आम्ही

आआमच्या आतूनच आम्ही आलो.

अभिमान वाटावा असे उन्हाळे आणि पावसाळे पाहिले नाहीत

प्रत्येकच स्त्रीला मातेसमान मानले नाही

नीतिमत्तेची गोची झाली तेव्हा हात वर केले नाहीत

पण सगळ्यांचेच हात अडकले आहेत असं कळल्यावार सगळे ते मान्य करत नाहीत म्हणून आम्ही हातांवर आमच्या आसवांचे प्रोक्षण केले.

इथवर आम्ही धडपडत आलो

बंदिस्त झोपेलाही जाग़वत आलो

कळा उठल्या तेव्हा शून्यपणे शरीराला शरीर जोडत आलो.

जाते ते विश्वच आपले नाही

अन् असते त्याचे आपल्याला सोयर नाही हे कळले

पण सुतक पाळायचे नाही असे ठरवून

विजांचे सगळे नखरे भोगत आलो.

कसले शब्द, कसली माया

अंगातले वात्सल्य तटतटून उठता

आईपणाचे भाग्य नशिबी नाही म्हणून

कोरडेच पान्हे मिरवीत आलो.

आमच्या आतूनच आम्ही आलो.