इटली - भाग १ (मिलानो)
आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस युरोपमधे कुठे तरी साजरा करायचा असं आम्ही आधीच ठरवलं होतं. म्हणजे या प्रोजेक्टची कन्सेप्ट फ़ेज आम्ही आधीच पूर्ण केली होती. पण नेहमीप्रमाणे रिसर्च मध्ये इतका वेळ वाया घालवला की एक्झिक्युशन करायची वेळ आली तरी आमचे बेसिक प्लॅनिंगही झाले नव्हते! हो-ना करता करता, अनेक वेळा प्लॅन बदलवत (कधी कधी तर दौराच रद्द करायची भाषा असायची) अख्रेर ८ ऑक्टोबरला आम्ही विमानात बसलो. मिलान (मिलानो)ला एक रात्र थांबून मग फ़्लोरेन्स (फ़िरेंजे)ला जायचे, तिथे ३ रात्री मुक्काम करून सिएनाला जायचे, तिथून कार भाड्याने घेऊन टस्कनी आणि अम्ब्रियाच्या कंट्रीसाईड्मधे भटकायचे असा साधारण कार्यक्रम होता. सिएना सोडून इतर प्रत्येक ठिकाणी राहण्याची व्यवस्था (सर्व्हास होस्ट किंवा हॉटेलचे बुकिंग ) झाली असल्याबद्दल आम्हाला स्वतः:चाच अभिमान वाटत होता! हसू नका, मळलेल्या वाटेने जायचे नाही ठरवले की या सगळ्या गोष्टींना खुप वेळ लागतो. (इटलीचा व्हिसा मिळवण्यासाठी मी केवळ काही तास घालवून बेस्ट वेस्टर्नची रिझर्वेशन्स केली होती, पण ते खूपच टिपीकल झाले असते, म्हणून अर्थातच व्हिसा मिळाल्यावर ती रद्द केली. ) प्रत्येक ठिकाणी किमान एक तरी सर्व्हास होस्ट आम्हाला भेटणार आहेत, ह्याचे श्रेय माझ्या नवर्याला जाते. देशाटन करताना प्रेक्षणीय स्थळे व स्मारके यांच्या बरोबरच तिथले सामान्य जन-जीवन जवळून पाहण्याची संधी मला तितकीच महत्वाची वाटते. जगभरातल्या प्रवाशांना अशी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व्हासचे (http://www.servas.org) आभार मानवे तितके थोडेच! रॅले ते मिलान विमान प्रवास विनासायास पार पडला. सकाळी ९ वाजता मिलानच्या मालपेन्झा एअरपोर्टवर उतरलो. इथे आम्ही सर्व्हास होस्ट अलबर्टो यांच्या घरी राहणार आहोत. त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आम्ही एअरपोर्टच्या बाहेर येऊन मिलान शहराकडे जाणार्या माल्पेन्झा एक्सप्रेस या गाडीत बसलो. बोव्हिसोला गाडी बदलून इन्व्हेरिगोला जाणार्य गाडीत बसलो. साधारण अर्ध्या तासाच्या त्या प्रवासात मी खिडकीबाहेर बघत होते, आणि नवरा त्याच्या सवयीप्रमाणे सहप्रवाशांशी गप्पा करण्यात गुंतला. बाहेर झरझर पालटणार्या दृश्यांमध्ये काही छोटी घरे, काही मोठी, काही अपार्टमेंट, मध्येच एखादे शेत आणि अधून-मधून फॅक्टरीवजा इमारती. प्रत्येक इमारत वेगळी. अमेरिकेतल्या सारखा साचेबंदपणा नाही. इकडे नवरा सहप्रवाशांना त्यांच्याच प्रदेशाबद्दल माहिती सांगून त्यांना ओशाळवाणे करून सोडत होता (अशी संधी तो कधीही सोडत नाही) इन्व्हेरिगोला गाडीतून उतरत नाही तोच अलबर्टो हसतमुखाने फलाटावर आमचं स्वागत करायला आले. मग त्यांच्या कारमधे बसून त्यांच्या घरी निघालो. मिलानच्या उत्तरेला वसलेले हे हिलस्टेशनवजा टुमदार गाव त्यावेळी अगदी झोपाळू, स्वप्नमय वाटत होते. वळणावळणाच्या अरुंद रस्त्यावरून जाताना मला अमरावतीतल्या बुधवाराचीच आठवण आली. एका ठिकाणी तर रस्ता इतका अरुंद की विरुद्ध दिशेने जणार्या गाड्या समोरा-समोर आल्या, तर एका गाडीला रिव्हर्स घ्यावे लागते. रहदारी तुरळक असल्याने ते शक्यही होते. इन्व्हेरिगोचे अरुंद रस्ते बघा-->