नेहमीच दिसणारी
मुखवटेच दाखविणारी
यश मिरवणारी
आनंदी, हसणारी....
भावना लपवित, मनातून रडणारी
समाजात उजळ माथी
मनी जनावरागत कृती
परंपरा जपणारी
रूढींना जागणारी....
परसदारी नंदादीप, बालविधवेला नागवणारी
ओठी सदा रामनाम
गुरू माऊलीचे ध्यान
मनी वसे फक्त मी
माझ्यापलीकडे काहीच नाही
माझे घर, माझा संसार
सारे माझ्याकरिताच.....
चिमणीच्या घरट्याचा होत असे मला भार
मी जीव लावला, मैञीही केली
अहो नात्यांची मला सदैव महती
माञ,
सोयिस्कर मी पाठ फिरवली
जेव्हां त्यांच्या डोळ्यांत वेदना तरळली
जाणून आहे मी,
हे सारे व्यर्थ पोकळ आभास
माझ्यातला मी आहे सैतानाचा निवास
तरिहि....
मी म्हणतो मी नाती राखलीत,
बंध जोडलेत आणि मनेही जपलीत....