सांगाडे... सिंहासनांचे!
मान टेकावी, असा खांदाच सापडत नाही
खांदा मिळाला, तर मान राहील
याची खात्री कोण देणार?...
डोळ्यातली फसवी सहानुभूती
कधीकधी हसून खुणावते...
पण त्या हसण्याची जात समजतच नाही...
केव्हाकेव्हा ठिबकणारे अश्रूही दिसतात,
त्या हसणाऱ्या डोळ्यातही...
पण, न जाणो, ते नक्राश्रू असले तर?...
शब्दांची गोड साखर लावून पेरलेली वाक्येही
येतात कधीमधी कानावर...
पण त्या झालरीच्या आत कोणता मुखवटा दडलाय,
ते कोण सांगणार?...
दया, सहानुभूती, अश्रू, हे शब्द
भूतकाळात कधीतरी
सिंहासनावर बसलेले असायचे...
आता मात्र, त्यांच्याखालची
सिंहासने नाहीशी झालीत...
उरले आहेत, फक्त सांगाडे,
निर्जीव सिंहासनांचे!!...
-रा. वा. गुणे.