... आणि शकुंतलाबाईंच्या मुलीला न्याय मिळाला

महाराष्ट्रातील बचतगटाच्या चळवळीने ग्रामीण भागातील महिला रणरागिणी बनल्या. अन्यायाला वाचा फोडू लागल्या. प्रतिकार करू लागल्या. सासरी छळ होणाऱ्या नवविवाहितेला न्याय मिळवून देऊ लागल्या. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कृष्णापूरमधील शकुंतलाबाई अभंगे.

शकुंतलाबाई या पस्तिशी उलटलेल्या महिला कृष्णापूरमधील अंबिका स्वयंसाह्यता गटाच्या सदस्या आहेत. त्यांना लिहिता-वाचता येते. बचतगटाच्या साह्याने त्यांनी आपल्या मुलीचीच सासरच्या छळापासून सुटका केली, इतके बळ त्यांच्यामध्ये आले. बचतगटात येण्यापूर्वी त्या इतर चारचौघींसारख्याच होत्या. घर आणि शेतीची कामे यापलीकडचे विश्‍व त्यांना माहीत नव्हते. जेव्हा त्यांच्या गावात बचतगट स्थापन झाला, तेव्हा दरमहा त्यात रक्कम कशी भरावी, हा त्यांच्यापुढे प्रश्‍न होता.

बचतगटातील इतर महिलांच्या अनुभवामुळे त्यांनीही बचतगटाची सदस्या व्हायचे असे ठरवले आणि त्या दरमहा ठराविक रक्कम बचतगटात गुंतवू लागल्या. हळूहळू कष्टाने मिळवलेले पाचशे रुपये बचतगटात त्यांच्या नावावर जमा झाले. आता अडीअडचणीला कोणापुढे हात पसरावे लागणार नाहीत या कल्पनेने त्यांना समाधान वाटले.

त्यांना बचतगटात जाण्यास उत्साह वाटू लागला. पैशांची बचत सुरू झाली होती, पण त्यांच्यामागचा अडचणींचा ससेमिरा काही संपला नव्हता. पावसामुळे त्यांच्या शेतीचे नुकसान झाले होते. त्यामुळे घरात पैसे शिल्लक नव्हते. अशातच मुलीचे लग्न ठरले होते. लग्नासाठी पैसा कोठून उभा करायचा, हा त्यांच्यापुढील मोठा प्रश्‍न होता. बचतगटातील महिलांना शंकुतलाबाईंची ही समस्या समजली आणि त्यांनी गटाच्या माध्यमातून शकुंतलाबाईंना मदत करायची, असे ठरवले.

बचतगटातील महिलांनी शकुंतलाबाईंना धीर दिला आणि गटामार्फत मुलीच्या लग्नासाठी त्यांना कर्जाऊ रक्कम दिली. तसेच मुलीच्या लग्नासाठी आहेरही दिला. शकुंतलाबाईंच्या मुलीचे लग्न पार पडले. शकुंतलाबाईंच्या डोक्‍यावरचे ओझे कमी झाले. लग्नासाठी गटाकडून कर्जाऊ रक्कम घेतल्यामुळे बॅंकांचे व्यवहार त्यांना माहीत झाले. आपण हे व्यवहार करू शकतो याबाबत त्यांना आत्मविश्‍वास आला. याशिवाय बचतगटातील महिला इतर समारंभांमध्येही हिरिरीने भाग घेऊ लागल्या.

एखाद्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतल्यामुळे त्यांना आपण चारचौघांत बोलू शकतो याबाबत आत्मविश्‍वास आला. वृक्षारोपणासारखे सामाजिक बांधीलकी राखणारे कार्यक्रम साजरे होऊ लागले. त्याचबरोबर घरगुती समस्यांचीही देवाणघेवाण होऊ लागली. त्याच वेळी शकुंतलाबाईंनाही आपल्या मुलीचा सासरी छळ होतोय ही बातमी शेजाऱ्यांकडून समजली होती. ही माहिती समजल्यावर त्यांनी लगेच मुलीच्या घरी धाव घेतली. तिथे गेल्यावर त्यांची मुलगी तिला होणाऱ्या छळाबाबत मोकळेपणाने बोलली नाही.

त्या वेळी त्यांनी ही समस्या गटासमोर मांडायची असे ठरवले. गटामध्ये महिला विशेष न्यायालयाबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर शकुंतलाबाईंनी मुलीला सासरहून घरी आणले. त्यानंतर तिला सासरी मारहाण झाल्याचे समजले. मुलीशी बोलून तिला त्यांनी धीर दिला आणि गटाच्या मदतीने पोलिस स्थानकात मुलीच्या सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी 498 कलम लावून तिच्या नवऱ्याला आणि सासूला अटक केली. शकुंतलाबाईंच्या मुलीला बचतगटाच्या माध्यमातून न्याय मिळाला. शकुंतलाबाईंनी गटाचे आभार मानले.

इतके करूनच त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी उद्योजकतेचे प्रशिक्षण घेऊन गावात हंगामी केळी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. बचतगटामुळे शकुंतलाबाईंच्या आर्थिक उन्नतीला हातभार लागलाच, पण त्यांच्या मुलीला सासरच्या जाचातून मुक्तीही मिळाली.