आजीचे मनोगत... (नातवंडांसाठी)

ही कविता  आजीने, सध्या परदेशात असलेल्या आपल्या नातवासाठी लिहीली आहे... 

(" आज प्रितीला पंख लाभले रे ..." या चालीवर)

. 

आज मना या पंख लाभले

स्मृति पाख्ररु तुजकडे, झेप घेई रे ॥

.

गोजिरवाणे रुप तुझे रे,

मिस्किल परि ते लोभसवाणे

मूर्ती साजिरी तुझी मना मोहवी रे

स्मृति पाख्ररु तुजकडे, झेप घेई रे ॥

.

कधी चकविसी, कधी ठकविसी

कधी हट्ट तो, कधी गुजगोष्टी

आठवाने या कंठ दाटतो रे

स्मृति पाख्ररु तुजकडे, झेप घेई रे ॥

.

कानी घुमती ते, बोल बोबडे

ओढ मनाला भेटीची जडे

दृष्ट आज मी येथुनी काढते रे

स्मृति पाख्ररु तुजकडे, झेप घेई रे ॥

.

नाते असे हे, मऊ सायीचे

मृदु ममतेचे, नि निखळ प्रितीचे

विश्व आज यापुढती ठेंगणे रे

स्मृति पाख्ररु तुजकडे, झेप घेई रे ॥

.

उंच मनोरे, नव्या युगाचे

शिखर गाठ तू, उत्तुंग यशाचे

स्वप्न सार्थ कर तू , हे तुझ्या आजीचे

स्मृति पाख्ररु तुजकडे, झेप घेई रे ॥

. 

- माधवी