देवगांधार - १

तो दिवस माउच्या गोष्टीतला सगळ्यात सुंदर दिवस होता ... त्या दिवसभर जे माउच्या मनात होते तेच तिच्या चेहऱ्यावर होते ... माउच्या चेहऱ्यावर जो आनंद त्या दिवशी होता तो एकदम खरा खरा होत ... कोणताही खोटा मुखवटा नव्ह्ता ... आणी आता मुखवट्याची गरज पण नव्हती .. ते दिवस संपले होते आता .. माउला क्षणाक्षणाला खाणारी भिती नव्हती आता .. सावट दूर झाले होते ... बोक्याला हेच पाहिजे होते किती दिवसांपासुन ... बोक्याने देवाला खुप मनापासून मागणे मागितले होते ... देवाने ओ दिली होती ... ती दहशत संपली होती ... एक हाक मनापासून फक्त ... आणी जगणे परत सुसह्य झाले होते ...

ती संध्याकाळ तर अविस्मरणीयच ... बोक्याचे स्वप्नच जणु खरे झाले होते ... का स्वप्नंच होते ते ... ते जर स्वप्न होते तर मग मी आता पण स्वप्नातच आहे की काय ?? ... असे असेल तर परत जाग कधीच येऊ नये .. हे स्वप्न कधीच तुटू नये ...

माउची लगबग पाहण्यासारखी होती .. बोक्या जेवायला येणार .. काय करू काय नको असे झाले होते माउला .. बोक्याला कोणती भाजी आवडते इथपासून ते बोक्याला किती पोळ्या लागतात इथेपर्यन्त माउच्या डोक्यात विचारचक्र चालू सारखे ... बोक्याला भाजी आवडेल ना .. बापरे मी किती पसारा करून ठेवते स्वयंपाक करतांना ... बोक्या काय म्हणेल ? ... पटापट आवरायला हवे .. ओहह आधी वांगे धुऊन घेते मग कणीक मळते ... भजी शिजता शिजता पोळ्या लाटता येतील .. माउची धांदल उडाली होती जाम ...
बोक्या इकडे त्याच्याच सुरांमधे हरवला होता ... आज परत त्याचा सुर लागला होता ... देवगान्धार .. आज सगळे सुर जुळले होते पण अतृप्तता मात्र जाणवत होती ..
माउ आणि बोक्या जेवायला बसले ... माउच्या डोळ्यात अधीरात ... बोक्याने पहिला घास घेतला .. बोक्याला घरीच आल्यासारखे वाटले ... मऊसूत पोळ्या आणी चविष्ट वांग्याची भाजी ... बोक्या रोजच्यापेक्षा २ घास जास्तच जेवला .. माउने पाण्याचा ग्लास पुढे केला .. त्या पाण्याची शितलता बोक्याच्या कणाकणात भिनली ... बोक्या तृप्त झाला ... देवगांधार शिगेला पोहचला अन पूर्णं झाला ...

असे सुर कधी लागले नव्हते ... अश्वथाम्याची भळभळा वाहणारी जखम भरली असेल .. एकलव्याचा गुरुदक्षिणा म्हणून दिलेला अंगठा परत मिळाला असेल .. कर्णाचा अर्जुनाने असा अनीतीने वध केलाच नसेल .. जुलिअस सीझरच्या पाठीत ब्रुट्स् ने विश्वासघाताने खंजीर खुपसलाच नसेल .....

प्लीज देवा, बी मर्सीफ़ुल ....