आरोप हा शब्द अक्युझेशनसाठी तर अभियोग हा शब्द प्रॉसिक्यूशनसाठी सांगितलेला आहे.

हे मान्य. पण त्यापुढील

ज्यांवर आरोप आहे ते आरोपी आणि ज्यांच्यावर खटला चालू आहे ते अभियुक्त

हा सूक्ष्मभेद (बरोबर असला तरी) अनावश्यक आणि (मूळ प्रतिशब्दकर्त्यापुरतेच बोलायचे झाले तर) 'केवळ करायचा म्हणून ओढूनताणून केलेला' वाटतो.

असे वाटण्यामागे काही कारणे आहेत, ती अशीः

१. 'आरोप' ही खटला चालवण्यापूर्वीची पहिली पायरी. प्रथम 'आरोप' केला जातो, त्यानंतर त्या आरोपाच्या आधारावर खटला अथवा 'अभियोग' चालवला जातो. 'आरोप' असल्याशिवाय 'अभियोग' चालवता येणे अशक्य. (गरजूंनी एक विचारप्रयोग म्हणून कल्पनेत चालवून पाहावा. )

आता 'अभियुक्त' हा शब्द वापरला जात आहे याचा अर्थ त्या व्यक्तीवर 'अभियोग' चालू आहे हे येथे अध्याहृत आहे. थोडक्यात, चालू असलेल्या 'अभियोगा'च्याच संदर्भात या शब्दाचा उल्लेख होत आहे हे उघड आहे. हा संदर्भ लक्षात घेता, जेथे अभियोग चालू आहे हे गृहीत आहे तेथे या बाबीचा स्पष्ट उल्लेख न केल्याने, अर्थात केवळ 'आरोपी' म्हटल्याने, काहीही फरक पडू नये. (अभियोग चालू आहे म्हणजे आरोप आहेच, तेव्हा 'आरोपी' म्हणणे हे तथ्यतः चूक नाही, आणि अभियोगाचा संदर्भ अध्याहृत असल्यामुळे 'अभियुक्त' असा वेगळा आणि प्रचलित नसलेला शब्द मुद्दाम योजण्याचीही काहीच गरज नाही. )

२. तसेही उपरनिर्दिष्ट तक्त्याप्रमाणे 'अभियुक्त' हा शब्द 'अक्यूझ्ड'साठी प्रतिशब्द म्हणून योजलेला नाही, तर 'कैदी'साठी प्रतिशब्द म्हणून योजलेला आहे असे दिसते. हे तर मुळीच तर्काला धरून वाटत नाही. 'कैदी'साठी फार फार तर 'बंदी' हा शब्द (प्रतिशब्दकर्त्यांच्या तत्त्वांस अनुसरून संस्कृतोद्भव असेल तर) प्रतिशब्द म्हणून योग्य ठरावा. 'कैदी' हा फक्त अटक करून बंदिवासात ठेवलेला मनुष्य असतो. त्यावर 'अभियोग' चालू झाला असेलच असे सांगता येत नाही. (म्हणजे तो 'अभियुक्त' असेलच असे निश्चित सांगता येत नाही. ) किंबहुना त्याच्यावर निश्चितपणे काही 'आरोप' असेलच असेही सांगता येत नाही. त्याला प्रतिबंधक अटक झालेली असू शकते. किंवा, नक्की खात्री नाही, पण काही विशिष्ट परिस्थितींत कोणताही आरोप न ठेवता एखाद्या व्यक्तीस काही अल्प काळापर्यंत अटकेत ठेवता येते असे वाटते. (तसे करता येत नसेल तर मुळात 'हेबियस कॉर्पस'चे नेमके प्रयोजन काय ही शंका मनाला चाटून जाते.) म्हणजेच 'कैदी' हा 'अभियुक्त' तर सोडाच, पण निश्चितपणे 'आरोपी'ही असेलच याचीही शाश्वती नाही.

अर्थात हे केवळ माझे तर्क झाले. मूळ प्रतिशब्दकर्त्यांनी असाच किंवा इतका (किंवा काही) विचार केला असेलच, असे सांगता येत नाही.

तक्त्यातील इतर काही प्रतिशब्दही पटले नाहीत. उदाहरणार्थ:


(ह्यापुढील भाग येथे स्थलांतरित : प्रशासक)