प्रतिशब्द कसे / कशासाठी सुचवावेत / सुचवू नयेत?

कंप्युटरविषयक सगळ्या शब्दांचे मारून मुटकून मराठीकरण करण्याची कल्पना हास्यास्पद आहे. की बोर्डला कळपट, मदर बोर्डला मातृफलक (माऊसला मूषकमित्र का? ) असले शब्द बांधता आले तरी ते वापरात येतील का? आणि समजा जरी असे शब्द मराठी संकेतस्थळांवर वावरणाऱ्या काही मोजक्या लोकांनी वापरायला सुरुवात केली, तरी त्यांना इतरांशी संवाद साधताना मूळ इंग्रजी शब्दच वापरावे लागणारा नाहीत का? सगळ्या गोष्टी सगळ्या संदर्भांसहित एका भाषेतून दुसऱ्या भाषेत नेता येणे केवळ अशक्य आहे. " पातीचे पांढरे कांदे आणि बेडगी मिरचीची फोडणी घातलेलं डांगर पाहिजे बघा. जोडीला बाजरीची भाकरी, पंढरपुरी म्हशीच्या दुधाचं लोणी आणि माईनमुळ्याचं लालभडक लोणचं पाहिजे अण्णा... " करता येईल हे जसेच्या तसे इंग्रजीत? 'पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा' हे वाक्य काही इंग्रजीचे शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीत भाषांतर करण्यासाठी देत असत. 'विथ अ डान्सिंग सिल्व्हर पिकॉक ऑन इटस बॉर्डर, ओ मदर वेअर मी अ न्यू सारी...?" केविलवाणे नाही वाटत हे? 
संभाषणकलेचे (इथेही 'कम्युनिकेशन'चा अर्थ येत नाही) पाच 'सी' आहेत. कंटेंट, क्लॅरिटी, कॉंटेक्स्ट, कोहेरन्स आणि कन्साईजनेस. अगदी आग्रहच असेल तर भरवण, सुस्पष्टता, संदर्भ, संगती आणि संक्षिप्तता. संभाषण  सुस्पष्ट व्हायचे असेल तर दुर्बोधता टाळली पाहिजे. क्लिपबोर्ड ला टाचणपट हा प्रतिशब्द फारतर पंडितसभांमध्ये वापरता येईल. पण त्याने काय साधणार आहे?