अंडी भरलेले टोमाटो व ढबू मिरची

  • सहा अंडी
  • तीन हिरवे टोमॅटो (कडक)
  • तीन ढबू मिरच्या (हिरव्या, कडक)
  • मीठ, तिखट, मिरपूड, इ
  • तेल
३० मिनिटे
तीन जणाना भरपेट नाश्त्याला

टोमॅटो देठापाशी आणि तळापाशी एकेक चकती कापून घ्यावेत. चमच्याने अथवा जमल्यास हाताने मधील सर्व मगज काढून घ्यावा. (काढलेला मगज या पदार्थात वापरायचा नाहीये. तो इतर रश्शात अथवा भाजीत ढकलावा)

असेच ढबू मिरचीचेही करून घ्यावे.

आता सहा पोकळ दंडगोल अथवा तत्सम आकाराच्या वस्तू तयार होतील. हे आकार एका जागी उभे राहतील असे असावेत. नसल्यास थोडी कलाकुसर करून त्यांना त्या स्थितीला आणावे.

अंडी फोडून त्यातील पिवळा बलक अलगद वेगळा करावा (चमचा वापरून). शक्यतो एका वेळेला एक अंडेच यासाठी घ्यावे.

निर्लेपच्या तव्यावर एक चमचा (टी स्पून) तेल घालून ते सगळीकडे पसरवून घ्यावे.

तेल धुरावल्यावर ज्योत बारीक करावी.

त्यावर हलक्या हाताने हे सहा आकार ठेवावेत.

पिवळा बलक न मोडता एका पोकळीत एक पिवळा बलक असे सावकाश सोडावे. थोडी पोकळी उरल्यास उत्तम.

झाकण ठेवून एक वाफ आणावी. पिवळा बलक घट्ट व्हायला लागला की त्यावर मीठ, मिरपूड इ आवडीप्रमाणे घालावे. उरलेला पांढरा बलक फेटून उरलेल्या पोकळीत आणि उरलेल्या तव्यावर घालावा. तो लगेच आम्लेटसारखा होतो.

तवा खाली उतरावा. धारदार सुरीने प्रत्येक दंडगोल उभा कापावा.

असे एक अंडे आणि दोन पावाचे तुकडे हलक्या नाश्त्याला पुरते. दोन अंडी आणि चार पावाचे तुकडे म्हणजे अगदीच पोटभर होते.

हा पदार्थ कमी तेलातला असल्याने त्याबरोबर थोडे चीज अथवा लोणी खपून जाते.

आवडत असल्यास फेटलेली मोहरी (mustard) चा वापर सजावटीसाठी करावा.

सुरीची धार चांगली आहे ना याची खात्री करून घ्यावी. अन्यथा अर्ध-भुर्जी होते.

स्वप्रयोग