तेव्हाही तू केस असेच सैलसर बांधायचीस
तेव्हाही लक्ष नसताना तू लक्ष असल्यासारखं दाखवायचीस
तुझे हात तेव्हाही इतकेच खरे होते
तुझे नसणे तव्हाही आत्ताइतकेच नकोसे होते
तुझा गंध तेव्हाही असाच हवा होता
तुझी स्मरणवेळ तेव्हाही अशीच एकटी होती
घर का रे आवरत नाहीस हे तू तेव्हाही म्हणायचीस
म्हणताना ती भिवई तेव्हाही अशीच उडवायचीस
तुझं घर तेव्हाही असंच लांब होतं
आणि 'मी मुद्दाम नाही काही आले' हे तुझं म्हणणं तेव्हाही आत्ताइतकंच खोटं होतं
माझी चित्रं तेव्हाही तू अशीच बघायचीस
आणि 'मला काही कळत नाही रे' ही तुझी ओळ मला तेव्हाही आत्ताइतकंच हसू आणायची
नंतर सांगीन ना, हे तुझं तेव्हाही होतं
त्यावर माझं रागावणं तेव्हाही फ़क्त तुझं होतं
तुझं उशीरा येणं तेव्हाही मला नवीन नव्हतं
'अरे काय झालं माहितीय् का....' ही सबब तेव्हाही जुनीच होती
मला जे सांगायचं आहे, ते तेव्हाही तेच होतं
पण 'कॅनव्हास कोराच ठेव' असं बजावणारी तुझ्यातली मैत्रीण तेव्हाही आत्ताइतकीच माझी होती
हट्टी होती......पण माझीच होती.......