मा फलेषु....

बोल कोणी बोलून गेला

घाव खोल तो करून गेला

ओली होती जखम अजूनही

त्यावर वणवा लावून गेला

थांबविले मी किती दिवसाला

सूर्य नभी चा ढळून गेला

दाटून आले मेघ नभी

पाऊस दूरवर पडून गेला

प्राजक्त उभा अंगणी माझ्या

बहर दुज्याला देऊन गेला

ओंजळीत होती बकुळ सावळी

गंध वाऱ्यावर वाहून गेला

हसून लपविले किती जरी

थेंब अश्रूचा बोलून गेला

मा फलेषु कदाचन .......

सखा श्रीहरी सांगून गेला