केर काढता-काढता थांबून निताताईनी निमूला विचारलं,' काय वो ताई, मग तिकडं अमेरिकेत समदी इंग्रजीमधीच बोलत्यात व्हय'?निमू हसून म्हणाली, 'हो, सगळे इंग्रजीमध्येच बोलतात'. 'पन मग तुम्हाला पन तसंच बोलाव लागल?' निमू, 'हो'. :-) निमू अमेरिकेला जाणार हे कळलं आणि त्यांच्या छोट्याशा गावातील जुन्याशा घरात धावपळ चालू झाली होती. तशी दर थोड्या वर्षात होतच होती. जेव्हा पहिल्यांदा तिने उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी राहायचा हट्ट केला, जेव्हा पहिल्यांदा त्या घरातील कुणी मुलगी नोकरीला गेली आणि मुलगी १८ वर्षाची झाली की तिचे लग्न झालेच पाहिजे हा नियमही पहिल्यांदा तिने तोडला. प्रत्येकवेळी घरात छोटी-मोठी वादळं व्हायची पण एकुलती एक असल्याने आणि तेही तिचे आजपर्यंत प्रत्येक निर्णय यशस्वी ठरल्याने ही वादळं मंदावली होती. रागाचे कौतुकात रुपांतर झाले होते. पाटलांचं घराणं तसं सुशिक्षित होतं पण जुन्या वळणाचं. निमूची आई पण अगदी १२वी पास झाली होती.असो. तर पुढच्या आठवड्यात अमेरिकेला जायचे नक्की झाल्याने निमू ४ दिवसांसाठी घरी आली होती. आईने प्रेमाने रव्याचे लाडू, पापड,ओला मसाला यांचे डबे भरून दिले. 'अगं आई, तिकडे सगळं मिळतं'. 'असू दे गं, चार दिवस तरी घरचं खाशील. मग हायेच की आपला हात जगन्नाथ!.'
नाही-नाही म्हणता एकाच्या दोन ब्यगा झाल्या आणि सुट्टीचे ४ दिवस भुर्रकन उडून गेले. पाटील आपल्या पोरीला सोडायला मुंबैला पण जाऊन आले. आयुष्यात पहिल्यांदाच विमानतळ पण पाहून घेतलं. निमूला जाऊन एक दिवस झाला नाही तोवरच तिचा अजून फोन आला नाही म्हणून आजोबांना चुटपूट लागलेली. लवकरच तिचा फोन आला आणि सगळ्या घराला हुश्श झालं. निमू व्यवस्थित पोहोचली होती. तिचा आता नियमितपणे शनिवारी फोन येऊ लागला. पाटलांची मान एकदम ताठ झाली होती गावात. लवकरच पाटलीण बाईंनीही निताताईला अमेरिकेच्या गमती-जमती सांगायला सुरुबात केली. निमूच्या फोनची वाट पाहणं, तिची खुशाली विचारणं, कुठं फिरून आली की कसं वाटलं याची चौकशी करणं हा त्यांच्या एक कार्यक्रमच झाला होता.तशी निमू कॉलेजापासूनच बाहेर राहायला लागल्यामुळे पहिले एक-दोन महीने निवांतपणे गेले. लवकरच गणपतीचे दिवस जवळ येऊ लागले. सणवाराला निमू घरी असायचीच. पाटलीण बाईंना जरा अस्वस्थ होऊ लागलं. तिकडे निमूला अमेरिकेत पोचल्यावर २-३ दिवसातच घर मिळालं. एक रूममेट पण. मग तिथल्या राहणीमानाशी जुळवा-जुळव सुरू झाली. घरातल्या भाजीपाला आणण्यापासून जेवून भांडी घासेपर्य़ंत सगळं स्वतः:च करायचं. :-( शिवाय ऑफिसातील काम सांभाळायचं. आठवड्याची लोंड्री स्वतः:च करायची. कामाची तिला सवय होती पण प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट पाहिली की तिला घरी सांगावंस वाटायचं. घरातला डिशवॉशर पाहून तिला निताताईची आठवण झाली.इथे भांडी पण मशीनमध्ये घासली जातात सांगितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचे आर्श्चयाचे भाव कसे असतील याचा विचार करूनच तिला हसू आले. :-) फोन करण्यासाठी ती मग शनिवारची वाट पाहू लागली. आठ्वड्य़ाच्या सर्व गोष्टी तिला एकाच दिवसात, एकाच तासात सांगायच्या असत.एक-दोन महिने ठीकठाक गेले. सगळं मार्गी लागल्यावर मात्र घराची जास्त आठवण होऊ लागली.