दोन चाकोरीबाहेरची आत्मचरित्रे भाग १

पोरवाल दंतमंजनाचे मालक भा वि मोकाशी यांचे "मला न पडलेले स्वप्न" हे आत्मचरित्र तसे चाकोरीबाहेरचे आहे. मोकाशींचा जन्म १९०६ चा. वडील त्यानंतर पाच वर्षातच वारले. मग भावंडांची फाटाफूट. मोकाशी मुंबईत पोचले. नातेवाईकांकडे राहत त्यांनी मॅट्रिक फेल पर्यंत पल्ला गाठला. आणि काही कौटुंबिक कारणांनी एकटेच बाहेर पडले. ओळखीओळखीने एक नोकरी मिळाली ती महिनाभर चालली. मग दुसरी नोकरी बघण्यापेक्षा धंदा का करू नये असा विचार 'कोहिनूर मिल'चे मालक रामसिंग डोंगरसिंग यांनी मोकाशींच्या मनात घुसवला ("तुम्ही महाराष्ट्रीयन लोक थोडे फार शिकता व नोकरीचे मागे लागता. दुसरा काही व्यवसाय करावा असे तुमचे मनातच येत नाही. इतर दुकानदार लोक बघा, अगदी फेरीवाले बघा, ते कारकुनी करण्यापेक्षा जास्त कमावतात, फार काटकसर करून राहतात. जास्त श्रम करतात, त्याची त्यांना सवय होते. त्याला नम्रतेने वागावे लागते. तो गुण तुम्ही लोक का लक्षात घेत नाही" हा रामसिंग डोंगरसिंग यांचा संवाद जवळजवळ ऐंशी वर्षांपूर्वीचा!) आणि आपल्याच कापडगिरणीचे कापड दारोदार विकण्याचा व्यवसाय सुरू कर असे सुचवले.

रक्तात नसलेली वैश्यवृत्ती अंगी बाणवण्यासाठी कष्ट पडलेच. पण हळूहळू जम बसला. आणि मुदतीच्या तापाने त्यांना आपले लक्ष्य केले. ते आजारपण काढण्यासाठी ते घरी आईकडे गेले. दोनेक महिन्यांनी बरे होऊन, आणी 'भटकण्याचा धंदा केल्यानेच आजारी पडलास, आता कुणाच्यातरी ओळखीने नोकरी बघ' असा आदेश घेऊन कल्याणला निघाले. वाटेतच अंबरनाथला धरमसी मुरारजी केमिकल कंपनी दिसली त्यात 'विचारायला काय हरकत आहे' म्हणून गेले आणि टाईमकीपरची नोकरी त्यांना मिळाली.

पण त्या कंपनीची अवस्था फारशी चांगली नव्हती, म्हणून परत ओळखीच्या चिवट बंधांनी वेस्टर्न इंडिया मॅच कंपनी (विम्को) या स्वीडिश कंपनीत ब्रिटिश अधिकाऱ्याच्या हाताखाली यांत्रिक विभागात पर्यवेक्षक म्हणून लागले. तिथली कामाची पद्धत, कामगारांचे वेगवेगळे अनुभव, कामगारांसाठी सुरू केलेली पतसंस्था, कामगार कपात करण्याची आलेली पाळी, अशा स्थानकांवरून नोकरीची गाडी चालू होती. पण 'व्यवसाय' पुन्हा खुणावू लागला. नोकरी न सोडताच दोन भागीदारांसोबत 'कोकण राईस सप्लाईंग कंपनी'चा उद्योग सुरू केला, पण तो तीन महिन्यांतच गुंडाळावा लागला. आर्थिक नुकसानाबरोबरच लोकांच्या कुचेष्टेला तोंड देण्याचा अनुभव पदरी पडला.

नोकरी व्यवस्थित चालू होती. पण डोक्यावरचा ब्रिटिश साहेब सुटीला म्हणून इंग्लंडला गेला कुरबुरींना सुरुवात झाली. शेवटी नोकरी सोडली. व्यवसायातच शिरायचे असे ठरवले. पण सर्व नातेवाईक ठाणे, मुंबई, कुलाबा याच परिसरात असल्याने तिथे व्यवसाय केला तर कुचेष्टा आणि सल्ले यांचा मारा होईल, तो टाळण्यासाठी लांब कुठेतरी जायचे असे ठरवून भावाबरोबर ते सोलापुरात पोचले. संपूर्ण नवीन सुरुवात करून चांगलाच जम बसवला. एकाची दोन दुकाने केली. सर्व सुरळीत जमले असे वाटेपर्यंत अजून एक वळण घेऊन ते पुण्यातील 'पोरवाल दंतमंजन' ही कंपनी विकत घेण्यापर्यंत पोचले. तोपावेतो व्यापारी वृत्ती त्यांच्या अंगात चांगलीच भिनली होती. त्यामुळे सोलापुरातले दुकान विकण्याचा किस्सा असो, पोरवालशेट विक्री-व्यवहार करताना वेळ काढू लागले तेव्हा पुणे-मुंबई पास काढून मुंबईहून रोज माल आणून पुण्यात विकण्याचा धंदा असो, वा या फेऱ्यांपैकी एका फेरीत परत विम्कोमध्य 'नोकरीच्या मुलाखतीसाठी' जाऊन जाण्यायेण्याचा पहिल्या वर्गाचा प्रवासखर्च मिळवणे असो, मोकाशी एव्हाना पूर्ण 'व्यापारी' झाले होते हे जाणवते.

पोरवाल कंपनी विकत घेतली आणि ते पुण्याला येऊन स्थायिक झाले. तेथून पुढे कथानकात फार वळणे-वाकणे नाहीत.

मोकाशी फारसे प्रासादिक वगैरे लिहिण्याच्या भानगडीत पडत नाहीत. सर्व अनुभव ते रपारप 'जमेल तसे' या स्वच्छ हेतूने शब्दबद्ध करत जातात. "हेच त्यांचे सामर्थ्य आणि हीच त्यांची मर्यादा" हा 'सत्यकथा' छापाचा शेरा त्यांना झकास लागू पडतो. काही नमुने:

आयुष्यात पहिल्यांदाच व्यवसायाला - कापडविक्रीला - बाहेर पडले तेव्हा: "दुसरे दिवशी सकाळी तो कापडाचा बोजा घेऊन मी बाहेर पडलो. प्रथम कोठे जावे, लोकांना कसे विचारावे यासंबंधी विचार करीत हिंदू कॉलनी दादरमध्ये फिरत राहिलो. कोणाचे घरी जाण्याची हिंमतच होईना. एक तास, दीड तास हिंडलो असेन मी. कोणास भेटलो नाही. शेवटी एका घरी एक गृहस्थ दरवाज्यातच उभे होते. त्यांचेपाशी मी कापड विकतो असे काहीतरी बोललो. प्रत्यक्ष काय बोललो हे मला आठवत नाही"

धरमसी मुरारजी केमिकल कंपनीत प्रवेश: "गेटवर भय्याजी होते पण ते काही नीट बोलेनात. मी खिशातून एक आणा काढला व त्या भय्याजीचे हातावर ठेवला व म्हणालो, चहा घ्या. तेव्हा त्यांचे बोलण्यात फरक पडला. तो मजपाशी ठीक बोलू लागला".

नोकरी सोडताना: "मी नोकरी सोडताना असेच ठरविले होते, यापुढे दुसरी नोकरी निश्चित करावयाची नाही. असे ठरविले तरीसुद्धा मी मोकळा झाल्यावर थोडा फार भांबावलोच हे कबूल केलेच पाहिजे. मी काहीही करीन म्हणजे काय हे प्रत्यक्ष बोलताना मात्र लक्षात येत नाही. कारण तसे पाहिले तर त्यावेळी नोकरीचा आधार असतो. तो आधार नाहीसा झाला, उत्पन्नाचे दुसरे साधन नसले म्हणजे मग निश्चित काय करावयाचे हे सुचणेही फार अवघड असते. दुसरी एक गोष्ट, जेव्हा आपण एखाद्या अधिकाराच्या जागी असतो तेव्हा आपल्याला एक मान असतो. तो अधिकार संपला म्हणजे मग कोणी कोणास विचारीत नाही."

सोलापुरात दुसरे दुकान सुरू करताना: "मी माझे दुकानात क्रोकरी, ग्लासवेअर, चिनी मातीच्या बरण्या हा माल जास्त ठेवू लागलो. एक म्हणजे आजूबाजूच्या दुकानातून हा माल मिळत नव्हता. शिवाय हा माल थोड्या पैशात भरगच्च दिसतो. दुकान भरलेले वाटते. नफ्याचे प्रमाण देखील बरे असते. दुकान सुरू केले ते पैसे मिळविण्यासाठी, पोट भरण्यासाठी. आपल्याला जे जमेल ते व ज्यात दोन पैसे जास्त मिळतील तो माल आणावा. नुसते दिखाऊ दुकान देखील मला फार आवडते. पण ते आपणास परवडले पाहिजे."

सोलापुरात दुकान स्थिरावताना: "आणखी एक गोष्ट घडली. आमचे शेजारीच - नुसती एक भिंत मध्ये - एक आमचे टाईपचे दुकान निघाले. ते गृहस्थ आम्हाला थोडा त्रास देऊ लागले. त्रास देणार म्हणजे काय, तर आमचेपेक्षा एखादा पैसा स्वस्त माल विकणे. आम्ही त्यावर निराळाच उपचार केला. त्यांनी एक पैसा स्वस्त माल केला व आम्ही एक पैसा भाव वाढविला. अनेक ठिकाणी मानसिक गोष्टी असतात. लोक विचार करतात. एकीकडे एक पैसा स्वस्त व इकडे थोडा महाग का? त्यामुळे त्या गृहस्थांचे दुकान जेमतेम पाच-सात महिने चालले व ते दुकान आम्हीच - मालासह- विकत घेतले व मधली भिंत मालकांचे परवानगीने काढून टाकली. त्यामुळे आमचे दुकान मोठे झाले. आम्ही मालदेखील वाढविला."

मात्र सबंध पुस्तकात त्यांच्या आयुष्याखेरीज इतरत्र बाहेर काय चालू आहे याच सुगावासुद्धा लागत नाही. ते ज्या काळाबद्दल लिहितात तो काळ खरे तर खूपच घडामोडींचा. १९२६ला ते विम्कोमध्ये लागले. १९२८ला कोकण राईस सप्लाईंग कंपनीचा अनुभव झाला. नोकरी सोडून सोलापुराला प्रस्थान १९३२च्या आसपास. पोरवाल कंपनी घेतली १९४३ साली. पण या सर्व काळात चालू असणाऱ्या स्वातंत्र्यप्राप्ती, गांधीहत्या आदी घटना कुठे ओझरत्या उल्लेखाच्या स्वरूपातदेखील येत नाहीत. स्वतःच्या विवाहाचा उल्लेख हा देखील मध्येच प्रवाह थांबवून "हे सर्व लिहिताना एक गोष्ट लिहावयाची विसरलो" अशा प्रस्तावनेनंतर येतो. आणि दुसऱ्या महायुद्धाचा उल्लेख हा ही 'वस्तूंची टंचाई निर्माण झाल्याने नफा भरपूर वाढला' एवढ्यापुरताच.

सर्व घडामोडींत पत्नीचा सहभाग शून्य आहे. सोलापुरात व्यवसाय सुरू करणे, दोन दुकाने करणे, ते दुकान विकून पोरवाल कंपनी विकत घेणे या सर्व घटना पत्नीला 'बातमी' या स्वरूपात प्रत्यक्ष घडल्यावरच समजल्या.

पोटासाठी का होईना, व्यापारीवृत्ती अंगी बाणवून त्यात बऱ्यापैकी यश मिळवलेल्या व्यक्तीचे संपूर्णतया आत्मनिष्ठ कथन, ज्या अंगाचे लिखाण मराठीत फारसे नाही, असे म्हणून हे संपवतो.

प्रकाशक: व्हीनस प्रकाशन. प्रथम आवृत्ती: जानेवारी १९८६