तुमचा आवडता ऋतु कोणता असं विचारलं तर आपल्यापैकी अनेकांचं अगदी हमखास उत्तर असतं पावसाळा. निसर्गाला सुंदर हिरव्या रंगात रंगवुन टाकणारा, सृष्टीचं देखणं रुप दाखवुन तिच्या प्रेमात पडायला लावणारा आणि मनुष्यप्राण्यासहित सगळ्या चराचर सृष्टीत एक चैतन्य निर्माण करणारा पावसाळा सुंदर ऋतु खराच. या प्रश्नाचं उत्तर अनेक जण थंडी असंही देतील. गुलाबी, बोचरी पण तन नि मन उल्हासित करणारी थंडी. पण माझं उत्तर मात्र याहुन वेगळं आहे. मला आवडतो तो उन्हाळा. आता लोक त्याच्या नावानं कितीही बोटं मोडत असताना दिसले तरी मला मात्र उन्हाळाच पसंत आहे, कदाचित असं असेल की माझ्या लहानपणीच्या अनेक ह्द्य आठवणी उन्हाळ्याशीच निगडीत आहेत म्हणुनही . उन्हाळा ! वाढलेल्या तापमानाबरोबरच उन्हाळ्याची सुट्टीही घेउन येणारा.अंग भाजुन काढत असला तरी कलिंगड, खरबुज, संत्री अशी सुंदरसुंदर फळं चाखविणारा. वेगवेगळ्या प्रकारची सरबतं, फळांचे रस अशी चंगळ करणारा. सकाळी उशीरा उठुन मग दुपारी पार जेवेपर्यंत रंगलेले ते क्रिकेटचे डाव. नंतर पंख्याखाली काढलेल्या त्या झोपा. परीक्षा संपल्या की तातडीने बाहेर येणारे ते पत्ते. गाद्यांवर लोळुन वाचलेली ती गोष्टींची पुस्तके. ओह! उन्हाळ्याच्या या स्मृती किती रमणीय आहेत!