इटली,मॉरिशस आणि वेस्ट इंडिज हून पत्र येणं आणि साहजिकच पाठवणं दुर्मिळ झालं पण फ्रान्सिस,स्टेफी आणि मी; आमची तिघींची पत्रापत्री मात्र अजून चालू होती.
नंतर मग हळूहळू नोकरी,लग्न इ.प्रापंचिक व्यापात शाळा,कॉलेज,त्यातले मित्रमैत्रिणींच्या भेटी कमी कमी होत गेल्या,तर पत्रमैत्रिणीला पत्र लिहिणे कधी थांबले ते कळलेच नाही. असं काही माझं एकटीचंच झालं नाही,बहुतेक सगळ्यांचं थोड्याफार फरकाने असंच होतं. जुने धागे काळाच्या ओघात हरवतात कधी ते कळत नाही,पण त्याच वेळी नवे मित्रमैत्रिणी,नवी नाती,नवे परीघ रुंदावतात त्यात हे जुने हरवल्याची चुटपुट कमी होते एवढेच!
मला कधी तरी आठवण व्हायची पण आसुसून पत्र लिहावसं मात्र वाटलं नाही.बाकीचे पत्रमित्र केव्हाच हरवले पण स्टेफी आणि फ्रान्सिसशी पत्रापत्री नाताळच्या,नववर्षाच्या,वाढदिवसाच्या शुभेच्छांपुरती तरी कितीतरी दिवस चालू होती,पुढे ते ही कधीतरी असंच बंद झाले.