व्हॅटिकनमध्ये महाराष्ट्रदिन

गेल्या वर्षी इस्रायलमध्ये महाराष्ट्रदिन साजरा झाल्याचे कळले होते, हे सर्वांना आठवतच असेल. आजच्या म.टा.त देशोदेशीसाजऱ्या झालेल्या महाराष्ट्रदिनासंबंधी ही लेखवजा बातमी वाचून बरे वाटले. सर्वांना समजावी आणि विचारांची देवाणघेवाण करणे सोयीचे व्हावे म्हणून ती येथे उतरवून ठेवत आहे.

म.टा.तली बातमी :
व्हॅटिकनमध्येही घुमला मराठीचा गजर!

म. टा. इंटरनेट प्रतिनिधी

ज्ञानोबा-तुकोबांच्या भक्तीरचना, भावगीतांचे सूर, मऱ्हाटमोळे खाद्यपदार्थ अशा जंगी थाटात १ मे रोजी महाराष्ट्राचा स्थापनादिन साजरा झाला. कुठे ठाऊकाय? ख्रिस्ती धर्माची राजधानी असलेल्या व्हॅटिकन सिटीमध्ये. मूळचे वसईचे असलेले फादर फेलिक्स मॅकेडो यांनी हा मराठीचा सोहळा ख्रिस्ताच्या भूमीत नेऊन खऱ्या अर्थाने ग्लोबल केलाय.

संत ज्ञानेश्वरांनी सातशे वर्षांपूवीर्च 'विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो' असे म्हणत मराठी संस्कृती वैश्विक केली. ही माय मराठीची गुढी मराठी बांधवांनी जगभर पोहोचवली. ते जेथे गेले तेथे आपले सण-उत्सव, खाद्यपदार्थ, भाषा, संस्कृती, घेऊन गेले. आता तर अमेरिका असो वा कुवेत, जेथे मराठी माणूस आहे तेथे महाराष्ट्र मंडळ आहेच.

या जगभरातील मराठी बांधवानी महाराष्ट्राच्या स्थापनेचा मंगलदिनही तेवढ्याच जल्लोषात साजरा केला. 'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेकांनी या सोहळ्याची वर्णने आमच्याकडे पाठविली. त्यातील भावना होत्या, मराठी मनाला साद घालणाऱ्या!

त्यातील एक प्रतिक्रिया आहे, फादर फेलिक्स यांची. सवोर्च्च ख्रिस्ती धर्मगुरू पोप यांच्यासोबत काम करणाऱ्या फादर फेलिक्स यांच्या पायाला लागलेली मराठीची धूळ अजूनही कायम आहे. ते म्हणतात, 'विविध देशांतील मित्रांसमवेत आम्ही महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा केला. त्यांना मी संयुक्त महाराष्ट्राचा संग्राम कथन केला. आणि ज्ञानोबा-तुकोबाचे अभंग ऐकवले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबव अशी देवाजवळ आम्हा सर्वांनी प्रार्थना केली. मित्रांना आपल्या हाताने बनविलेले मराठी पदार्थ खाऊ घातले. साऱ्यांनी मिळून 'भावगीते' व 'लावण्या' ऐकल्या.

फादर मॅकेडो यांच्याप्रमाणेच सौदी अरेबियातील गणेश पोटफोडे यांनीही मित्रांसोबत महाराष्ट्र दिन साजरा केला. त्यांच्या कंपनीत एकूण २०० भारतीय काम करीत आहेत. आपल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे, 'मराठी माणसाने मोठी स्वप्ने पाहायला हवीत. आज जग जवळ येत असून संधीही वाढल्या आहेत. या संधीचा उपयोग त्याने आपल्या विकासासाठी करावा. त्यासाठी मातृभूमीशी नाळ न तोडताही जगभर भराऱ्या मारता येतात.' तसेच संयुक्त महाराष्ट्रात मुंबई आली पण अजून बेळगावसाठी लढा कायम असल्याची आठवणही त्यांनी करून दिली आहे.

सिंगापूरचे सुभाष भिडे महाराष्ट्र दिनी मायभूमीच्या आठवणीने हळवे होतात. ते म्हणतात, 'आपली माणसे, आपले सण याची खरी किंमत महाराष्ट्रापासून दूर गेल्यावरच कळते. येथे सिंगापूरमध्ये सारे प्रगत, आधुनिक वगैरे आहे पण आपल्या झुणकाभाकरीसाठी जीव तुटतो आहे.' सिंगापूरमध्येच एकत्र जमून एकमेकांना शुभेच्छा देऊन हा दिवस साजरा केल्याचे ते कळवितात.

शेवटी माणूस हा आपल्या मातीशी कायमच जोडलेला असतो हे खरेच. त्याचीच तर ही उदाहरणे. जगाच्या पाठीवर कोठेही तुम्ही महाराष्ट्र दिन साजरा केला असेल तर आम्हाला mtonline@timesgroup.com या पत्त्यावर लिहून कळवा. आम्ही तुमच्या ई-पत्राची वाट पाहत आहोत.