दांडोबा पाऊस

गडद श्याम ढगांच्या अजस्र मांडवाची  तयारी सुरू आहे. वारा लगबगीने धावत आहे. ढगाशेजारी ढग लावायला नेमके लावायला हवेत. त्यातून डोकावणा-या सूर्यकिरणांच्या रंगांना जुळणारी चंदेरी लखलख द्यायची जबाबदारी सौदामिनीने घेतली आहे. हे ढगही मोठे चमत्कारिक. आपले लठ्ठ देह सावरत डुलत डुलत चालतात. त्यांच्याशी कडकड भांडल्याखेरीज ते जागचे हालत नाहीत. जुळणी तर नेटकी झाली आहे. थेंबांना नेमक्या उड्या मारायला सांगा. कितीही सराव असला तरी फाजील आत्मविश्वास वाईटच की! या वेळेस धमाल करायची आहे.

एक-दोन, अरे अरे तीन म्हणायच्या आधीच पहिली सर उतरली सुद्धा, काय म्हणायचं या वेडेपणाला? अरेच्या, दुसरीही गेलीच की. ऑ! चक्क शेकडो सरी उतरल्या, किती घाई झाली ती पाहा! तरी बरं, भुईला भेटायची ही पहिलीच खेप नव्हे. आता कुणीच कुणाचं ऐकेनासे झाले आहे. धारा तर अशा कोसळताहेत की धरित्रीतून जलस्तंभ उगवून थेट आभाळापर्यंत पोहोचलेत. ते पाहा, काही थेंब अगदी सराईतपणे झाडांच्या शेंड्यावर उडी घेत आहेत. शेंड्याच्या पानांचा स्पर्श होताच ओघळ होत आहेत. तिथून डहाळीच्या पाठीवर गुदगुल्या करत खोडापर्यंत गेलेत. वृक्षाचे पाय यथेच्छ धुणं चाललं आहे.

अरेच्या, काही बहाद्दर थेंब जथ्थ्याने थेट उड्याच मारत आहेत. काहींचे नेम चुकतात अन ते थेट भूवरी कोसळतात. कोसळा, कोसळा, पण जरा जपून आणि इकडे तिकडे पाहून करायला नको का? म्हशीच्या शिंगांवर कितीही उड्या मारल्या तरी ती मऊ होणार आहे का? शेजारीच थारोळं साचता-साचता त्याचं भलंमोठं डबकं केव्हा झालं? पाणी गवताला जुमानत नाही आणि गवत पाण्याला भीड घालत नाही. दोघांची लठ्ठालठ्ठी सुरू आहे. जोडीला पावसाच्या सरी आहेतच. दंगा नव्हे तर चक्क दंगल करताहेत.

कडाडकड! दूर कुठेतरी विजेने भांडणाची मैफिल भरवली आहे. इथल्या सरींच्या आरडाओरड्यात त्यांचा क्षीण आवाजही येत नाही. अगदी कान देऊन ऐकावं लागतं.  मंदिराचे सोन्याचे कळस चमचम करताहेत. अभिषेक व्हायला हवा ना! काळ्याशार दगडाचे छत वरून संपूर्ण भिजले आहे. समोरची दगडी दीपमाळही केव्हाच धुऊन लख्ख केली. त्यावर कोरलेल्या मूर्त्यांमध्ये जिथे जागा मिळेल तिथे थेंबांचा हल्ला सुरू आहे. चौथरा, ओली सतरंजी घातल्यागत झाला आहे. तुळशीच्या बनात श्रावणाच्या सुरुवातींची कुजबूज आहे. आताच ही गत तर श्रावणात काय करतील कुणास ठाऊक.

समोरच्या रस्त्यावरील वर्दळ सिंहाच्या कटीप्रमाणे कृश झाली आहे. मंदिरात भक्तांची अचानक गर्दी झाली. छताखालचा भाग दाटीवाटीने फुलला. त्यांची रंगीबेरंगी वस्त्रे काहींच्या चेहे-यावरील चिंतेसारखी सावळी झालीत. रस्त्याच्या आजूबाजूला झाडांखाली, इमारतीच्या कडेला, जिथे जागा मिळेल तिथे मंडळी उभी आहेत. जरा भर ओसरू द्या म्हणजे हवं तिथे जाता येईल. रस्त्यातल्या तळ्यांमध्ये गाडी बंद पडली तर उगीच नसती पंचाईत. शिवाय काही तळ्यांमध्ये गनिमी काव्याने पोहण्याचे तलावही आहेत. आता व्हेनिसच्या रहिवाशांसारखे होड्यांमध्ये फिरायची तयारी करावी लागणार.

बघा, बघा, काही शूरवीर आणि त्यांच्या वीरसख्या गाड्यांच्या काचा उघड्या ठेवून, तळ्यांना पाण्याने कापत घाईने निघालेत. बिचारी रस्त्याकाठची झुडुपं, कुणीही त्यांच्यावर पाणी उडवावे. बागेतल्या फुलांची ऐट आहे. पाकळी पाकळी थेंबांनी न्हात आहे. एरव्ही गुंजारव करणारे भ्रमर आता कुठे गडप झालेत ते कळत नाही. बेडकांची डरॉव डरॉव अखंड चालू आहे. त्यांना पक्ष्यांची पिले साथ देतात. आपल्या घरट्याच्या उबदार जागेतून कुणीही चिवचिवाट करेल. जरा बाहेर आली ना तर कळेल की त्या सरी किती त्रास देतात. विजेच्या खांबांवर दिवे पेटलेत.

नदी तर असली फुगली आहे की बघवत नाही. बाई गे, किती जीव घेशील. पुरे की आता. एवढा राग, तोही तुझ्याच लेकरांवर. हां, आता ते सगळी घाण तुझ्याच अंगावर टाकतात. पण, मातृपद तूच घेतलं ना. काय म्हणतीस? हा सगळा पावसाचा बनाव आहे आणि माणसांचा खेळ आहे? अगं त्या समुद्राला बघ ना. कितीही संतापला तरी तो किनारा सोडत नाही. आणि तू तर चार-दोन पावसातच मट्ट फुगून तट सोडून धावतीस? आपल्याला हे काही पटलं नाही.

हा कोण गायक मेघमल्हार गातोय. ही मस्त भजे आणि चहाची पर्वणी आहे. धारा कधी क्षीण होतात अन लगेच वाढतात. त्यांच्याबद्दल काही खात्री देऊ नये झालं. थांबला की पाऊस! ढगांच्या चेल्याचपाट्यांच्या पोटातलं पाणीच संपून गेले. मग काय, वा-याने दंगा करून त्यांना पिटाळून लावले. भस्सकन, सूर्यकिरणांचा लोंढा त्यातून खाली आला. सगळीकडे कसं प्रसन्न उजळलं आहे. असा पाऊस दरवर्षी यावा! सर्वोच्च तृप्तीचं मोल नसतं हेच खरे – कितीही पैसे खर्च केले तरी ती मिळत नाही आणि मिळायची असते तेव्हा अगदी सहज, फुकट हातात पडते. पण, त्याच्या जोडीलाच ते दुःख मिळते ना ते नसतं तर चाललं असतं. सुकाळाची किंमत कळायला अभाव असलाच पाहिजे असं तरी कुठे लिहिलं आहे?

(शैलेश श. खांडेकर)