नाते असे कसे ?
सलते तुझ्या मनात जे नाते असे कसे
फ़ुलते मनात माझ्या हे नाते असे कसे
हसता तुला मी पाहतो डोळ्यांतली फ़ुले
कड पाकळ्यांची घेउनी एक थेंबही झुले
अंगांग सर्व भिजुनी जाते असे कसे
नख स्पर्श जरी झाला मन पीस सावरी
हलकाच श्वास कोंडतो अन ओठ थर्थरे
हृदयास कापणारे पाते असे कसे
चुरगाळतो तुझा रुमाल हात बावरा
आणून प्राण पाहतो हा नेत्र हावरा
मग कानशीली रक्त हे तपते असे कसे
सलते तुझ्या मनात जे नाते असे कसे
फ़ुलते मनात माझ्या हे नाते असे कसे