देवदूत

"अरे वाचवा ! वाचवा कुणी तरी त्यांना .......... !"

"माझ्याकडुन एक हजार रुपयांचं बक्षीस ..... ! वाचवा त्यांना ... ! कुणीच का वीर नाही इथं ?" नदीला पुर आला होता. पाणी नदीतीरावरून गावापर्यंत पसरलं होतं. गरिबांच्या झोपड्या कोसळून वाहिल्या होत्या. पाण्याला भारी वेग होता. पहावं तिकडं नुसतं पाणीच दिसत होतं; अन तेही वेगवान पाणी ! काही झाडं पडली होती आणि काही पडत होती. शेजारच्या टेकडीवरून लोक दृश्य पाहत होते. एकाएकी त्यांची नजर एका झाडाकडे गेली. त्या झाडावर दोन पक्षी चिकटून बसावे त्याप्रमाणे दोन चिमूकली बाळं बिळगून बसली होती. त्यांची शरीर ओली चिंब होती. भीतीनं आणि थंडीनं ती कुडकुडत होती ! पुराचं पाणी झाडाच्या बुध्यांवर पोचलं होतं !

पाहणाऱ्यांच्या हद्यांचं पाणी-पाणी झालं. जमीनदारानं एक हजाराचं बक्षीस लावलं. कुणीतरी त्यांना वाचवायलाच पाहिजे. कुणाला ठाऊक त्यांचे आई-वडील कुठं असतील ? पुन्हा लोक ओरडू लागले.

"वाचवा ..... वाचवा ....... कुणी तरी त्या चिमुकल्या बाळांना ....... !"

आणि यावेळी  प्रभुजीनं जणु प्रार्थना ऐकली. एक तरुण तीरासारखा कुठुन तरी आला. त्याने कुणाला काहीच न विचारता एका नावेत उडी घेतली आणि दोन्ही हातानं पुरात तो ती वल्ववू लगला. पाण्याला वेग असल्यामुळं त्या झाडाच्या दिशेनं नाव नेणं फारच कठीण होतं. खवळलेल्या लाटा धडाधड आपटत होत्या. पण तरुण भित्रा नव्हता. त्यानं लाटांशी झुंज घेतली. लोक पाहात होते. लवकरच तो झाडाजवळ पोचला. नाव सारखी हेलकावे घेत होती. तरुणानं मुलांना अलगद उचलुन नावेत ठेवलं आणि तो निघाला टेकडीकडे परत यायला ! लोकांनी टाळ्यांचा गजर केला..... !

फिरुन झुंज होती. लाटांच्या थपडा होत्या; हेलकावे होते. मघांशी तो एकटा होता. मघांशी तो एकटा होता. आता आणखी दोन जिवांची जबाबदारी त्याच्यावर होती. पण तो सुखरूप परत फिरला. ती दोन बाळं त्यानं त्यांच्य नातेवाईकांना सोपवली आणि घाम पुसत दुर जाऊ लागला. जमीनदारानं एक हजार रुपये देऊ केले पण त्याने ते नाही घेतले आणि जाऊ लागला. जमीनदार म्हणाला, " बाबा रे, तुझं नाव तरी सांगून जा .... "

पण छे ........ ! त्यानं नाव सांगितल नाही. तो फक्त हसला आणि निघून गेला. लोक पहातच राहिले.