मिलिन्दपंत,
वर 'अजब'नं लिहिलेली कविता ही गझल आहे असं मला वाटतं. आपल्या प्रश्नांची माझ्या माहितीप्रमाणे उत्तरं देतोय..
१) गैर-रदीफ़ गझल असू शकते. प्रसिद्ध गझलांपैकी उदा.
कै. सुरेश भटांची गझल-
'हा असा चंद्र अशी रात्र फिरायासाठी
तूच नाहीस इथे हात धरायासाठी'
यात फिरायासाठी आणि धरायासाठी हे काफ़ियाचे शब्द झाले. ('साठी' ही रदीफ़ नाही, कारण 'साठी' हा वेगळा शब्द नाहीये.).
२) जर मतल्यात 'अलामत' पाळली नाही, तर पुढेही अलामतच्या नियमातून मुक्तता मिळते (हा कै. भटांनी 'गझलची बाराखडी'त लिहिलेला 'उपाय' आहे. हा मराठी, उर्दू गझलेतही प्रचलित आहे). उदा. वरचीच भटांची गझल. 'फिराया..' आणि 'धराया...' मुळे पुढे 'झुराया...', 'चिराया...' इ. चालू शकतं.
३) 'काफ़िया' पाळला गेलेला नाही, हे तुमचं विधान मला कळलं नाही. तंबोरा, वारा, पारा इ. काफ़ियाचे शब्द आहेत. ('रा' हे यमकही त्यात आहे.)
४) कंसातली वाक्यं - याचं नक्की स्पष्टीकरण मला माहिती नाही. माझ्या गझलेत मी दोन मिसऱ्यांमधला संबंध वेगळा (कल्पनाप्रधान, इ.) असला की जो मिसरा वेगळा असेल तो कंसात लिहितो. उदा. माझ्या आव्हान या गझलेतल्या 'उंच आकाशात होते यान माझे' या ओळीला मी कंसात लिहिलं होतं. अशी उदाहरणं मला कै. सुरेश भटांच्या गझलांतही आढळली आहेत. (उदा. 'एल्गार' ही गझल.). जाणकारांनी कृपया ही गोष्ट स्पष्ट करावी.
- कुमार