बाबा ते आले ना !--- २

सगळ्या शाळांच्या मुलांचे थवे दिसत असताना मिनी त्यात नाही ही आश्चर्याचीच गोष्ट होती.
वैनतेयवासी आणि मिनी दोघानीही आम्हाला चकवले होते.
      घरी परतताना मी रस्त्यावरची गर्दी टाळण्यासाठी मोनोरेलने निघालो.त्यातील प्रवाशांच्यातही वैनतेयवासी न आल्याबद्दलच चर्चा चालू होती.
" काय चांगलीच निराशा केली या प्राण्यानी !" एकजण दुसऱ्याला म्हणत होता
"पण ते उतरले आहेत असा संदेश तर होता"
" मला वाटते ते अदृश्य स्वरूपात असावेत."
" अरे हो पण त्यांच यान तर रडारवर दिसल होत थोडावेळ आणि मग कुठ गायब झाल अस म्हणत होते. तिथले संशोधक "
" मग मला वाटत ते अँटिमॅटरचे बनले असावेत आणि आपल्या कक्षेत येताच गेले असतील संपून !"   
" ए उगाच काही नको बडबडूस ."
       मी घरात शिरलो तेव्हा मिनी घरातही बव्हती.पण माझ्या पाठोपाठच जणु ती घरात शिरली आणि मला अपेक्षित प्रश्न तिन विचारलाच
" बाबा ते आले ना?"
" कोण ?" तिची गंमत करावी या उद्देशान मी म्हणालो,
" दुसरे कोण ? आपण कुणाची कालपासून आतुरतेने वाट पहात होतो,ते जंगलात उतरले का?"
"मिन्ये तू जंगलात तर गेली नव्हतीस ?"मी दरडावून विचारले.
"उगीच का बिचारीवर ओरडतो आहेस?" बाहेर येत विद्या म्हणाली
" अग पण तू घरात कशी?" मी आश्चर्याने विचारले,
" अरे विसरलास की काय मी काल सांगितले ते,मला लंडनला एका परिषदेला जायच आहे त्यामुळे तयारी करण्यासाठी मला आज जरा लवकर घरी जायची परवानगी मिळाली. शिवाय अशा महत्वाच्या प्रसंगी त्यांच्या स्वागतासाठी आपण घरी हजर नको का ?"
" वा,तू तर ते जणु ते आपल्याच घरी येणार आहेत अशा थाटात बोलत आहेस"
"ती पोरगी तसच काहीस म्हणत होती" आता मला काहीसा संशय आला
" मिन्ये खर सांग कुठ गेली होतीस तू ?"
" अगदी खर्र खर्र सांगते या चंदूला विचारा हव तर आम्ही फक्त बागेतच गेलो होतो आणि बागेत जायला तर बंदी नाही ना?"
" मिन्ये उगीच माझा अंत पाहू नकोस ,तू काहीतरी लपवत आहेस माझ्यापासून,इकडे सगळी मानवजात त्या वैनतेयवासींची वाट पहात आहे आणि तुला थट्टा सुचतेय ?"
"तुम्ही म्हणजे मानवजात का बाबा ?"
"मिन्ये आता मुकाट्याने सांगतेस की---"
" खर्र सांगू बाबा,ते आलेत."
" काय सांगतेस? कुठे आहेत ते ?"
"आमच्याचबरोबर आलेत"
मी मिनी आणि चंदूच्या मागेपुढे पाहिले तेथे तर कोणीच नव्हते
" तिकडे नका पाहू बाबा,इकडे पहा" हातातली फुलाची परडी माझ्यासमोर धरत मिनी म्हणाली ,त्या परडीत नुकतीच तोडलेली गुलाबाची सुंदर फुले दिसत होती,मी चक्रावून जात म्हणालो,"काय चेष्टा लावली आहेस मघापासून?"
" बघा बाबा मी त्याना अगदी फुलासारख जपून आणलेय म्हणत मिनीन फुलं थोडी बाजूस करताच एकदम त्यात दोन छोटे पाच ते दहा सेंटिमीटर उंचीचे प्राणी दिसले,त्यांच्या अंगावर छोटे छोटे स्पेससूटही होते आणि फुलांवरच्या दंवबिंदूनी त्यांचे चेहरे घामेजल्यासारखे दिसत होते. एवढ्या छोट्या जीवाना आमची बाग म्हणजे जंगल आणि त्यातील मातीचा छोटा ढिगारा एकाद्या टेकडीसारखा भासला यात नवल नव्हते.
" मला वाटल बाबा की हे परीकथेतील राजकुमार आहेत,आणि म्हणून मी त्यांना ----"
पण मिनीच वाक्य पुरे होण्यापूर्वीच पत्रकारानी आत येत विचारले,
"कुठ आहे ती चिमुरडी? वैनतेयवासी तिला भेटले असे कळलेय आम्हाला"