्या दमाने
संकल्पांच्या पुण्यतिथीला संकल्पांचे स्मरण नव्याने


असेच येती नवे बुडबुडे कळकट साबण पाण्या मधुनी
चमत्कार हा आम्ही बघतो आश्चर्याने टाळ्या पिटुनी


                         डॉ.प्रमोद बेजकर