आशा...

दोन व्यक्ती. एकीचे नाव आशा आणि दुसरीचे अभिलाषा. दोघीही खूपच आजारी. इस्पितळाच्या एकाच रुम मध्ये उपचार घेत होत्या. दोघांच्या प्रकृती- अस्वास्थ्याची कारणे तशी खूप वेगळी आणि काळजी करावयास लावणारी.

आशाला रोज दुपारच्या वेळेस तासभर बेडवर ऊठून बसावयची परवानगी मिळाली होती. साधारण एक- दीडच्या सुमारास ती बेडवर उठून बसत असे. तिच्या फ़ुप्फ़ुसांत साठलेलं पाणी जेणेकरून कमरेपाशी लावलेल्या ड्रेन-कपमध्ये गोळा व्हावयास मदत व्हावी, म्हणुनच डॉक्टरांनी तिला तशी परवानगी दिली होती. अभिलाषाला मात्र "अजिबात उठून बसायचे नाही", असे डॉक्टरांनी अगदी निक्षून सांगितलं होतं. तिचा आजारच तसा काहीसा होता, म्हणा ना!

दोघी एकमेकींशी दिवसभर गप्पा मारत बसत. गप्पांचा विषय अगदी नवरा, कुटुंब, घर, नोकरी पासून ते त्यांनी आतापर्यंत कुठंकुठं उन्हाळी सुट्टी घालवली वगैरेवगैरे पर्यंत रंगत असे. आशाच्या बेडशेजारीच एक सुंदर खिडकी होती. जेव्हा जेव्हा दुपारी तास भर आशा उठून बसत असे तेव्हा ती तिच्या रूममेटला -  अभिलाषाला- खिडकीतून दिसणाऱ्या सर्व गोष्टींचे वर्णन करीत असे.

"खिडकीच्या बाहेर एक अतिशय सुंदर बाग आहे. आणि, आणि त्या बागेत एक शांत आणि आल्हाददायक असा तलाव आहे.  त्या सुंदर तलावात बदकं आणि, आणि हो, राजहंससुद्धा स्वच्छंदपणे विहरतायंत. प्रेमी युगुलं हातात हात घेऊन पुढील आयुष्याची स्वप्नं रंगवतायंत. एकमेकांना आणाभाका देतायंत. भेदरलेली छोटी छोटी मुलं आई बाबांसोबत त्यांचा हात घट्ट पकडून त्या छोट्या नावेत किती आत्मविश्वासानं बसली आहेत."

"आह, आज किती छान ईंद्रधनुष्य पडलं आहे. नुकत्याच होऊन गेलेल्या पावसाच्या हलक्याशा सरीमुळं ती सुंदर फ़ुलं कशी अगदी डवरली आहेत. मुलं पाठशिवणीचा खेळ खेळतायंत. सगळीकडं उत्साह अगदी ओसंडून वाहतोय! किती छान आहे हे सगळं", आशा खिडकीतून दिसणारं दृष्य इतक्या उत्कटतेनं सांगत असे की, त्यावेळी अभिलाषा डोळे बंद करून ते अनुभवत असे.

" वा! आज त्या बागेच्या शेजारून एक लग्नाची वरात चाललीय. नवरोबा मुंडावळ्या बांधून घोड्यावर बसलाय. पुढे ढोल-ताशे वाजतायंत. तरूण आणि तरूणीही उत्साहानं मिरवणुकीपुढे नाचतायंत..फ़टाके फ़ोडतायंत." आशानं आजही रोजच्याप्रमाणं बसल्या बसल्या खिडकीतून दिसणारं दृष्य वर्णायला सुरुवात केली. फ़टाक्यांचा आवाज तिच्यापर्यंत पोचला नसला तरी अभिलाषासुद्धा ते वर्णन आपल्या मन:चक्षूंद्वारा रंगवत त्यात रममाण होऊन गेली. असेच काही दिवस, काही आठवडे गेले.

एकेदिवशी सकाळी दोघींच्या स्पंजिंग साठी नर्स आली आणि सवयीप्रमाणं तिनं पहिल्यांदा आशाला उठवलं. "आशा मॅडम, आज थोडा उशीर झालाय. चला, पटकन स्पंज करते तुम्हाला!". पण एक ना दोन. आशानं काहीच उत्तर दिलं नाही. "ओहह" नाडीला ठोके नसल्याचं लक्षात येताच नर्स डॉक्टरांना सांगायला निघून गेली. झोपेत असतानाच आशाला मरण आलं होतं.

आता अभिलाषाला तिथं कोणी पार्टनर नव्हतं. मनात साठवून ठेवलेली आशाची आठवण आणि तिनं वर्णन केलेली ती बाहेरची सुंदर दृष्यं. एवढंच काय ते.

"मला आवडेल, त्या खिडकीशेजारच्या बेड वर शिफ़्ट व्हायला, जर आता तुम्ही मला काही वेळ बसायची परवानगी देत असाल तर", अभिलाषानं धाडस करून आज डॉक्टरांना विचारलंच शेवटी. डॉक्टरांनी तिचे रिपोर्ट पाहिले आणि नर्सला अभिलाषाला आशाच्या बेडवर शिफ़्ट करायला परवानगी दिली दिली. नर्सनं तिला अर्ध्या तासातच त्या सुंदर खिडकीशेजारच्या बेडवर हलवलं आणि ती निघून गेली. आता अभिलाषा त्या खोलीत एकटीच होती. डॉक्टरांनी थोडावेळ बसायची परवानगी दिल्यामुळे ती एकदम खुषीत होती.

थोडावेळ पडून राहिल्यावर अभिलाषा हळुहळू उठली. आजपर्यंत नुसती मनानं अनुभवलेली ती दृष्यं आज तिला स्वतःच्या डोळ्यांनी पहायला मिळणार होती. हात पांघरुणाबाहेर काढून आणि पाठीला किंचितसा ताण देऊन तिनं त्या खिडकीजवळ कोपर टेकवलं. मान थोडी वर करून ती ते बाहेरचं जग न्याहाळायचा प्रयत्न करू लागली.

"अं, हे काय?" समोरची सफ़ेद भिंत पाहुन ती गोंधळली.

"नर्स, ही इथं भिंत कशी काय? आणि ती बाग कुठाय?" तिथं सलाईनची बाटली बदलायला आलेल्या नर्सला अभिलाषानं आवेगानं विचारलं.

"बाग? कुठली बाग? इथं खिडकीतून तर 'बी' ब्लॉकची भिंतच येते समोर" नर्स तात्काळ म्हणाली.

"मग, मग आशा इतकं सुंदर वर्णन करायची ती सुंदर बाग, ते थंडगार आणि आल्हाददायक तळं? ते कुठाय सगळं?", अभिलाषा.

"आशा मॅडम?" नर्स प्रश्नार्थक मुद्रेनं उद्गारली, "अहो, त्या तर अंध होत्या. त्याना ही भिंतसुद्धा दिसणं शक्य नाही"

"कदाचित, आशामॅडमनी... तुम्हाला बरं होण्यासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून...बहुतेक!"

तात्पर्य: स्वत:ची परिस्थिती विसरून दुसऱ्याला आनंदी पाहण्यात प्रचंड समाधान असते. दु:ख वाटल्याने ते थोडे कमी होते. पण सुख वाटल्याने ते द्विगुणित होते. जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजावयाची असेल तर, तुमच्याकडे असलेल्या; पण पैशांनी विकत घेता येणार नाहीत, अशा वस्तु मोजा."Today is a gift, that's why it is called the Present." 

                                                      --***---

विशेष सुचना: कुठेतरी कधीतरी ऐकलेली ही कथा शब्दांत मांडायचा प्रयत्न केला आहे.