भूक

सुरुवात होते उसापासून
उसाऐवजी पैसे खायची
टनाला रुपाया, पोत्याला दहा
प्रत्येक टेबलावर लाच घ्यायची

चेअरमनसाहेब जरा दमानं
पोट फारच सुटते आहे
जमीनीवर नजर पोचायची नाय
वाट मात्र खडतर आहे

तुम्ही  कसली करता काळजी
पोर सरकारी अधिकारी आहे
मोडून काढू सारे विरोध
न्यायनिवाडा आपलाच आहे

मूळ प्रश्न गंभीर बनतोय
भ्रष्टाचार वैचारिक आहे
'दादा' कडून 'बाबा' कडे
वारसा निमूट जातो आहे

शाळकरी पोर 'बाबा'
पॉकेटमनी गोळा करतो
वरती आईला दटावतो
सिनेमासाठी पैसा नाय
                      ...... दारात भिकाऱ्याची पोर आरडे
                             "भाकर वाढतेस का माय?"

भूखंडांचे असेच आहे
कुंपणापाशी उगम आहे
"जरा वाईच भाईर घ्या
नगरपालिका आपलीच हाय"
कुंपण मग बाहेर सरके
रस्ताच थोडा अंग आकसे
वांदे तसे विशेष नाय
रहदारीचाच खोळंबा हाय
अरुंद रस्ता, वाढती गर्दी
अपघातात मग पोलिसांचीच सद्दी

उद्याचा ठाव आजची नजर
आरक्षित कुरण क्षेत्रावर
हळूहळू शहर काबीज होते
भूखंड खाऊन पोट फुगते
कित्येक लक्ष वर्षांपूर्वी
सारे भूतल एकत्र होते
आणि काही लक्ष वर्षांनी जर
गिळल्या भूखंडांना पाय फुटतील
महाराष्ट्रीय "अण्णा", "तात्या"
अमेरिकेवर हक्क सांगतील
                       ......... कल्पना होईल खरेच साकार
                                 "अवघे विश्वचि 'माझे' घर"