देवाने विचार केला, TV घेउन यावा
एवढं त्यात काय आहे, आपणही बघावा
सकाळी भाविक प्रवचनं बघून
देव मोठा खुश झाला
एकापेक्षा एक भेसुर बाबा पाहून
मात्र स्वतःच थोडासा घाबरला
नंतर लागल्या मुख्य बातम्या
ब्रेकिंग न्यूजने धक्काच दिला
आपली मुर्ती दुध पिते कशी
तो स्वतःही विचारात पडला
आल्या मग पौराणिक मालिका
सादर कथा त्या अनामिका
तासभर करमणुकीनंतर कळले
अरे हा वठवतोय आपलीच भुमिका!!
दुपारी होता सनीचा पिक्चर
ते पिक्चर एकाहुन एक बंपर
अचाट शक्तीने देवच वरमला
आता आपलं कसं, विचार करु लागला
त्यालाही मंदिरात जाताना पाहून
देवाच्या जीवात जीव आला
हिरोईनच्या मागे तो आलाय
हा छोटासा तपशील विसरला
मग 'K' सिरियल्स सुरु झाल्या
अफ़लातून स्त्रियांच्या कथा आल्या
नात्यांच्या गोत्यात तो फ़सला
अन फ़ारच संभ्रमात पडला
सत्तरच्या 'बा'ला पंचवीसची पणती
प्रेरणाच्या नवऱ्यांची नाही गिनती
सुनेपेक्षा सासू सुंदर कशी अन
तिनदा मरुन कुणी जिवंत कशी
प्रश्न त्याला सुटता सुटेना
अनोख्या खेळाचे नियम कळेना
पण त्याला एक समाधान झाले
मनुष्यकल्पनेचे कौतुक वाटले
आपली 'क्रिएशन' मोठी हुशार
'विश्व'कर्मा म्हणून त्यास धन्य वाटले