घायाळ मनानी आणि काटे भरल्या पायांनी
बाळे तू मजजवळ आलीस आशेनी
ममतेच्या हातांनी तुझे काटे काढीन
तुझ्या मनावर अश्वस्त फुंकर मारीन
तुझे सारे कष्ट दूर करीन
असे मनोमन तुला वाटले
तसेच मलाही वाटले ग
पण बाळे,
अनुभवांनी पुरेपुर पोळले मन आणि तन
वठलेले झाड काय कुणाला सावली देणारं
फळाफुलांची आशा काय बाळें
आहेत ते काटे तसेच ठेवावे
कारण,
सोसायाच्या जंगलात काट्याकुट्यांच्या रानांत
परत तेच तेच काटे नशिबी येणार
जुने काटे, जुन्या जखमा
त्या ओळखीच्या तरी असतात
नवे काटे, नव्या जखमा
त्या आता पेलणाऱ्या नसतात
तेव्हा आहे ते तसेच राहू द्यावे
नव्या जंगलाचा ध्यास नको बाळे
इथे तिथे सगळीकडे
घास घ्यावया टपलेले ग बागुलबुवे
म्हणून म्हणते बाळे मी काटे काढत नाही
माझ्या काटे भरल्या पायांना आता
उभे राहण्याचेही ञाण नाही
तुला आधार देण्याचा किंवा
मला आधार घेण्याचा
एकच मार्ग खुला आहे
तुलाही ...मलाही,
?